ही स्पर्धा घेताना दोन वर्षांपूर्वी हा एक विक्रम होऊ शकतो का, असा विचार मनात आला. त्यासंदर्भात लिम्का बुक ऑफ रेकॉर्डकडे चौकशी केली. त्यांनाही हे नवीन वाटले आणि त्यांनी काही गोष्टींची पूर्तता करण्यास सांगितले. गेल्या ३३ वर्षांचे कागदपत्र गोळा करायला लागणार होते. हे करणे सोपे काम नव्हते. मात्र जुने कागद, फोटो शोधण्यास सुरवात केली आणि सर्व कागद पाठवले. हे कागदपत्र तिथे पोहोचल्यानंतर अखेर आम्हाला कळवण्यात आले की सुगम संगीत स्पर्धेचा हा एक राष्ट्रीय विक्रम झाला आहे. त्याबद्दल आम्हाला एक प्रमाणपत्र देण्यात आले.
ही स्पर्धा सुरुवातीला मुंबईमध्ये सुरू केली होती. त्यानंतर मग नाशिक आणि पुणे या केंद्रांवरही १९९६ साली या स्पर्धेला सुरुवात झाली. कालनिर्णय या संस्थेने प्रायोजकत्व दिल्यामुळे मुंबईच्या बाहेर प्रथमच तेथील संस्थेच्या मदतीमुळे ही नवीन केंद्रे सुरू झाली. पाठोपाठ कोल्हापूर आणि नागपूर या केंद्रांवरही स्पर्धा सुरू झाली.
ही स्पर्धा सुरू झाली, तेव्हा टीव्हीवर संगीतविषयक स्पर्धा होत नव्हत्या. त्यामुळे या स्पर्धेमध्ये अनेक चांगले कलाकार पारितोषिक मिळत नाही, तोपर्यंत भाग घेत होते. आजचे गाजलेले कलावंत ऋषिकेश रानडे, मधुरा दातार, विभावरी आपटे, अपूर्वा गज्जला, सावनी दातार -कुळकर्णी, ऋषीकेश कामेरकर, जसराज जोशी, प्रियांका बर्वे, तनुजा जोग, सायली जोशी, पूजा गायतोंडे, रसिका गानू, शमिका भिडे, अवंती पटेल, मधुरा कुंभार असे अनेक गाजलेले चेहरे या स्पर्धेचे पारितोषिक विजेते होते. मुंबईमधून आशा पारसनीस, राजश्री केळकर-फाटक , भावदीप जयपूरवाले, सार्थक दासगुप्ता या कलावंतानीही या स्पर्धेत भाग घेतला होता आणि आता त्यांना आम्ही परीक्षक म्हणून निमंत्रित करतो. आमचे परीक्षक नावाजलेले संगीतकार व गायक होते आणि असतात.
या स्पर्धेला आलेला प्रतिसाद पाहून मग चिपळूण, रत्नागिरी, औरंगाबाद, बेळगाव, बारामती, इंदूर, मडगाव, जळगाव, अकोला, बडोदा येथे नवीन केंद्रे सुरु केली. त्यातील काही केंद्रे बंद करावी लागली. आज २०१५ साली ९ केंद्रावर स्पर्धा चालू आहे. पारितोषिक विजेत्या कलाकारांना दरवर्षी मे महिन्यात दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या रंगमंचावर त्यांची कला सादर करण्याची संधी दिली जाते. दरवर्षी अंतिम फेरीसाठी निवडलेल्या स्पर्धकांसाठी एक प्रशिक्षण कार्यशाळा घेतली जाते. या कार्यशाळेत संगीतकार कौशल इनामदार, कमलेश भडकमकर, मिथिलेश पाटणकर, वर्षा भावे, मिलिंद जोशी, विनय राजवाडे आणि विकास भाटवडेकर हे दिग्गज मार्गदर्शन करतात. त्यांना नाट्यसंगीत स्पर्धेत भाग घेण्याची संधी दिली जाते. सर्व स्पर्धक तीन दिवस मुंबईला येतात. अर्थात ज्यांची राहण्याची सोय नसते, त्यांना आम्ही ती करून देतो. हे सगळे कलाकार एकत्र आल्याने त्यांना ते इतरांच्या स्पर्धेत कुठे आहेत हे समजते आणि पुढील वर्षी मग ते जोरदार तयारी करून येतात. ही स्पर्धा आणि कलाकारांना मिळणारी संधी इथेच संपत नाही. त्यांना विविध कार्यक्रमांसाठीही आम्ही बोलावतो. शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या कलावंताना आमच्या युवा महोत्सवात गाण्याची संधी देतो. आज बरेच शास्त्रीय संगीताचे कलावंत याच स्पर्धेतून आलेले आहेत. रुचिरा केदार, गायत्री वैरागकर , हेमांगी भगत, कनकश्री भट, मृण्मयी फाटक, रमाकांत गायकवाड, राधिका जोशी-रे, ऋतुजा लाड हे यातील काही कलावंत.
अशा या स्पर्धेचे हे ३५वे वर्ष आहे. या स्पर्धेला २५ वर्षे झाली, त्यावेळेस आम्ही मुंबई, नागपूर आणि कोल्हापूर येथे खास कार्यक्रम आयोजित केले होते. आता हा विक्रम झाल्याबद्दल एक मोठा कार्यक्रम आयोजित करण्याचा आमचा मानस आहे. या कार्यक्रमात स्पर्धेतील काही विजेत्या स्पर्धकांचा मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम आणि आत्तापर्यंत स्पर्धेत ज्यांना पारितोषिके मिळाली, अशा सर्व स्पर्धकांना आम्ही एकत्र आणणार आहोत. या निमित्ताने हे सगळे स्पर्धक एकमेकांना भेटू शकणार आहेत.
-अशोक केळकर, दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट