आयुष्य म्हटले की ताणतणाव ओघानेच येतात. ऑफिसमधले राजकारण, तिथले ग्रुपीझम.. घर-संसार म्हटला की भांडणे, रुसवे-फुगवे... अशावेळी मानसिक ताण घेण्यापेक्षा वस्तुस्थिती स्वीकारून सकारात्मक विचार करणे, हा ताण कमी करण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यावर अधिक माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करूया...
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात कोणत्या कारणावरून ताण येईल याचा नेम नसतो. या ताणामागील प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असतात. झोप न येणे, नोकरीच्या ठिकाणी असलेला कामाचा ताण, मुलांचे शिक्षण, आरोग्याच्या समस्या अशी विविध कारणे ताण निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरतात. आयुष्यात एखादी गोष्ट करताना वाईट अनुभव आला तर, ती गोष्ट पुन्हा कराविशी वाटत नाही, त्याची भीती वाटते. त्यामुळे नकारात्मकताही वाढते. त्याचा परिणाम कामावर होतो. अनेकदा काम करताना कंटाळा येणे, कामात स्वारस्य रहात नाही. इच्छा असूनही काम होत नाही. या सगळ्या गोष्टींमुळे मानसिक ताण वाढतो आणि स्वभावात चिडचिडेपणा येतो.
एखाद्या व्यक्तीच्या स्वभावात अचानक बदल झाला असे लक्षात येते. पूर्वी सतत हसणारी व्यक्ती अचानक चिडचिडी होते. कामावर सतत गैरहजर राहते, वागणण्यात अमूलाग्र बदल होतो, हातातले काम न संपणे, गबाळ्यासारखे कामावर येणे, कोणातही मिसळत नाही असे बदल कुणाच्याही वागण्यात दिसला तर त्याच्या जवळील किंवा अवतीभवती वावरणाऱ्यांनी त्या व्यक्तीला नेमकी कोणती समस्या आहे हे जाणून घ्यावे, त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करावा.
एखादा सहकारी कामात कुठे कमी पडत असेल, असे लक्षात आले तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. त्याला वाईट बोलण्यापेक्षा त्या व्यक्तीला कामासाठी प्रोत्साहन कसे देता येईल हे पहायला हवे. सहकाऱ्यांनीच त्या व्यक्तीला प्रोत्साहन दिले तर, त्याच्यात सकारात्मकता वाढेल. ताण वाढला की उच्च रक्तदाब, डायबेटिस असे आजार होतात. त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे ताणतणावात असलेल्या व्यक्तीला त्यातून कसे बाहेर काढता येईल याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. ताण आल्यावर काय कराल
स्वतःला व्यक्त करा.
योगासने, मेडिटेशन, व्यायाम, खेळ खेळा.
लांब फिरायला जा.
सकारात्मक पुस्तके वाचा
कामात मन रमत नसेल तर दुसरी नोकरी शोधा
रागाच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका
आपल्या कामाचा आनंद घ्या.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट