मंथनाचा प्राथमिक विषय होता, विधान परिषदेच्या निवडणुकीत मिळालेलं एक मत. हा अनेकांसाठी संशोधनाचा विषय ठरेल, हे चांगलंच ठाऊक असल्यानं मंथन गरजेचंच होतं.
हे मंथन रेशीमबागेत करण्याची त्यांची अतीव इच्छा होती; मात्र मनाला आवर घातला. हा स्वभावाचा भाग नव्हता खरं तर; पण स्वभावाला आवर घालावा लागणार याचीही त्यांना पुरेशी कल्पना आली. त्यांनी मंथनाची जागा बदलली. बडकस चौकही त्यांच्यासाठी काही नवा नाहीच. नव्या पक्षाचं मुख्यालय हाकेच्याच अंतरावर. पक्षात आलो तेव्हाची लगबग ऐतिहासिक होती म्हणे! हे आठवून काळजीत पडले. ही काळजी दूर सारण्यासाठी ते इकडंतिकडं चोहीकडं बघू लागले. आपल्याकडे बघणाऱ्या नजरा नव्या वाटू लागल्या. बघणारा माणूस आपल्याकडं संघाच्या नजरेतून बघतोय, की काँग्रेसच्या डोळ्यांतून हे कळू लागलं. चिंता वाटली. ही चिंता त्यांनी मनात ठेवली. मनात ठेवण्याच्या अशा किती तरी गोष्टी आहेत, कशाकशाची यादी करू असाही विचार मनात आला. मनातच ठेवला.
इकडं हे अशा भावगर्भ विचारांत असतानाच, तिकडे कच्ची पाटोडी कढईत जाण्यास रेडी होती. आपणही कोणत्याही परिस्थितीसाठी रेडी असायला हवं, असं भाऊंना वाटलं. मनाची तयारी महत्त्वाची होती. आतापर्यंत जी काही 'दक्ष' शिकवण मिळाली, ती बाजूला सारून नव्या पक्षाचे नवे धडे कसे गिरवायचे, हा दीर्घ मंथनाचा विषय होता. अंतर्मनातले हे असे पेच अंतर्मनातच राहू द्यायचे, ही शिकवणही जुनीच. नव्या पक्षात ती कितपत कामात येईल, हा गोंधळ मोठा. निवडणुकीच्या ऐन आदल्या दिवशी उमेदवार बदलाचा जो 'नाना' पद्धतीचा गोंधळ घातला गेला, त्याच्या तुलनेत हा मनातला गोंधळही काही छोटा नाहीच. वाटून गेलं!
पाटोडी तळणं सुरू होतं. चांगली फूटभर असल्यानं कढईत एकावेळी दोन-तीनच पाटोड्या स्वत:ला तळवून घेत होत्या. असं स्वत:ला वळवून घेता आलं पाहिजे, असं भाऊंना वाटून गेलं. आपल्याला काय वाटतं, हे कुणी जाणून घेईल का, असा विचार मनात येऊन गेला; पण 'इथं जास्त विचार करायचा नसतो. विचार करण्याचं काम माजी पक्षाचं, आजी पक्षात पाहावं आणि उगी राहावं!' असं एका जाणकारानं सांगितलं होतं. असे कितीक धडे घ्यावे लागणार होते!
मनातला अस्वस्थ गोंधळ.
मनातला गोंधळ बाजूला सारण्याचा प्रयत्न सुरू असतानाच गरम गरम पाटोडीची प्लेट हाती आली. भाऊ पाटोडीचा आस्वाद घेत पुन्हा विचारांत आकंठ बुडालेच... जुनी शिकवण सुसह्य होती, की नवे धडे असह्य होतात.
- चकोर
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट