Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2741

पावसाळ्यात घ्या त्वचेची काळजी

$
0
0

>> डॉ. नीलेश प. सावंत,

त्वचाविकारतज्ज्ञ

पावसाळ्यात विविध प्रकारचे त्वचाविकार डोकं वर काढतात, या त्वचाविकारांना अटकाव घालण्यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे असते. पाऊस पडून गेल्यानंतर हवेतील आर्द्रता वाढल्यास त्वचाविकाराचा त्रास उद्भवतो, अथवा खूप पाऊस पडत असल्यास ओलसरपणामुळेही त्वचाविकारांमध्ये वाढ होते.

केस आणि डोक्याच्या त्वचेची काळजी

डोक्यावरील केस व त्याखालील त्वचासुद्धा या काळात अत्यंत नाजूक बनते. भिजून आल्यावर डोके कोरडे न केल्यास डोक्‍यावरही बुरशीच्या वाढीला प्रोत्साहन मिळते. ज्यांना कोंडा होण्याची सवय आहे, अशा व्यक्तींना केसांमध्ये खाज सुटते, बारीक संसर्गजन्य पुरळ येते. त्यातून रक्त येते. केस प्रचंड प्रमाणात गळू लागतात. याकरिता केस/ डोके सतत कोरडे ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

चिखल्या

पावसाळ्यात सर्वांत जास्त त्रास देणारा त्वचाविकार म्हणजे बुरशी-संसर्ग. पावसाळ्याच्या दिवसांत हवेतील आर्द्रतेमुळे आणि त्यामुळे येणाऱ्या सततच्या घामामुळे विषाणूंचा संसर्ग वाढतो. गुडघ्याच्या मागे, पायाच्या बोटांमध्ये याची वाढ सर्वांत जास्त प्रमाणात चिखल्या होतात. या त्वचाविकारात दोन बोटांच्या मध्ये खाज येते, त्वचा लाल होते, काही वेळा त्वचा फाटल्यासारखीसुद्धा होते..

नायटा

बुरशी आणि जिवाणू यांच्या संयुक्त संसर्गातून पायाच्या त्वचेचा होणारा हा आजार सर्वांत जास्त लोकांमध्ये दिसून येतो. जे पाण्यात अधिक वेळ राहतात, पाय ओलसर ठेवतात त्यांना संसर्गजन्य आजाराची लागण होते. यात पायावरील त्वचा लालसर होऊन त्याचे फुगीर चट्टे निर्माण होतात. याला प्रचंड खाज सुटते आणि त्यात जिवाणूंचा संसर्ग होतो.

उपाययोजना

> काही सोपी मात्र उपयुक्त उपाययोजना पावसाळ्याच्या दिवसांत हमखास करता येते. ही पथ्ये नियमित पाळली तर त्वचारोग बरा होण्यास मदत होते.

> सोबत संपूर्ण कोरड्या झालेल्या कपड्यांची एक जोड ठेवून द्या. पावसातून गेल्यानंतर काम संपल्यानंतर लगेच स्वच्छ होऊन कोरडे कपडे घाला. त्यानंतर दमट कपड्यात फार वेळ राहावे लागणार नाही.

> टीव्हीत दाखविलेली औषधे परस्पर वापरू नयेत, प्रत्येक व्यक्तीची त्वचा वेगळी असते, त्यातून जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते.

> ओल्या चपला वापरल्याने पायांच्या बोटांमध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव होण्याचा धोका वाढतो. पावसाळी चपला वापरल्यास त्या पुसून कोरड्या करता येतात.

> बूट वापरण्यापेक्षा चपला वापरणे सोयीचे असते. बंद बुटाच्या दमटपणात पाय कोंडतात. पाय कोरडे असणे हे त्वचारोग टाळण्याचा सोपा उपाय.

> सॉक्स किंवा बूट घालावा लागल्यास पायाला दमट घाम येतो, अशा वेळी क्‍लोट्रायमाझोल पावडर घालावी, त्यामुळे घाम आणि धुळीला अटकाव होतो.

> बाहेरून आल्यावर त्वचेच्या फटीमध्ये भेगात लपलेले जंतू निघून जाण्यासाठी आंघोळ करावी

> डायबेटिस नसेल तर पाय स्वच्छ घासून कोमट पाण्यात ठेवावे, त्यामुळे त्वचा निर्जंतुक होते.

> अंगाला घट्ट चिकटून बसणारे कपडे घालू नयेत, मोकळे कपडे घातल्याने त्वचा कोरडी राहते

> हातापायाची नखे कापावीत, त्यात माती अडकल्याने जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2741

Trending Articles