सुखदा भावे- दाबके
आता न आम्हां कुणी थांबवा, आम्ही घेतला 'श्वास' नवा,
मंडळी, या ओळी आपण टीव्हीवर ऐकल्या असतील. या ओळी आणि व्हिडीओतील दोन चेहरे एकाच गोष्टीची आठवण करून देतात, राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार विजेता 'श्वास'! मराठी सिनेमाला एका वेगळ्या वळणावर नेणारा आणि वैविध्यपूर्ण विषय असलेल्या चित्रपटांचा पायंडा घालून देणारा 'श्वास' बिवलीसाठी अभिमानास्पद ठरला. अहो, कारण याच्या लेखिका माधवी घारपुरे डोंबिवलीच्या रहिवासी! माधवीताईंनी एका दिवाळी अंकासाठी लिहिलेली कथा अरुण नलावडेंच्या वाचनात आली आणि त्या कथेचं सोनं झालं!
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात मोकळा श्वास असा कितीसा घ्यायला मिळतो? ट्रेनने प्रवास करणाऱ्या डोंबिवलीकरांची तर गोष्टच निराळी. सकाळी ९ वाजता गाडीत शिरायला मिळण्याच्या आशा आकांक्षांना सुरुंग लावत ही मुंबईची लाइफलाइन लाखो लोकांची ने -आण करत असते. पण एका डोंबिवलीकराने मात्र चक्क या ट्रेनलाच आव्हान देत सायकलिंगचे उच्चांक गाठले आहेत. विनोद पुनमिया, वय वर्ष पन्नासहून अधिक. पुण्याहून दख्खनच्या राणीशी शर्यत लावत, तिला हरवण्याचा अचाट पराक्रम करणारे! २५ मार्च २००७ रोजी, पुणे- डोंबिवली हे १४० किलोमीटरचे अंतर २ तास १४ मिनिटं १४ सेकंदांत पार करत, डेक्कन क्वीनच्या २० मिनिटं आधी पोहोचण्याचा पुनमिया सरांनी केलाय! डिसेंबर २०१० मध्ये त्यांनी २६/११ च्या हल्ल्याला उत्तर म्हणून इंडिया गेट, दिल्ली ते गेट वे ऑफ इंडिया, मुंबई हा 'व्हील टू हील' सायकलप्रवास केला. याची नोंद 'लिम्का बुक'मध्ये झाली आहे.
डोंबिवलीला क्रीडा, सांस्कृतिक वारशासोबतच विद्याभ्यासाची आवडही लाभली आहे. इथल्या विद्यार्थ्यांचं शिक्षणात सतत पुढे पडणारं पाऊल याची साक्ष पटवून देतं. याचंच एक ताजं उदाहरण म्हणजे १२ डोंबिवलीकर विद्यार्थ्यांची 'नासा' भेट! भारतातील शेकडो विद्यार्थ्यांमधून, या १२ जणांना व्हिसा मिळाला! तेही 'नासा'च्या रेकमेंडेशनच्या आधारे! लाइफटाइम अनुभव घेऊन आलेले हे १२ छोटे वीर आणि त्यांना तसं घडवणारे त्यांचे पालक, शिक्षक, त्यांचे सहाय्यक हे सारे डोंबिवलीची शान आहेत!
विद्याभ्यासाचा पाया हा वाचनाच्या शिदोरीवर अवलंबून असतो आणि अशी वाचनाची गोडी लावणारी अनेक ग्रंथालयं डोंबिवलीमध्ये आहेत. त्यातील वाखाणण्याजोगं एक नाव म्हणजे पै यांची फ्रेंड्स लायब्ररी! लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचनसंस्कृतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा, या उद्देशाने १ जानेवारी २०१५ रोजी वाचनालयाने एक आगळावेगळा उपक्रम राबवला. लक्ष्य होतं एका दिवसात एक हजारांहून अधिक वाचक सदस्य मिळवण्याचं! सकाळी ६.४० वाजता पहिल्या सदस्याची नोंदणी झाली आणि बघता बघता सदस्य वाढले, रात्री १०.३० वाजता शेवटच्या म्हणजे १०२१व्या सदस्याची नोंदणी झाली! हजार सभासदांची लक्ष्यपूर्ती केव्हाच झाली होती! या विक्रमाची नोंद 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स' मध्ये झाली.
डोंबिवलीला बऱ्याचदा सेन्ट्रल लाइनचं विलेपार्ले म्हणतात. कारण पार्ल्यासारखीच मराठमोळी संस्कृती, वातावरण, इथे आहे. अर्थातच शिवाजीमहाराजांवरची अपार श्रद्धा डोंबिवलीकरांमध्येही आहेच. याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे २००४ साली डोंबिवलीच्या बंदिस्त क्रीडासंकुलात साकारलेली शिवराज्याभिषेकाची भव्य महारांगोळी! ५२०२ चौ. फूट आकाराच्या या महारांगोळीसाठी ८०० किलो रांगोळी आणि १०० किलो रंग वापरले गेले होते. विकास पाटील आणि त्यांच्या ५ कलाकार सहकाऱ्यांनी, ६ दिवस ६ रात्री मेहनत घेऊन साकारलेल्या या महारांगोळीची नोंद 'लिम्का बुक'मध्ये झाली होती.
विद्या, कला, यांच्याबरोबरच क्रीडेविषयी डोंबिवलीला अपार जिव्हाळा आहे. डोंबिवलीचे अनेक क्रीडापटू देश आणि जागतिक पातळीवर नाव गाजवून आले आहेत आणि या सर्वांचा कळस म्हणजे सध्या भारतीय क्रिकेट टीमचा कप्तान असलेला अजिंक्य रहाणे! शालेय शिक्षण डोंबिवलीच्या, टिळकनगर आणि जोशी हायस्कूलमध्ये झालेला अजिंक्य, क्रिकेटचं प्रचंड वेड असलेल्या डोंबिवलीची शान आहे.
असं काही ऐकलं पाहिलं की वाटतं, कसली ग्रेट माणसं असतात या जगात! त्यांची जिद्द, महत्वाकांक्षा, मेहनत बघून कोड्यात पडायला होतं. पण खरं कोडं तुम्ही बघितलंय? या डोंबिवलीमध्ये असं कोडं घडलंय! डिसेंबर २०१४ मध्ये, डोंबिवलीच्या बंदिस्त क्रीडा संकुलात, रोटरी क्लबच्या पुढाकाराने सुरू झालेलं, 'गिनीज बुक' मध्ये नोंद झालेलं 'डोंबिवली टूगेदर' हे जिगसॉ पद्धतीचं कोडं! ११० दिवस अपार मेहनत घेऊन ७,७०० चौ. फुटांच्या महाकाय जागेत, १०,४०,४८४ तुकडे जोडून तयार झालेल्या या जिगसॉ पझलने, भगवान गौतम बुद्धांची छबी साकारत, बघणाऱ्यांना शांतीचा संदेश देत डोंबिवलीकरांच्या आठवणींचा संचय श्रीमंत केलाय!
नाविन्याची आस असलेल्या डोंबिवलीने कित्येक गोष्टींचा पाया रचला आहे, कित्येक गोष्टींची सुरुवात डोंबिवलीपासून झाली आहे. नववर्ष स्वागतयात्रा हे त्याचं मोठं उदाहरण. तसेच २०११ साली भारतीय राष्ट्रगीताला १०० वर्षं पूर्ण झाली त्यानिमित्त डोंबिवलीमध्ये ३५०० शालेय विद्यार्थ्यांच्या समूहाने, संपूर्ण म्हणजे ५ कडव्यांच्या 'जन गण मन'चं गायन केलं.
अनेक संस्थांच्या विद्यमाने संपन्न झालेल्या 'शताब्दी राष्ट्रगीताची' या सोहळ्यामध्ये 'शताब्दी राष्ट्रगीताची' या ध्वनिमुद्रिकेचं मॅगसेसे पुरस्कारविजेत्या नीलिमा मिश्र यांच्या हस्ते प्रकाशन झालं. ५ कडव्यांचं संपूर्ण 'जन गण मन' गायनाचा पहिला मान डोंबिवलीला मिळाला! आणि या सोहळ्याची नोंद 'लिम्का' मध्ये झाली! या ध्वनिमुद्रिकेचं आणि त्या सोहळ्याच्या वेळी गायल्या गेलेल्या संपूर्ण राष्ट्रगीताचं संगीत संयोजन, ३५०० विद्यार्थी आणि साधारण १५ हजार जनसमुदायासमोर त्या मुलांच्या साथीने गायन करायला मिळाल्याबद्दल मी स्वत:ला अतिशय भाग्यवान समजते.
अशी ही एकेकाळी छोटेखानी गाव असलेली, नंतर शहर आणि आता अगदी जगाच्या इतिहासात, अटकेपार आपला ठसा उमटवू पाहणारी आमची डोंबिवली, हिचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट