स्मार्ट बोर्ड, इंटरअॅक्टिव्ह मॉनिटर, टॅब, प्रोजेक्टर, सोलार स्मार्ट स्कूल, चाईल्ड थिअटर क्लास रूम्स या सोयी पष्टेपाड्यातील 'जिल्हा परिषद शाळे'मध्ये आहेत. महाराष्ट्र राज्याला 'चित्ररूप शाळा अर्थात डिजिटल स्कूलची व्याख्या उलगडून सांगणाऱ्या अवलियाचे नाव संदीप गुंड...
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अगदी दुर्गम गाव असलेल्या पष्टेपाड्यातील जिल्हा परिषद शाळेवर वर्षांपूर्वी 'शिक्षणसेवक' म्हणून रुजू होताना डी. टी. एड. झालेल्या संदीप गुंड यांच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. काहीतरी भव्यदिव्य करून दाखविण्याची जिद्द उराशी बाळगून अहमदनगर येथील पारनेर तालुक्यातील 'वडगाव गुंड' या छोट्याशा गावातून पष्टेपाड्यातील जिल्हा परिषद शाळेवर आलेल्या संदीपचे शाळेच्या शेवाळलेल्या भिंती, गळके छप्पर, कोंदट वर्ग पाहून खरेतर मनोमन अवसान गळाले, आणि त्याने शाळेवर रुजू होण्यास स्पष्टच नकार दिला. मात्र, संदीपचे सहकारी शिक्षक पंढरीनाथ डोंगरे आणि केंद्रप्रमुख महेंद्र दिमते यांनी त्याला मानसिक आधार दिला. मग संदीप थांबला. प्रवाहाच्या विरुद्ध काहीतरी करून दाखविण्याची ध्येय मनात असलेल्या संदीपने मग गावातील शाळेसोबत विद्यार्थ्यांचा आणि पष्टेपाड्याचा अभ्यास सुरू केला.
शाळेची दूरवस्था आणि तेथील नीरस वातावरण पाहून तेथे शिकूच नये, अशी मानसिकता पष्टेपाड्यातील विद्यार्थ्यांची झाल्यास नवल नव्हते. पाड्यावरील मुले तासन्तास गावच्या पाटलांच्या घरी असलेल्या टीव्हीसमोर ठाण मांडून बसतात, ही बाब संदीपने हेरली. त्यातच शाळेच्या टेबलावर खिशातील मोबाईल काढून ठेवताच मुलांची होणारी गर्दी पाहून त्यांचे 'स्क्रीन'प्रती असणारे आकर्षणही संदीपने हेरले, आणि राज्यातील हायटेक अशा 'डिजिटल शाळे'चा पर्याय संदीपच्या मनात चमकून गेला. मग तो या कल्पनेशी दिवस-रात्र खेळू लागला.
'सर्व सोंगे आणता येतात, पण पैशाचे सोंग घेता येत नाही', या उक्तीप्रमाणे 'डिजिटल शाळेसाठी' पैशांची चणचण होतीच. मोलमजुरी, शेतीची कामे करून उदरनिर्वाह करणाऱ्या पाड्यावरील गावकऱ्यांना त्यांच्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तंत्रज्ञानाची असणारी गरज संदीप आणि केंद्रप्रमुख दिमते यांनी समजावून सांगितली. मात्र, गावकऱ्यांसोबत सुरू असणाऱ्या चर्चेतूनच एक महिला तडक उठून गेली. थोड्या वेळाने परत येऊन तिने घरातून आणलेले एक हजार रुपये संदीप सरांसमोर ठेवले. त्या महिलेचे नाव 'निर्मला पष्टे', त्यांची मुलगी त्यावेळी पाड्यातील जिल्हा परिषद शाळेत शिकत होती. मग पाड्यावरील गावकऱ्यांना डिजिटल शाळेची कल्पना रुचली आणि लोकसहभागातून, पष्टेपाड्याचे सरपंच काशीनाथ पष्टे यांच्या सहकार्यातून आकाराला आली. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेची पहिली डिजिटल स्कूल जन्माला आली.
सुरवातीच्या काळात उपलब्ध साधनांच्या साह्याने संदीपने रंजक अध्ययनाचे धडे मुलांना शिकविले. ठाण्यातील 'दुर्गसखा' या स्वयंसेवी संस्थेने दिलेल्या कम्प्युटरच्या साह्याने संदीपसरांनी मुलांचा शाळेकडे ओढा वाढविला. लोकसहभागातून हळुहळू पैशांची जमवाजमव वाढत गेल्यानंतर शाळेच्या अवती-भवती रंगबिरंगी फुलझाडांची लागवड करून शाळेचा आवार हिरवागार, नयनरम्य करण्यात आला. शेवाळलेल्या, गळक्या भिंतींची जागा विविध कार्टून्सने सजलेल्या चाईल्ड थिअटर क्लास रूम्सनी घेतली. खडू-फळ्याऐवजी स्मार्ट बोर्ड, विद्यार्थ्यांच्या हातात पाटीच्या जागी टॅब, टचस्क्रीन बोर्ड, इंटरअॅक्टिव्ह मॉनिटर, हेडफोन्स आदी साहित्यांसह जिल्हा परिषद शाळेचा चेहरामोहरा पूर्ण बदलला. मग संदीपसरांच्या संकल्पनेतून टॉयलेटपासून विद्यार्थांच्या गणवेशापर्यंत प्रत्येकच गोष्टीत आमूलाग्र बदल करण्यात आला. शहरांमधील नामांकित शाळांना लाजवेल, अशी देखणी शाळा संदीपसरांच्या मार्गदर्शनाखाली आणि गावकऱ्यांच्या मदतीने पष्टेपाड्यात अखेर उभी राहिली.
पाड्याला भेडसावणारा विजेच्या प्रश्नामुळे डिजिटल स्कूलमधील उपकरणे वापरण्यावर मर्यादा येत होत्या. यावर 'सोलार स्मार्ट स्कूल' संकल्पनेच्या साह्याने संदीपसरांनी उपाय शोधून काढला. मात्र, पुन्हा सोलार उपकरणांसाठी पैशाचा प्रश्न होताच. त्यासाठी पष्टेपाड्यातील डिजिटल स्कूलची यू-ट्युबवरील चित्रफीत पाहून पुण्यातील श्रद्धा मेहता यांनी भरघोस मदतीचा हात पुढे केला. श्रद्धा मेहता यांनी घरातील लग्नाच्या स्वागत समारंभावरील खर्चावर काट मारून ते पैसे सोलार उपकरणांसाठी पष्टेपाड्यातील डिजिटल स्कूलच्या हवाली केले.
संदीपसरांच्या कामाची दखल २०१४ साली दिवंगत माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनीही घेतली. त्यावेळी गुजरात येथे झालेल्या इंटरनेशनल कॉनफरन्समध्ये कलाम यांनी संदीपसरांच्या 'सोलार स्मार्ट स्कूल' संकल्पनेचे कौतुक करून त्याला खास पुरस्कार दिला. जानेवारी २०१५ मध्ये जालना येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात संदीपसरांना 'यूथ आयकॉन' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मार्च २०१५ साली राष्ट्रपती भवन येथे झालेल्या कार्यक्रमात 'सृष्टीसन्मान पुरस्कार', सह्याद्री वाहिनीकडून जनता दरबार कार्यक्रमात 'सकारात्मक तरुणाई पुरस्कार' आदी पुरस्काराने संदीपसरांना सन्मानित करण्यात आले आहे. शालेय शिक्षणसचिव नंदकुमार यांचे मार्गदर्शन लाभलेल्या संदीपच्या कामाची चित्रफीत नंदकुमारांनी केंद्राच्या कॅबिनेट बैठकीमध्ये दाखविताच राज्यातील शाळा ग्लोबल क्लासरुम्सने सुसज्ज करण्यासाठी १८ कोटी रुपये मंजूर झाले, यातून संदीपसरांच्या कार्यालाच पोचपावती मिळाली.
पष्टेपाड्यातील शाळा डिजिटल केलेल्या संदीपला महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळांना 'हायटेक मार्ग' दाखवायचा होता. दुर्दम्य इच्छाशक्तीने पछाडलेल्या संदीपला पुन्हा एकदा केंद्रप्रमुख महेंद्र दिमते आणि सहकारी शिक्षक संदीप मदगे यांनी बळ दिले, आणि 'मिशन डिजिटल स्कूल अभियान'चा श्रीगणेशा संदीपने 'टॅब'वर केला.
मिशन डिजिटल स्कूल अभियानात मागील तीन वर्षांपासून संदीप गुंड आणि महेंद्र दिमते यांनी महाराष्ट्रातील २५ हून अधिक जिल्ह्यात शिक्षकांचे मोफत ४० वर्कशॉप घेतले. पाड्यापाड्यावरील दुर्गम वस्त्यांमधील सहा हजार शाळांमध्ये फिरून संदीपने डिजिटल स्कूलचे मोल शिक्षक तसेच तेथील गावकऱ्यांना पटवून दिले. त्यातून महाराष्ट्रात लोकसहभागातून ६० ते ७० कोटी रुपये खर्चून डिजिटल शाळांची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे. तसेच, शासन निर्णयप्रणालीत शिक्षणात माहिती तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्याकरिता, 'जिल्हा परिषद, प्रायमरी डिजिटल स्कूल, पष्टेपाडा' हे उदाहरणादाखल दिले जाते, संदीप गुंड यांच्या यशाचे हेच खरे द्योतक आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट