बौद्धिक संपदेच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय जाणकार बनलेल्या गणेश हिंगमिरे याची कथा प्रेरणादायी आहेच; परंतु त्याचबरोबर बौद्धिक संपदेबाबत जागरुकता निर्माण करणारीही आहे...
प्रसंग पहिला : घराच्या भिंतीशेजारी लागून असलेल्या थिएटरमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांना पान लावून द्यायचं, त्यांना विडी-तंबाखू द्यायची अन् थिएटरचे शो संपले की, रस्त्यावरच्या दिव्याख्याली अभ्यास करायचा...
प्रसंग दुसरा : जीनिव्हा, मेक्सिको, हाँगकाँग, इंडोनेशिया अशा जगातल्या अनेक प्रगत देशांत/शहरांत बौद्धिक संपदा (इंटेलिक्चुअल प्रॉपर्टी), ट्रेडमार्क, जिओग्राफिकल इंडिकेशन (जीआय), कॉपीराईट अशा विषयांवर व्याख्याने देण्यासाठी आणि संशोधन प्रकल्प (रिसर्च पेपर) सादर करण्यासाठी निमंत्रण!
एखाद्या चित्रपटाच्या पटकथेप्रमाणे १८० अंशांच्या कोनात आयुष्य बदलण्याची किमया पुण्यातील प्रा. गणेश हिंगमिरे याने करून दाखविली. त्याच्या कर्तृत्वाची दखल जगभरातून घेतली जात असतानाच, केंद्र सरकारनेही नॅशनल आयपी अवॉर्ड्समध्ये नुकताच त्याचा विशेष सन्मान केला आहे. देशभरात आत्तापर्यंत नोंदणी झालेल्या एकूण 'जीआय' पैकी १० टक्के 'जीआय' नोंदणीसाठी सहकार्य करण्याचे किंवा त्यासाठी पुढाकार घेण्याचे श्रेय गणेशकडे जाते.
पुण्याच्या पूर्व भागात बुधवार पेठेत गणेश याचा प्रवास सुरू झाला. किडनीच्या त्रासामुळे वडील लहानपणीच दगावले. त्यामुळे, सर्व जबाबदारी आईवर पडली. मंडईत पापड-कुरड्या विकून संसाराचा गाडा चालविताना मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्यासाठी आईला वेळ नव्हता. गणेशचे काका गुलाबराव यांच्याकडे प्रा. ग. प्र. प्रधान, मधुकर निरफराके अशा अनेकांची ये-जा होती. त्यांच्या विचारांमुळे छोट्या गणेशला शिकण्याची प्रेरणा मिळाली. अखेर गल्लीबाहेरच्या पूर्व भागांतील मुलांसाठी सुरू केलेल्या नूतन समर्थ विद्यालय येथे गणेशने प्रवेश घेतला. पहिली ते सातवीचे शिक्षण तेथून पूर्ण करताना, अडचणी पाठ सोडायला तयार नव्हत्या. शाळेची फी अवघी सात रुपये होती; पण ती भरण्याचीही ऐपत नव्हती. गणेशची शैक्षणिक प्रगती आणि काकांच्या मध्यस्थीमुळे शाळेने सवलत दिली आणि अवघ्या दोन रुपयांमध्ये त्याचे शिक्षण सुरू राहिले.
सातवीनंतर भारत हायस्कूल आणि त्यानंतर गरवारे कॉलेजात तो बीएस्सी झाला. आयएलएस लॉ कॉलेजमधून एलएलबी केल्यानंतर एलएलएम करण्यासाठी लंडनला जाण्याची संधी मिळाली. स्कॉलरशिप मिळाली; पण पैशांची जमवाजमव करताना अडचणी आल्या. अशावेळी, वेंकटेश्वरा ग्रुपचे बालाजी राव धावून आले. गणेश ब्रिटनमध्ये दाखल झाला खरा; पण महिन्याभरात तेथील वातावरण, इंग्रजीचे उच्चार, शिकविण्याची पद्धत यात आपण मागे पडत असल्याचे त्याला वाटू लागले आणि पुन्हा भारतात परतावे, असेही वाटू लागले. मात्र, अॅड. भास्करराव आव्हाड यांनी धीर दिला. न्यूनगंड दूर पळाला आणि तेथे पहिल्या १० क्रमांकात येण्याचा पराक्रम गणेशने केला.
वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा (डब्ल्यूटीओ) करार आणि बौद्धिक संपदा कायदा (आयपी) या दोन विषयांवर सखोल अभ्यास करून गणेश भारतात परतला. मात्र, त्याने प्रावीण्य मिळविलेल्या या विषयांबाबत सर्व ठिकाणी अनभिज्ञता होती. काही मोजकी कॉलेजे, वरिष्ठ प्राध्यापक आणि नोकरशहा यांशिवाय कोणाला त्याची कल्पनाही नव्हती. डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी हळदीच्या पेटंटबाबत घेतलेल्या मोहिमेमुळे थोडी जागरूकता निर्माण झाली. या संधीचा लाभ घेण्याचे गणेशने निश्चित केले. 'विमान उडवायचं असेल, तर धावपट्टी लागते,' असा गुरूंनी दिलेला संदेश त्याने आचरला. चाणक्य मंडळात 'डब्ल्यूटीओ' या विषयावर त्याने पहिले व्याख्यान दिले आणि त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. पुणे विद्यापीठ, भारती विद्यापीठ, सिम्बायोसिस यांपासून ते देशभरातील आयआयटी, आयआयएमसारख्या संस्थांमध्ये बौद्धिक संपदेविषयी त्याने मार्गदर्शन केले. ट्रेडमार्क, कॉपीराईट, पेटंट, जीआय हे तर त्याच्या खास आवडीचे विषय. त्याच्या हाताखालून गेलेले अनेक विद्यार्थी आज पेटंट मिळविण्यासाठी धडपडत आहेत, तर काही जण केंद्र सरकारच्या पेटंट परीक्षकाच्या परीक्षेला पात्र ठरले आहेत.
याचवेळी पेटंट ऑफिसचा प्रशिक्षण सत्र पुण्यात घेण्याची संधी त्याला मिळाली. या प्रशिक्षण सत्राला कंट्रोलर जनरल आर. ए. आचार्य आवर्जून उपस्थित राहिले. त्यांचा पुणेरी पगडीने सन्मान केला गेला. या पगडीचे सर्वांनी कौतुक केले आणि त्याची 'जीआय'साठी नोंदणी का करत नाही, अशी विचारणा केली. गणेशने 'ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सी' अशा नावाने स्वतःचा व्यवसाय सुरू केला होताच. त्यामुळे, पुण्याच्या पगडीचे वेगळेपण, त्याचे वैशिष्ट्य आणि जगात इतरत्र कुठेही त्याचा दुरुपयोग होऊ नये, म्हणून 'जीआय' मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. पगडीच्या साच्यापासून ते बांधणी प्रक्रियेपर्यंतचा सखोल अभ्यास करून गणेशने त्याचे सादरीकरण केले आणि दार्जिलिंगच्या चहानंतर महाराष्ट्रात प्रथमच 'जीआय' मिळविण्याचा मान पुणेरी पगडीला मिळाला!
पुणेरी पगडीपाठोपाठ पैठणी साडी, महाबळेश्वर स्ट्रॉबेरी, नाशिकची द्राक्षे यासाठी 'जीआय' मिळविण्यात गणेशने पुढाकार घेतला. जीआयचा लाभ स्थानिक शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी त्याने शेतकरी, स्थानिक संघटना यांना बरोबर घेतले. रत्नागिरी-सिंधुदुर्गचा कोकम, पुण्याचा आंबेमोहोर, आजऱ्याचा घनसाळ तांदूळ, सोलापूरची चटणी, कोल्हापूरचा मसाला, कोरेगावचा वाघ्या घेवडा, नवापूरची तूरडाळ, वेंर्ग्युलाचा काजू, लासलगावचा कांदा, बीडचं सीताफळ, जालनाची मोसंबी, मराठवाड्याचा केशर आंबा, घोलवडचा चिक्कू, सोलापूरचे डाळिंब, सांगलीचा बेदाणा, जळगावची केळी, सासवड-पुरंदरचा अंजीर अशा अनेक गोष्टींचे जीआय मिळविण्यात गणेशचा मोलाचा वाटा आहे. शेतकऱ्यांच्या मालाला जीआय मिळवून देण्यासाठी वर्ल्ड बँकेकडूनही त्याला सहकार्य लाभले.
जीआयप्रमाणेच सांस्कृतिक क्षेत्रातील संस्थांना कॉपीराईट, ट्रेडमार्क मिळवून देण्यासाठी गणेशने काम केले. राज्यभर एकांकिका स्पर्धा खूप ठिकाणी होतात; पण नृत्य, नाट्य, चित्र, शिल्प अशा कलांचा एकाच व्यासपीठावर संगम घडवणारी फिरोदिया करंडकासारखी स्पर्धा केवळ पुण्यातच होते. त्यामुळे, त्याचा 'कॉपीराईट' मिळवून देण्यासाठी गणेशने काम केले. त्याशिवाय, 'लालबागचा राजा'चा कॉपीराईट आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी 'रजिस्टर्ड ट्रेडमार्क' मिळविण्याची प्रक्रियाही नुकतीच पूर्ण झाली आहे.
बौद्धिक संपदा क्षेत्रातील गणेशच्या कामाची दखल घेत, केंद्र सरकारने २००९ मध्ये त्याला जपान पेटंट ऑफिसच्या महिन्याच्या कोर्ससाठी टोकयोला पाठविले. डब्ल्यूटीओच्या २०११ मध्ये जीनिव्हा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्याची संधी त्याला लाभली. तर, २०१३ मध्ये इंडोनेशिया येथे झालेल्या परिषदेत 'अॅग्री-जीआय'ला प्रोत्साहन देण्यासंदर्भात त्याने सादर केलेला संशोधन पेपर डब्ल्यूटीओच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या क्षेत्रामध्ये काम करण्यास आणखी प्रचंड वाव आहे. देशातील केवळ संशोधन क्षेत्रातील विद्यार्थ्यांकडूनच पेटंटसाठी अर्ज दाखल केले जात आहेत. हे प्रमाण वाढविण्यासाठी; तसेच पेटंटच्या संशोधनाचा व्यावसायिक वापर कसा करता येईल, या दृष्टीने आणखी प्रयत्न करण्याची त्याची इच्छा आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट