Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2741

व्हावे कलेचे ठाणे!

$
0
0

>> विजयराज बोधनकर

भ्रमंती ही बरेचदा भ्रम दूर करते. त्यासाठी तरी आपल्या देशात फिरावे. म्हणजे बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतात. समाजाचा असाच एक प्रश्न आहे. चित्रशिल्पातलं आपल्याला कळत नाही बुवा! पण त्यासाठी गॅलरीत जाऊन चित्र-शिल्प प्रदर्शन पाहायला हवं. कलावंतांशी बोलायला हवं. समजून घ्यायला हवं. मग आपण जातो का, पाहतो का, बोलतो का? तर बरेचदा उत्तर येऊ शकतं, ते म्हणजे 'नाही'! या 'नाही'ला एक उत्तर आहे. ते अगदी सोपं आहे. सहज वाटेवर, सहज गर्दी जमणाऱ्या जागेवर एखादी नवीन गोष्ट असेल, तर आपण सहज पाहतो. पण ती पाहण्यासाठी कुणी चला म्हटलं की, आपण लगेच टाळतो. याचाच अर्थ काय, तर सहज दिसत असेल, तर ते आपण पाहतो, त्या गोष्टीचा रसास्वाद घेतो. मग ती गोष्ट आपल्या मनाशी जोडली जाते.

हीच गोष्ट चित्र-शिल्प प्रदर्शनाला लागू पडते. या क्षणाला माझ्या चित्रांचे प्रदर्शन कोलकात्याला चालू आहे. अॅकॅडमी ऑफ फाइन आर्ट हे गॅलरीचे नाव आहे. गॅलरीचा सभोवताल सृष्टीने नटलेला आहे. जागोजागी प्रसिद्ध शिल्पे ठेवलेली आहेत. या गॅलरीला जोडून नाट्यगृह आहे. रसिकांना बसण्यासाठी कट्टे केले आहेत. आत खाण्यापिण्यासाठी गार्डन रेस्टॉरंट आहे. एकाला एक जोडून चांगल्या चार गॅलरी आहेत. या वास्तूला वाहता रस्ता जोडून आहे. जवळच मेट्रो स्टेशन आहे. या वास्तूच्या मागे पुन्हा एक मोठ्ठं थिएटर आहे. यालाच जोडून एक ओपन ग्राउंड आहे. तिथे नाटक, संगीत, काव्य, नृत्याचे खुले कार्यक्रम चालतात. बाराही महिने चालतात. या जागेवर लांबून लांबून कलारसिक येतात. कुणी चित्रशिल्प पाहायला, तर कुणी नाटक, कुणी चित्रपट. एक पाहिलं की, दुसरी कला पाहतात. त्याची साखळी जोडलेली असल्यामुळे कुठलीही कला त्यांच्या नजरेतून सुटत नाही.

हे असे का घडते, तर यालाच म्हणतात, मायक्रो प्लॅनिंग. कलाहित आणि समाजहित यांचा खोलवर विचार करणारी मंडळी एकत्र आली आणि याची सूचना केली. तिला यश मिळालं. लोंढेच्या लोंढे येताना दिसतात. चित्र-शिल्प पाहतात, चर्चा करतात. ही सवय कोणी लावली, तर एका समन्वयाच्या वृत्तीने लावली. सत्तर- पंच्याहत्तर वर्षांपासून इथे गर्दीने बाळसं धरलं. आज सहजतेचं धोरण या वास्तूने अमलात आणलं. पहिल्याच दिवशी आमच्या प्रदर्शनाला प्रचंड गर्दी झाली. चर्चाही झाली. चित्रातलं फारसं आम्हाला समजत नाही, असं कुणाच्याही तोंडून ऐकायला मिळालं नाही. याचं प्रचंड समाधान एक कलावंत म्हणून मला मिळालं.

आपल्या जवळच्या पुणे शहरात असंच वातावरण आहे. बालगंधर्व नाट्यगृह आणि कलादालन एकत्र आहे. पुण्याला चित्र पाहायला कलारसिक एकत्र येतात, कलेविषयी बोलतात. वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये आर्ट गॅलरीच्या बाजूला गुजराथी नाट्यगृह आहे. तिथे सतत नाटक, संगीत, नृत्याचे कार्यक्रम चालू राहतात. त्याचं पब्लिक मग प्रदर्शन पाहायला येतं. आणि मग होतो साक्षात्कार चित्रसाक्षरतेचा. आपल्याही ठाणे जिल्ह्यात, शहरात असा साक्षात्कार होऊ शकतो. तीन दिवस ठाणे उपवन फेस्टिव्हलला जो कलारसिक आला होता, तोच कलारसिक मग कायमचा कलेशी जोडला जाऊ शकतो. कला साक्षरता जोर धरते. त्यावर चर्चा होऊ शकते. ठाणे शहराला कलेची अधिक प्रभावळ मिळू शकते. कुठलीही गोष्ट होऊ शकते. त्यालाच शक्यता म्हणतात. कोलकात्यासारखेच कसारसिक राजमान्य, रसिकमान्य, समाजमान्यवर एकत्र आले, तर! एकत्र आले, तर सरस्वतीचा वरदहस्त ठाणे शहराला मिळेल. नाट्यगृह, चित्रपटगृह आणि आर्ट गॅलरी एकत्र आणणारे मनोबल जेव्हा हातात हात घालून चालेल, तेव्हा हा सकारात्मक साक्षात्कार नक्की घडेल.

म्हणून प्रारंभी म्हटल्याप्रमाणे भ्रमंती ही बरेचदा भ्रम दूर करते. काल एका ललित लेखकाचा मला मेसेज आला- 'चित्रातलं फारसं कळत नाही, पण प्रदर्शनाला शुभेच्छा! यावरून हेच सिद्ध होतेय की, त्याची भूक आहे चित्र समजून घेण्याची. तो अव्वल दर्जाचा ललित लेखक आहे. पण त्याला चित्र पाहण्याची संधी त्याचं शहर देत नाही. त्याच्या शहराने कला समन्वयाचा विडा उचलला आणि आर्ट गॅलरी आणि नाट्यगृह एकत्र बांधलं, त्याची भूक शमली, तर त्याचा मेसेज कदाचित असेल, 'तुमच्या चित्रातला आशय कळला. चित्र भावली. प्रदर्शनाला शुभेच्छा!'

जेव्हा माणसाला काही तरी आवडतं, त्या आवडत्या गोष्टीला तो आपल्या घरात स्थानही देऊ शकतो. म्हणजेच, या समन्वयाच्या भूमिकेतून चित्रसाक्षरता आणि चित्रखरेदीही होऊ शकते. एकदा का समाजाला चित्रांची खरेदी करण्याची सवय लागली की, मग ठाणे शहराला, आजुबाजूच्या उपनगराला चित्रकलेची आवड निर्माण होणार आणि मग कलेच्या बाबतीत 'सर्वमंगल मांगल्ये' असे वातावरण तयार होईल.

आपण सारेच ठाणेकर कलादेवतेला, राजमान्य, राजश्री, ईच्छाबळाला साकडं घालूया आणि एकसाथ म्हणूया, व्हय महाराजा! या शहरात एकत्रित कलासमन्वयाची इच्छा पूर्ण होऊ दे! कलारसिक निर्माण होऊ दे! महाराजा, कला विकत घेण्याची इच्छा होऊ दे! व्हय महाराजा! व्हय महाराजा!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2741

Trending Articles