Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2741

पाहणीवर पाणी

$
0
0

नरेंद्र मोदी बराच काळ संघाचे प्रचारक होते. आता त्यांनी पंतप्रधान म्हणून केलेले विदेशदौरे तेथील 'जाहीर सभां'मुळे बरेच गाजले. आता त्यांच्या देशीय दौऱ्यांचीही जाहीर चर्चा होऊ लागली आहे. निवडणूक दौऱ्यात त्यांनी ज्या पद्धतीने बिहारला पॅकेज देऊ केले त्या भूमिकेवर बरीच टीका झाली. राज्याला सरकारी मदत देतानाचा त्यांचा प्रचारकी अविर्भाव अनेकांना खटकला. त्यांच्यावर देशभरातून टीकेची झोडही उठली. पंतप्रधानांचा मूळ प्रचारकी पंथ काही सरकारी अधिकाऱ्यांनी तर स्वीकारला नाही ना, असा संशय घेणारी घटना नुकतीच घडली. यात मोदींचा दोष नसेलही, मात्र देशातील महत्त्वाच्या नेत्यांविषयीची कुठलीही माहिती मूळ संदर्भासह पोहोविण्याच्या अधिकार हिरावला गेल्याची लोकभावना झाली आहे. मोदी यांच्या चेन्नई दौऱ्यातील गाजावाजा प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या (पीआयबी) कृपेने झाला. महाभयंकर प्रलयाने चेन्नईतील जनजीवन अस्ताव्यस्त झाले. एकीकडे सर्व विमानसेवा खंडित झाली असताना पंतप्रधानांनी विशेष हवाई पाहणी करून पूरग्रस्त चेन्नईचा आढावा घेतला. त्या दौऱ्यातील पाहणीच्या मूळ छायाचित्रात मोडतोड करून ते अधिक प्रभावी करण्याचा उपद‍्व्याप पीआयबीला चांगला भोवला. बुडालेल्या शेतींचे धूसर छायाचित्र हटवून जलमय इमारतींचे स्पष्ट छायाचित्र पीआयबीच्या अधिकाऱ्यांनी संकेतस्थळावर टाकले. सजग जनतेला त्यातील खोटेपणा लक्षात आल्याने सोशल मिडियातून सरकारवर चांगलेच वार झाले. अखेर हे छायाचित्र मागे घेण्याची नामुष्की पीआयबीवर ओढवली. 'निवडीमधील चूक' असल्याचे सांगत सरकारी घोळ निस्तरण्याचा प्रयत्न झाला. पाठोपाठ दिलगिरी आली. तसे पाहिले तर सोशल मिडियावरील छायाचित्रे अनेकदा चूक असतात. खोटे संदर्भ बरेचदा फॉरवर्डही होतात. मागे एसिआन शिखर बैठकीत भारत आणि जपानच्या पंतप्रधानांच्या भेटीतील उलट्या तिरंग्याची चर्चा रंगली, मात्र तो फोटोच चूक निघाला. चेन्नईतील मोडतोड मात्र 'राजनिष्ठ' सरकारी अधिकाऱ्याची असल्याने ती बाब गंभीरतेने घ्यायला हवी. वीजबचत आणि निर्मितीच्या सरकारी प्रयत्नांना पुरेशी प्रसिद्धी मिळाली नसल्याची खंत पंतप्रधानांनी शुक्रवारी व्यक्त केली. सरकारी अधिकाऱ्यांनी हा मुद्दा गांभिर्याने घेण्याएवजी प्रसिद्धीची नको ती तजवीज करावी ही गोष्ट खटकणारी आहे. सरकारने माहितीत खोडसाळपणा करण्याऐवजी वास्तविकता पोहचविण्यावर भर द्यावा. आपल्या उत्साहामुळे पंतप्रधानांच्या दौऱ्याचे गांभीर्य उणावले, हे माहिती अधिकाऱ्यांनी विसरू नये.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2741

Trending Articles