रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी ही रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७४ वर्षांची परंपरा असलेली सर्वांत जुनी संस्था. सन १९३३मध्ये बाबूराव जोशी व मालतीबाई जोशी यांच्या प्रेरणेतून रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची स्थापना झाली. भारतरत्न महर्षी कर्वे यांची पत्नी व बाबूरावांची आत्या बाया यांच्याकडून बाबूराव व मालतीबाईंनी संस्कार व स्त्रीशिक्षणाचा वसा घेतला. रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या महिला विद्यालयाची स्थापना १९२३मध्ये झाली.
रत्नागिरीसारख्या दुर्गम भागात स्त्रीशिक्षणाची पहिली वीट बाबूराव व मालतीबाई जोशी यांनी रचली. संस्था या चिरस्थायी असतात. ती मोठी असते, माणसे नव्हेत. व्यक्ती आज आहेत, उद्या नाहीत, हे बाबूराव यांचे विचार सर्वांना नवी ऊर्जा, प्रेरणा देणारे आहेत. बाबूराव जोशी, मालतीबाई जोशी या दाम्पत्याने सन १९२५मध्ये तीन मुलींना शिक्षणाचे महत्त्व पटवून स्त्रीशिक्षणाचा आदर्श घालून दिला. त्या पहिल्या तीन मुलींची नावे चंद्राबाई देशपांडे, मीराबाई हेगडे व सोनू देशपांडे. त्या मुलींच्या शिक्षणाची सुरुवात रत्नागिरीमधील टिळक आळीतील वैद्य यांच्या घरातील खोलीतून झाली. बाबूरावांनी गोगटे कॉलेजच्या स्थापनेबरोबरच अनेक स्वप्ने पाहिली आणि ती पूर्ण करण्यासाठी आयुष्यभर दिवस-रात्र कष्ट घेतले, त्याग केला, अपमान सहन केला. ध्येयपूर्तीच्या ध्यासाने बाबूरावांनी मालतीबाईंच्या सहकार्याने अत्यंत तळमळीने, निरलस वृत्तीने, प्रामाणिकपणे संस्थेचा लक्षणीय विस्तार केला.
म. कर्वे यांच्या कार्याचा व विचारांचा बाबूराव व मालतीबाईंवर विशेष प्रभाव होता. रत्नागिरीसारख्या त्याकाळी दुर्गम भागात या दाम्पत्याने मुलींसाठी शिक्षणाची कवाडे उघडली. या त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ४ सप्टेंबर १९६४ रोजी मालतीबाईंना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले गेले. मालतीबाई व बाबूरावांनी स्त्रीशिक्षणाला चालना दिली, तेव्हापासून खास मुलींसाठी सुरू झालेले पहिले महिला विद्यालय आजतागायत चालू आहे. ते शतकाच्या उंबरठ्यावर आहे. बाबूरावांनी मालतीबाईंच्या सहकार्याने बंद पडलेले ट्युटोरियल स्कूल घेऊन शिर्के हायस्कूल सुरू केले. ते मॅट्रिक परीक्षेचे केंद्र केले. १४ हजार विद्यार्थी असलेल्या संस्थेच्या गोगटे कॉलेजच्या पहिल्या बॅचमध्ये सुनीताबाई देशपांडे शिकत होत्या. ज्ञानपीठ विजेते प्रा. विंदा करंदीकर व इस्रोचे प्रमुख डॉ. वसंतराव गोवारीकर यांच्यासारखे मान्यवर प्राध्यापक कॉलेजला लाभले.
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या १९ उपशाखा आहेत. त्यात महत्त्वाचे गोगटे-जोगळेकर कॉलेज. त्याची स्थापना १९४५मध्ये झाली. सुरुवातीला मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेले आणि नंतर पुणे, कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ, असा प्रवास करत पुन्हा मुंबई विद्यापीठाशी जोडले गेले. सन १९४५मध्ये सुमारे १५० विद्यार्थी असलेल्या कॉलेजमध्ये आत्ता पदवी, पदव्युत्तर स्नातक (पीएचडी) स्तरावर ३ हजार ७०० विद्यार्थी अध्ययन करत आहेत. २५ शैक्षणिक व ३३ अभ्यासेतर विभाग यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. रत्नागिरी एज्युकेशन संस्थेचे विद्यमान अध्यक्ष केंद्रीय आयुष व संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन, सचिव सतीश शेवडे, संस्थेचे नियामक मंडळ यांच्या नेतृत्वामुळे कॉलेजने सातत्यपूर्ण उत्तम दर्जा राखला आहे.
गोगटे-जोगळेकर कॉलेजने संस्था व कॉलेजांशी एकूण १६ सामंजस्य करार (एमओयू) केले आहेत. शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी' (एनआयओ) आणि 'इंडियन इन्स्टिट्यूट अॅग्रिकल्चर सोसायटी ऑफ इंडिया (आयसीएआर) या संस्थांशी करार केला आहे. सांगलीतील विलिंगन कॉलेज, गोव्यातील चौधुले, सारवली, रोझरी कॉलेज यांच्याशी करार करून या माध्यमातून चार राष्ट्रीय व एक आंतराष्ट्रीय कार्यशाळा घेण्यात आल्या. कॉलेजमध्ये 'सॉइल टेस्टिंग लॅबोरेटरी' निर्माण केली. ज्यात राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध मातीचे परीक्षण करून त्याचे हेल्थ कार्ड सरकारमार्फत शेतकऱ्याला दिले जाते. महिला सक्षमीकरणासाठी विशेष मेहनत घेत शोधवेध ही संशोधन स्पर्धा घेणारे गोगटे-जोगळेकर कॉलेज विद्यापीठात एकमेव आहे.
संस्थेसाठी आपल्या वकिलीचा त्याग करणारे, प्रसंगी संस्थेच्या इमारतीची कौले बदलायला शिपायाला मदत करणारे, दिवाळी समोर असताना गिरणीच्या गल्ल्यातील तीन रुपये देऊन शिक्षकाची गरज भागवणारे, निधी संकलनासाठी चित्रपटांचे रिळ घेऊन गावोगावी पायपीट करणारे व वाढत्या वयात जुनी सायकल वापरून संस्था उभी करणारे बाबूराव हे शिक्षण क्षेत्रातील आदर्श आहेत. कॉलेजच्या प्रवेशद्वारी बाबूराव व मालतीबाईंचे भित्तीचित्र त्यांनी मूल्यांसाठी धरलेल्या आग्रहाची आठवण करून देते. एज्युकेशनमधील महिला विद्यालय शतक महोत्सव (२०२०), गोगटे-जोगळेकर कॉलेज हीरक महोत्सव (२०२१), शिर्के हायस्कूल हीरक महोत्सव (२०२३) व चालू वर्षाचा जीजीपीएसचा व कीर-लॉ कॉलेजचा रौप्य महोत्सव हे संस्थेच्या वाटचालीतील मैलाचे दगड आहेत. बाबूरावांच्या संस्थात्मक दृष्टीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून संस्थेचे कार्याध्यक्ष, सचिव व नियामक मंडळ निष्ठेने पाऊल टाकत आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट