Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2741

अरबी-फार्सीतील अक्षर-पूल

$
0
0

इराक आणि इराण या दोन्ही देशांना मायभूमी मानणारे लेखक घसन हमादान आता दुरावलेल्या फार्सी आणि अरबी भाषेला अनुवादातून जवळ आणत आहेत.

जन्माने इराकी असलेले घसन हमादान वाढले मात्र इराणमध्ये. त्यानंतर पुढची कारकीर्द त्यांनी सिरियात केली. त्यांना या दोन्ही देशांतील वाढती दरी असह्य होत होती. ती भरून काढण्यासाठी त्यांनी अनुवादाचा मार्ग धरला. ही दरी केवळ दोन देशांतील नाही तर ती होती दोन भाषा आणि त्या अनुषंगाने दोन भिन्न संस्कृतींमध्ये निर्माण झालेली.

इराणच्या फार्सी भाषेतील जग आणि इराकमधील अरबी भाषेतील जग यात तफावत आहे. त्यातच सुन्नी-शिया ही विभागणीही ठळक आहे. अरबी जगतात इराकव्यतिरिक्त इजिप्त, सौदी अरेबिया आदी अनेक देश येतात. त्यामुळे, फार्सी जगाची उर्वरित अरबी जगताशी भेट घडवून आणणारी सुविधा त्यांना अनुवादात सापडली. आणि अनेक वर्षे त्यांनी शांतपणाने अनेक फार्सी कादंबऱ्या अरबीत अनुवादित केल्या.

१९७९मधील इराणमधील इस्लामी क्रांतीपूर्वी या दोन्ही देशांतील संबंध उत्तम असताना हमादान कुटुंब इराणमध्ये आले. इराकमध्ये सद्दाम हुसेनचे राज्य होते. त्यानंतर इराक-इराण युद्धाने दोन्ही देशांतील संबंध कमालीचे कटू झाले. सद्दाम राजवटीने हमादान कुटुंबाला इराकी ओळख नाकारत इराणमध्येच राहण्यास भाग पाडले. तेथील, मोकळ्या वातावरणात हमादान यांनी साहित्य, समाजशास्त्र आणि चित्रकलेत स्वतःला रमवले.

तेथून ते सिरीयात संपादक म्हणून गेले. तेथे सहज फार्सी शिकवायला लागल्यावर ते विद्यापीठात फार्सीचे प्राध्यापक बनले. या काळात त्यांनी एक हजारहून अधिक चित्रपटांचे आणि दूरचित्रमालिकांचे भाषांतरही केले. सिरियाही अस्थिर झाल्यानंतर ते इराकला परतले आणि त्यांनी लेखक आणि टीव्ही निर्माते म्हणून काम सुरू केले.

रूमीच्या साहित्याने प्रभावित फार्सी जगात वाढलेल्या हमादान यांना अरबी जगतासाठी फार्सी कादंबऱ्यांचा अनुवाद हे एक आव्हान होते. कारण, अरब साहित्यात प्रबळ साहित्यिक प्रवाह सुरू होते आणि इराणकडे परकीय दृष्टीने पाहिले जात होते. त्याच्या जोडीला अरब जगतातील वाचक पाश्चात्य साहित्याची मागणी करत होते. इराणी साहित्य हे कमअस्सल असल्याची एकंदर भावना होती. इराणविरुद्ध नकारात्मक प्रचार सुरू होता.

इराकला साहित्याची मोठी परंपरा आणि इतिहास आहे. सद्दामची सत्ता येईपर्यंत तेथे प्रकाशक, लेखक आणि वाचक मोठ्या प्रमाणात होते. मात्र, त्यानंतर आणि विशेषतः अलीकडच्या युद्धोत्तर अराजकतेत सगळे लेखक विखुरले. नवीन पिढीत लेखक सापडत नाहीत. मात्र, आशेचे किरण असे काही लेखक आहेत आणि काही परंपराही. बगदादमध्ये अरब जगातील कोणत्याही शहरात नसलेली खास गोष्ट आहे. येथील मुत्तनबी मार्गावर खास पुस्तकबाजार आहे. हा दोनशे मीटर लांबीचा भाग म्हणजे साहित्याची पंढरी आहे. तेथे दर शुक्रवारी लेखक, प्रकाशक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील लोक एकत्र येतात आणि पुस्तकांवर चर्चा करतात. हमादान यांच्यासाठी या काही प्रेरणेच्या जागा होत्या.

त्यांच्या मते, आपण नेहमीच नवीन गोष्टी सांगायला साहित्याचा आधार घेऊ शकतो. प्राचीन काळी इराणी आणि अरब संस्कृतीच्या एकत्रीकरणाने इस्लामी संस्कृती फुलली. चौथ्या शतकात अबासीदच्या काळात या दोन्ही भाषा खूप जवळ आल्या. आज या दोन्ही भाषा एकमेकांपासून दूर आहेत आणि दोघांवरही पाश्चात्यांचा प्रभाव आहे. फक्त हाफिज, सादी आणि खय्याम हे अभिजात साहित्यिक सोडल्यास आधुनिक इराणी साहित्यिक अरब वाचकाला माहीत नाहीत. तसेच, खलील जिब्रान आदी अभिजात अरब साहित्यिक वगळता इराणला नवीन लेखनाचा पत्ता नाही. हे अडथळे मानसिक आहेत आणि ते अनुवादाच्या पुलावरून ओलांडता येतात. हा पूल मजबूत करण्यासाठी हमादान यांनी आता प्रख्यात फार्सी सूफी तत्त्वज्ञांची ओळख अरब जगताला करून देण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2741

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>