Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2741

तांडे चालले चालले...

$
0
0

अनेक शतके शांततामय सहजीवन जगत असलेले जगभरातील अनेक समुदाय स्थलांतर करीत आहेत. जिथे आपल्या पिढ्या नांदल्या, ती जागा सोडून अन्यत्र जात आहेत. या देशातून त्या देशात, खेड्यांतून शहरात, शहरांतून महानगरांत...

उदयाला आल्यापासून मानवी संस्कृती सुरक्षिततेच्या शोधात आहे. तिला हवी आहे, जगण्यासाठीची सुरक्षितता, खाण्या-पिण्याची सुरक्षितता. तंत्रज्ञान क्रांतीच्या आजच्या काळातही ही सुरक्षितता पूर्णपणे प्राप्त झाली आहे, असे म्हणता येणार नाही. कोणत्या कोणत्या समूहाला असुरक्षित वाटत असतेच. राष्ट्रीय, जातीय आणि धार्मिक अस्मिता टोकदार होत असल्याने आणि आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी हिंसाचार करणाऱ्या मूलतत्त्ववाद्यांची संख्या वाढल्याने स्वतःला असुरक्षित समजणाऱ्यांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीवर मूठभरांची मालकी, विकासाच्या नावाखाली नैसर्गिक चक्रात होणारा हस्तक्षेप, पाण्याचे वाढते दुर्भिक्ष्य, ग्रामीण रोजगाराच्या ओसरत्या संधी, अल्पसंख्याकांबद्दलची वाढती असहिष्णुता अशा कारणांमुळे जगभर स्थलांतर होत आहे. 'मायनॉरिटी राइट्स ग्रुप इंटरनॅशनल' (एमआरजी) या संस्थेने याबाबत नुकताच अहवाल सादर केला असून, तो डोळ्यांत अंजन टाकणारा आहे.

'इस्लामिक स्टेट्स'सारख्या दहशतवादापासून जगभर अल्पसंख्याकांना होणारा त्रास यांवर या अहवालात प्रकाश टाकला आहे. शतकानुशतके शांततामय सहजीवन जगणारे अनेक समुदाय या कारणांमुळे स्थलांतर करीत आहेत. जिथे आपल्या पिढ्या नांदल्या, ती जागा सोडून अन्यत्र त्यांचे तांडे सुरक्षित जागांच्या दिशेने निघाले आहेत. या देशातून त्या देशात, खेड्यांतून शहरात, शहरांतून महानगरांत भटकंती चालू आहे. म्यानमारात रोहिंग्यापासून इराकमधील येझिदींपर्यंत अनेक अल्पसंख्य स्वभूमी सोडून तुलनेने शांत ठिकाणी जात आहेत. येत्या काळात हे स्थलांतर वाढण्याची शक्यता आहेच; परंतु ते जेथे जातील तेथेही त्यांना दुय्यम वागणूक मिळेल, असे 'एमआरजी'च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

'मूलतत्त्ववादी संघटना दिवसागणिक आक्रमक होत आहेत. इस्लामिक स्टेटसारख्या संघटनांमुळे इराकसह पश्चिम आशियाई देशांतील स्थलांतर वाढते आहे. अनेक छोट्या समुदायांना भीती वाटत असल्याने ते आपला देश कायमचा सोडणे पसंत करीत आहेत,' असे निरीक्षण अहवालाने आहे. केवळ वाढता हिंसाचारच स्थलांतराला कारणीभूत नसल्याचेही नमूद आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचेही कारण त्यात आहे. नैसर्गिक साधनांवर हक्क प्रस्थापित करणाऱ्या भांडवलदारांमुळेही स्थलांतर होते. कोलंबियात सोन्याच्या खाणी असलेल्या परिसरात राहत असलेल्या मूळ आफ्रिकी वंशाच्या लोकांना तेथून स्थलांतरित होण्यास भाग पाडले जात आहे. हीच गत कॅनडामधील ग्रामीण जनतेची झाली आहे. त्यांना खाणकामामुळे शहरांकडे स्थलांतरित होण्यास भाग पाडले जात आहे. पाण्याच्या शोधात होणारे स्थलांतर नवीन नाही. आपल्याकडेही हा प्रकार घडतो आहे. रोजगार आणि उद्योग यांसाठीही स्थलांतरे होत आहेत.

केवळ भाष्य करून न थांबता त्यांनी उदाहरणेही दिली आहेत. चीनमध्ये येवायगर समाजाची संस्कृती नष्ट केली जात असून, त्यामुळे तेथील हिंसाचार वाढीला लागल्याचे त्यांनी नमूद केले आहे. शहरांमध्ये येणाऱ्या स्थलांतरितांची दुरवस्था होते, त्यांना चांगल्या भागात घरे मिळत नाहीत. यामुळे घेट्टोकरण होण्यास मदत होते, तसेच स्थलांतरितांना पोलिस त्रास देतात, हा मुद्दाही या अहवालात आहे. ग्रामीण भागाची दुरवस्था, तेथपर्यंत न पोहोचलेले विकासाचे वारे यामुळेही शहरांच्या दिशेने स्थलांतर वाढीला लागले आहे. २०५०पर्यंत जगाच्या एकूण लोकसंख्येच्या दोन तृतीयांश लोक शहरांत राहत असतील, असे संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याच्या आधीच म्हणजे २०३०पर्यंत सध्याच्या महानगरांचा आकार आणखी वाढेल आणि ते मेगासिटीज बनतील, असेही त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. या मेगासिटीजमध्ये दिल्लीचा समावेश असणार आहे. त्यानंतरही स्थलांतरितांचे तांडे चालतच राहतील...● ● ●

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2741

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>