Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2741

रंगभूमीवरील अद्वैत

$
0
0

निनाद देशपांडे, अदिती देशपांडे

आईचा जन्म २१ फेब्रुवारी १९३७चा. स्वातंत्र्यपूर्व काळातला. तिचे वडील वसंतराव कामेरकर हे एचएमव्हीमध्ये वरिष्ठ ध्वनिमुद्रक होते. कामेरकर कुटुंबीय मूळचे पेणचे. आईचे आजोबा भिकाजी कामेरकर हे त्या काळात नाटकातून स्त्री भूमिका करायचे. नाटकाच्या वेडापायी ते पेण सोडून मुंबईत आले. कामेरकरांचे पहिले निवासस्थान म्हणजे गिरगावातली शांताराम चाळ. कालांतराने कामेरकर कुटुंबीय तिथून गिरगावातील फ्रेंच पुलाजवळच्या राघववाडीत राहायला आले. त्या वाडीत शेजारीच मामा वरेरकर राहायचे. इतरही अनेक कलाकार, गायक मंडळी त्या वाडीत राहायची. वसंतराव कामेरकरांवर नाटकाचे प्रथम संस्कार तिथे झाले; जे पुढे त्यांच्या मुलांमध्ये, विशेषतः आईमध्ये उतरले. गायक, नट चंद्रशेखर उर्फ बापू कामेरकर हे आईचे थोरले बंधू. अभिनेत्री ज्योत्स्ना कार्येकर ही थोरली बहीण. प्रेमा साखरदांडे ही सर्वांत थोरली बहीण. लेखक माधव साखरदांडे थोरले भावोजी. तेंडुलकरांच्या 'गिधाडे'मधला अशोक कामेरकर धाकटा भाऊ. आशा दंडवते धाकटी बहीण, तर वृन्दावन दंडवते धाकटे भावोजी. नेपथ्यकार आणि प्रकाशयोजनाकार विश्वनाथ उर्फ विसू कामेरकर धाकटा भाऊ. जवळपास अख्खे कामेरकर कुटुंबच रंगभूमीशी निगडित होते, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

कामेरकर कुटुंबीय १९३५मध्ये त्यांच्या शिवाजी पार्कच्या मोठ्या घरात राहायला आले. तिथेच १९३७मध्ये आईचा म्हणजेच सुलभाचा जन्म झाला. वडील एचएमव्हीमध्ये असल्याने अनेक गायकांचे आमच्या त्या घरी येणे-जाणे असायचे. मैफली व्हायच्या. घरातील भल्यामोठ्या हॉलमध्ये कित्येक नाटकांच्या तालमी व्हायच्या. या सगळ्यांचा हमखास प्रेक्षकवर्ग म्हणजे कामेरकर बंधूभगिनी. सगळे समोर बसून एकाग्र चित्ताने बघायचे. ऐकायचे. त्याची आवड आईने सर्वांपेक्षा जास्त लवकर आणि आवडीने जोपासली. आईचे तिसरीपर्यंतचे शिक्षण जवळच्याच पालिकेच्या शाळेत झाले आणि मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण छबिलदास लल्लूभाई कन्याशाळेत. पुढे विल्सन कॉलेजमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन आपल्याच शाळेत शिक्षिका म्हणून रूजू झाली. शाळेच्या मुख्याध्यापिका खेर बाईंच्या आग्रहावरून पुढे बी.एड.ही केले. शाळेतील मुलींची आई अत्यंत आवडती शिक्षिका होती. शाळेत तिने लहान मुलांची बरीच नाटके बसवली. तेंडुलकर यांच्या 'एका बॉबीची गोष्ट', 'बाबा हरवले आहेत' आणि 'राजा राणीला घाम हवा' या त्यातल्याच तीन नाटिका. नंतर 'राजा राणीला घाम हवा' या एकांकिकेवर आधारित एक बालचित्रपट व्ही. शांताराम यांनी निर्माण केला, ज्याचे दिग्दर्शन आईने केले होते. कालांतराने आईने पंडित जसराज यांच्या पत्नी मधुरा जसराज यांच्यासाठी भा. रा. भागवत यांच्या प्रसिद्ध फास्टर फेणेच्या साहसकथांवर आधारित एक दूरदर्शन मालिकाही दिग्दर्शित केली.

विल्सन कॉलेजमध्ये नाटकांमुळेच आईची ओळख पप्पांशी म्हणजे अरविंद देशपांडेंशी झाली. जरी ते आई कॉलेजमध्ये येण्याआधी पदवी मिळवून बाहेर पडले होते तरी ते कॉलेजच्या एकांकिका बसवत होते. तिथे त्यांची एकमेकांशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमात आणि नंतर यथासांग लग्नात झाले. आईला एकच चिंता होती, लग्नानंतर आपल्याला नाटकात काम करता येईल की नाही. पण पप्पांनी अटच अशी घातली की लग्नानंतर नाटक सोडणार असशील तर लग्न करणार नाही. मग सुलभा कामेरकरची सुलभा देशपांडे झाली. मधल्या काळात म्हणजे लग्नाआधी दोघांचेही नाटक करणे चालूच होते. पप्पा रंगायन या नाट्यसंस्थेशी जोडले होते. आईही सहभागी झाली. त्यावेळी विजया मेहता या रंगायनच्या सर्वेसर्वा होत्या. रंगायनतर्फे झालेल्या 'शितू', 'बाधा' या व इतर नाटकांशी आई एक अभिनेत्री आणि विद्यार्थी या दोन्ही नात्यांनी जोडली गेली. अरुण काकडे हा पुण्याचा नाटकवेडा तरुणही त्यांना येऊन मिळाला. पुढे विजयाबाईंशी झालेल्या वैचारिक मतभेदांमुळे अरविंद, सुलभा, काकडे आणि इतर नव्या दमाची मंडळी बाहेर पडली आणि त्यांनी 'आविष्कार'ची स्थापना केली. 'आविष्कार' हे नाव आईनेच सुचवले. त्यांच्याबरोबर सरोजिनी आणि शंकर वैद्य, माधव आणि प्रेमा साखरदांडे, विजय तेंडुलकर, बाळ कर्वे, शांताराम पवार असे अनेकजण त्यांना येऊन मिळाले. व्यावसायिक रंगभूमीवरही आई आणि पप्पांची मुशाफिरी सुरू होती. कमलाकर आणि लालन सारंग, मोहन वाघ यांच्यासारखे जिवलग मित्र त्यांना व्यावसायिक रंगभूमीनेच दिले.

रंगभूमी संभाळून पप्पा बरीच वर्षे वालचंद समूहात नोकरी करू शकले ते विनोद दोशी या त्यांच्या नाटकवेड्या मित्राच्या सहकार्यामुळे. पण जेव्हा नोकरी की रंगभूमी अशी आणीबाणीची वेळ आली, तेव्हा आई म्हणाली की अरविंद तू नोकरी सोड, पण तुझ्यातल्या नाटकाला मारू नकोस. आपली काही वर्षे अडचण होईल, पण मी बघते. तू नाटक कर. मी चित्रपट करते. जे पैसे येतील, त्यात संसार करू आणि नाटकही. खरे सांगायचे तर त्या काळात नाटकातून इतका पैसा मिळत नव्हता. मग आईने रंगभूमी सोडून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि आपल्या मनस्वी अभिनयाच्या जोरावर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपले स्वतःचे असे स्थान निर्माण केले. तीच गोष्ट पुढे मराठी, हिंदी मालिकांबाबतही घडली. आईची कारकीर्द साधारण २००च्या वर हिंदी चित्रपट, ५०च्या वर मराठी चित्रपट, १७५हून अधिक हिंदी आणि १००हून अधिक मराठी मालिका तसेच अनेक प्रायोगिक नाटके इतकी प्रचंड आहे. मालिका, चित्रपट यात यश मिळाले तरी आईचे आणि पप्पांचेही खरे प्रेम हे रंगभूमीच होते. पप्पा त्यामानाने लवकर म्हणजे वयाच्या ५५व्या वर्षीच गेले. पण ते आणि पुढची २९ वर्षे आई आविष्कारशी कायमचे जोडले होते. 'आविष्कार'च्या तुघलकपासूनच्या प्रत्येक कलाकृतीमध्ये पप्पांचा आणि आईचा सहभाग होता आणि अर्थातच काकडे काकांचाही. 'आविष्कार'ची अनेक स्थित्यंतरे, खडतर काळ आईने बघितले. एकदा तर 'आविष्कार' बंद व्हायची वेळ आली. पण आई, काकडेकाकांसारखी खंबीर माणसे होती म्हणून 'आविष्कार' आणि पर्यायाने प्रायोगिक रंगभूमी तरली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. अनेक समविचारी दिग्गजांची, अभ्यासू कलाकारांची मिळालेली साथही महत्त्वाची होती. एकदा लहानपणी मी खूप आजारी असतानाही सत्यदेव दुबेंच्या एका महोत्सवातल्या नाटकात मुख्य भूमिकेसाठी अगदी आयत्या वेळेला उभे रहावे लागले असतानाही ती कोलकात्याला गेली. कारण पप्पांनी निक्षून सांगितले, 'शो मस्ट गो ऑन'. पप्पांच्या आईनेही सांगितले की, निनादची काळजी करू नकोस. आम्ही सगळे आहोत. दोन दिवसांनी माझा ताप उतरला आणि आईने निश्चिंत मनाने तो प्रयोग केला. आईने जिजीमावशीच्या म्हणजे प्रेमाताईंच्या मदतीने १९७९मध्ये 'आविष्कार'ची मुलांची शाखा 'चंद्रशाला' सुरू केली.

'चंद्रशाले'तर्फे पहिल्यांदा तेंडुलकरांच्या 'बाबा हरवले आहेत', 'एका बॉबीची गोष्ट' आणि 'राजा राणीला घाम हवा' या तीन एकांकिका दिग्दर्शित केल्या. नंतर माधव साखरदांडेंनी लिहिलेली 'अपना हाथ जगन्नाथ', 'पंचतंत्र' आणि 'दुर्गा झाली गौरी' हे नृत्यनाट्य झाले. त्यातील कलाकार आणि ७०/७५ लहानमोठ्या मुलामुलींची मोट व्यवस्थित बांधली होती ती आई, पप्पा आणि काकडेकाकांनी. यात त्या मुलांच्या पालकांचाही मोठा सहभाग होता... दुर्गाच्या तालमी रात्रीपर्यंत चालायच्या... आईने मला निक्षून सांगितले होते की, शेवटची मुलगी सुखरूप घरी गेल्याशिवाय जर तू घरी आलास, तर मी घरात घेणार नाही. एकदा मी क्रिकेटची मॅच पाहायला लवकर घरी आलो, तेव्हा तिने मला उलट पावली परत पाठवले. ही शिस्त मी विसरूच शकत नाही. तसेच एकदा दुर्गाच्या दौऱ्यावर जाताना तांत्रिक बिघाडामुळे आणि टायर फाटल्यामुळे आमची बस ६ तास विलंबाने पोहोचली, तेव्हा आई आणि पप्पांचा पहिला प्रश्न होता की टायर फाटला तेव्हा निनाद काय करत होता? जेव्हा त्यांना कळले की, मी बसच्या चालक आणि क्लिनरला टायर बदलायला मदत करत होतो, तेव्हा त्यांनी माझे केलेले कौतुक स्मरणात आहे. आई, पप्पांनी जबाबदारीची तेव्हा दिलेली जाणीव मी अजूनही विसरलो नाही. आई, पप्पांसारखी माणसे आता होणे नाही. जून २०१६चा पहिला आठवडा. आई पित्ताशयाच्या कर्करोगाने आजारी होती. तो दिवस होता ४ जून आणि ती वेळ होती संध्याकाळचे ५.४०. आईने या जगाचा निरोप घेतला आणि आम्हाला नि:शब्द केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2741

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>