जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी' अशी एका म्हण पूर्वापार काळापासून आहे. प्रत्येक कुटुंबातील स्त्री स्वतःच्या कुटुंबाची काळजी घेते; पण स्वतःच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष करते. त्यातून अनेक समस्या निर्माण होतात. म्हणूनच प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली तरच संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य चांगले राहील. हल्लीच्या काळातील नोकरदार महिला व कुटुंबाचा डोलारा सांभाळणाऱ्या महिलांसाठी खास हा लेख.
प्रत्येक स्त्रीला स्वतःचे आणि कुटुंबाचे आरोग्य यांमध्ये समतोल राखता आले पाहिजे. मुलगी जन्माला आल्यापासून तिचे आरोग्य, चांगले शिक्षण, आहार व व्यायाम याकडे स्त्रीने लक्ष दिले पाहिजे. मुलगी सुदृढ झाल्यावरच तिचे लग्न झाले पाहिजे. लहान वयात तिचे लग्न करू नये, याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे. लग्न झाल्यावर पहिल्या अपत्यासाठी घाई करू नका. नवीन वातावरणात मुलीला रुळू द्या.
वीस ते तीस वर्षे हे वय हा पहिल्या अपत्यासाठी योग्य काळ आहे. गरोदर राहिल्यावर कोणताही त्रास जाणवत नसला तरीही गरोदर महिलेने प्रत्येक महिन्यात स्त्री रोग तज्ज्ञाकडे जाऊन तपासणी करणे आवश्यक आहे. गरोदर स्त्रीने सकस आहार घेतला पाहिजे. प्रसूती शक्यतो हॅास्पिटलमध्येच जाऊन करावी. ग्रामीण भागात हॅस्पिटल नसल्याने प्रशिक्षित दाईकडूनच करून घ्यावी. माता व बाळाच्या आरोग्यासाठी स्तनपान अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. ते बाळासाठी अमृतासमान आहे. त्यामुळे बाळाची प्रतिकारशक्ती वाढते. त्याशिवाय बाळाचे आईशी भावनिक नातेही जुळते.
दोन अपत्यांमध्ये अंतर ठेवण्यासाठी कुटुंब नियोजन करणे आवश्यक आहे. प्रत्येक महिलेने वयाच्या पस्तीशीनंतर स्वतःची काळजी घ्यावी. या वयात प्रत्येक स्त्रीने पॅप स्मिअर चाचणी करणे आवश्यक आहे. कोणताही त्रास नसला तरी ही चाचणी करणे आवश्यक आहे. सर्व सरकारी हॉस्पिटलमध्ये ही चाचणी मोफत होते. या चाचणीमुळे पिशवीचा व योनीमार्गाचा कॅन्सर झाला असेल किंवा पुढील पाच वर्षात होणार असेल तर आधीच समजतो. त्यासाठी ही चाचणी आवश्यक आहे.
चाळीशीत आल्यावर तिला पाळीचे विकार येतात. रक्तस्त्राव जास्त होत असेल किंवा महिन्यातून दोनदा पाळी येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता स्त्री रोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. मासिक पाळी बंद झाल्यावर स्त्रियांमध्ये वजन वाढण्याची व हार्ट अॅटॅकची समस्या वाढते. अशावेळी वार्षिक आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट