Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2741

उद्याशी संवाद...

$
0
0

'रिओ दी जानेरो' या महानगराच्या जुन्या बंदर भागात नुकतीच एक वास्तू उभी राहिली आहे. त्याचा या शहराशीच नव्हे तर या जगाशीही काहीही संबंध दिसत नाही. परग्रहावरची किंवा विज्ञान काल्पनिकेतील वाटावी अशी ही वास्तू दिसायला सौरऊर्जेवर चालणाऱ्या यांत्रिक डायनासॉर किंवा अजस्त्र वातानुकूल यंत्रणेसारखे आहे. वास्तवात ते वस्तुसंग्रहालय आहे. उद्याचे वस्तुसंग्रहालय असे नाव देण्यात आलेली ही वास्तू जगातील असामान्य इमारतींपैकी एक आहे. चालू आठवड्यात त्याचे उद‍्घाटन झाल्यानंतर ती कला आणि विज्ञानाच्या असामान्य संगमाबरोबरच उद्याच्या जगाला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांवरील उपायांचे खंबीर प्रतीक बनण्याची अपेक्षा आहे.

चारशे कोटी रुपये खर्चून बांधलेली ही संस्था मानवजातीला सध्या घेरलेल्या पर्यावरणाचा ऱ्हास, मानवजातीच्या अस्तित्वाला असलेला धोका, इथपासून सामाजिक पतनापासून वाचवायचे असेल तर माणसाला करावे लागणारे बदल या विषयाला वाहिलेली आहे. त्याचबरोबर, या शहरातील ज्या बंदर भागात ती उभी आहे, त्या भागातील गेल्या काही वर्षांत झालेल्या नाट्यमय बदलाचेही ती प्रतीक आहे. या भागाचे गुन्हेगारीमुळे झालेले पतन आणि आता श्रीमंतांच्या गर्दीने झालेले उत्थान म्हणजे जगभरातील नगररचनाकारांसाठी एक धडा आहे. दहा वर्षांपूर्वी हा भाग गरिबी आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या गुन्हेगारीचे धोकादायक केंद्र होते, यावर आज कोणी विश्वास ठेवणार नाही. कारण, आज सुमारे १२०० चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या रिओ शहरातील सर्वाधिक आलिशान भाग हाच आहे.

या परिसराचा कायापालट करण्यासाठी सुरू झालेल्या पुनर्विकासात नवे पूल, नवे टॉवर आले आणि हे वस्तुसंग्रहालय त्या बदलाच्या प्रतीकाच्या रूपात दोन वर्षांत उभे राहिले. मात्र, त्याची उपयोजितता त्याहूनही अधिक आहे.

शहरातील सर्वांत मोठे पर्यटन आकर्षण केंद्र ठरणारे हे संग्रहालय स्पॉन्सरच्या मदतीने उभारले असून अन्य इमारतींपेक्षा तब्बल ४० टक्के कमी ऊर्जा वापरते. ९ टक्के ऊर्जा ती सूर्यापासून मिळवते आणि त्याची रचना बदलत्या पर्यावरणानुसार अंतर्गत बदल साधणारी आहे. त्याची वातानुकूलित यंत्रणा जवळच्या खाडीतील पाण्याचा स्रोत वापरते.

विज्ञान आणि पर्यावरणविषयक अन्य संग्रहालयापेक्षा हे वेगळे ठरते ते त्याच्या आशयाने. त्याचे संचालक ह्यूगो बारेटो यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा आपण भविष्य म्हणतो, ते खूप दूर आणि लांब असते. म्हणून आम्ही याला उद्या म्हणतो, जे अधिक निकट आहे. इतके की, आपण जे आज करतो, त्याचा त्या उद्यावर परिणाम होत असतो.

मात्र, याचा अर्थ त्यातील फेरफटका अजिबात गंभीर स्वरूपाचा नाही. फेरफटक्याची सुरुवात होते ती आठ मिनिटांच्या फिल्मने. तुमची सर्व इंद्रिये आणि अवकाश व्यापणारी ही फिल्म अंडाकृती थिएटरमध्ये नऊ प्रोजेक्टरद्वारे दाखवली जाते. 'सिटी ऑफ गॉड' या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक फर्नांडो मिरेलीस यांनी दिग्दर्शित केलेला या फिल्ममध्ये विश्वाच्या १३.७ अब्ज वर्षांच्या विश्वाच्या बदलत्या स्वरूपाचा अनुभव आठ मिनिटांत येतो.

त्यानंतरची तीन दालने पदार्थविज्ञान, जीव आणि जनुकशास्त्र, आणि मज्जासंस्थेशी निगडीत आहेत. त्याच्या पुढे या वस्तुसंग्रहालयाचे मुख्य अंग आहे. त्यात मानवाची पृथ्वीवरील उत्क्रांतीपासून आजच्या जळणाऱ्या जंगलापर्यंत आणि वितळणाऱ्या हिमखंडांपर्यंतची अतिभव्य जिवंत दृश्ये डिजिटल आणि अन्य कला-विज्ञानाच्या साह्याने साकारण्यात आली आहेत. त्याच्या जोडीला पर्यावरण आणि ऊर्जाविषयक आज घडीला सातत्याने बदलणारा माहितीचा स्रोत आहे. आपण या पृथ्वीवर मानव म्हणून दोन लाख वर्षे आहोत, मात्र या दोन लाख वर्षांत बदलले नाही, इतकी पृथ्वी आपण गेल्या अर्धशतकात बदलून टाकली आहे. आणि केवळ अधिकाधिक फस्त करून... असा त्याचा संदेश आहे.

लोकांनी येथे यावे, त्यांना वास्तव जाणून धक्का बसावा मात्र त्यांनी त्यापासून अलिप्त राहण्याची वृत्ती बदलावी, हा हेतू या उद्याच्या बदलाची अपेक्षा करणाऱ्या संग्रहामागे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2741

Trending Articles