प्रेमाचा हा प्रवास आमच्यासाठी सोपा नव्हता. आधी भेटणं, मग पहिली नजरानजर, मग चोरून पाहणं, मग विचारणं, मग तिनं तिच्या दृष्टीनं पुरेसा आणि माझ्या दृष्टीनं फाऽऽऽरच वेळ घेणं अशी सगळी वळणं आली. आम्ही पहिल्यांदा भेटलो, तेव्हा ती बारावीत होती आणि मी शेवटच्या वर्षाला. दोन्ही वर्षं फार महत्त्वाची म्हणून आम्ही एकमेकांकडे फक्त पाहत राहिलो. 'पीजीशिवाय आजच्या जगात पुढं काही होणार नाही,' हे आमचं मत घरच्यांना पटल्यामुळे म्हणा किंवा खरं तर तिच्यामुळे म्हणा, मी मास्टर्स करण्यासाठी आमच्याच कॉलेजात अॅडमिशन घेतली आणि प्रेमाचं मिशनही पुढे सरकलं. मास्टर डिग्री आणि प्रेमाची कबुली एकाच वेळी पदरी पडली. प्रेम कसं असावं, प्रेमासाठी कितीही वाट पाहावी लागली, तरी कशी पाहावी, याचं उदाहरणच मी निर्माण केलं आणि पुढं येणाऱ्या बॅचसाठी आदर्श निर्माण केला. आमच्या कॉलेजातल्या भिंतीही हेच सांगतील. यादरम्यान कोणत्याही सिनेमात घडते, तशी घटना आमच्याही आयुष्यात घडली. तिच्या घरी कुणकुण लागली. 'प्रेमबिम करायचं नाही', 'आम्ही जिथं सांगू, तिथंच लग्न करायचं', 'आम्ही मेल्यावर काय करायचं ते करा...' यातलं काहीच घडलं नाही. त्यांनी मला घरी बोलावून घेतलं आणि आम्हा दोघांसह सारी वरात आमच्या घरी दाखल झाली. आमच्या घरचेही त्यांच्यासमोर शांत होते. ही मंडळी आपल्या घरी गेल्यानंतर त्यांनी झाडलेल्या फैरी, हा वेगळा विषय; पण दोन्हीकडून हिरवा कंदील मिळाला. अट एकच, मी नोकरी मिळवणं, ती टिकवणं आणि बचत करून दाखवणं. या अटीत दुसरी अट सरकारी होती. त्यापैकी मी एकवीस वर्षांचा होतोच. तिचं शिक्षण पूर्ण झालं आणि मी सांगितलेली अट पूर्ण केली, की लग्न... 'पुढचं तुम्ही दोघं काय ते ठरवा,' इति दोघांच्या मातु:श्री.
अखेरीस आमची प्रेमाची नौका लग्नाच्या मंडपापर्यंत पोहोचणार होती. आता काहीही अडथळे नव्हते. आम्ही भेटत होतो, बोलत होतो, तासतासभर फोन चालू होते... सारं काही यथासांग! माझी नोकरी, पगार वगैरे गोष्टी दोन्ही बाजूला मान्य झाल्या होत्या. तिचं शिक्षणही पूर्ण होत आलं होतं. त्यानंतर तिचं पीजी आणि नोकरी हेही ठरल्यासारखं होतं. आता तो क्षण... दोन्ही घरांत तीच चर्चा. एवढी वर्षं वाट पाहिल्यानंतर स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण जवळ आला आणि...
आणि सरकारनं मुलीच्या लग्नाचं वय २१ ठरविल्याची बातमी आली... हा हंत हंत... खऱ्या प्रेमानं वाट तरी किती पाहायची? एवढे दिवस झाले, अजून एखादं वर्षं... हे बोलायला सोपं असतं... माझ्यासारख्यानं काय करावं? ज्यांचं आधीच ठरलं आहे, त्यांच्यासाठी काही सूट नाही का नियमातून?
- चकोर
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट