Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2741

सेवाभावी

$
0
0

रेश्मा बाबरे, आशा बागायतकर

विविध समाजोपयोगी, सेवाभावी उपक्रमांमध्ये आघाडीवर असलेल्या परळ भगिनी मंडळाचे ब्रीद दिल दोस्ती दुनियादारी जपणे, हे आहे. या मंडळाला ७५ वर्षे झाली. हे औचित्य साधून मंडळाच्या इतिहासाचा व वर्तमानाचा हा एक लेखाजोखा...

आमच्या परळ भगिनी मंडळाला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. १५ जुलै १९३९ रोजी सरस्वतीबाई दोंदे यांच्या पुढाकाराने हे मंडळ सुरू झाले, तेव्हा देश पारतंत्र्यात होता. स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले होते. या चळवळीत महिलाही सहभागी होत्या, मग आमच्या परळच्या भगिनी कशा मागे राहतील? सरस्वतीबाई या स्वातंत्र्यसैनिक आचार्य दोंदे यांच्या पत्नी. हिराबाई जाधव, शीला इंगळे, तारामती राजमाचीकर, सुमती कर्णिक, मंगला मिरगळ, शारदा गद्रे या सहकारी त्यांच्याबरोबरीने उभ्या राहिल्या.

कामगार वस्तीतील महिलांना एकत्र करून त्यांच्यासाठी शिवणक्लास सुरू करण्यात आले. २ जानेवारी १९५६ रोजी विश्वस्त मंडळ कार्यरत झाले. या दरम्यान महिलांनी पुढाकार घेऊन पोळीभाजी केंद्र सुरू केले. रेल्वे वर्कशॉपचा मोठा पसारा परळमध्ये आहे. तेथील कर्मचाऱ्यांसाठी दुपारच्या जेवणाचे डबे या केंद्रातून पोहोचते होऊ लागले. त्याचबरोबर परिसरातील नोकरदार महिलांचा भार हलका करण्यासाठी मोड आलेली धान्ये-कडधान्ये मंडळ विकत असे. लघुउद्योगांनाही साह्य करण्यात आले. सन १९६५ मध्ये कामगारांच्या मुलांसाठी अल्प फी घेऊन बालवाडी सुरू करण्यात आली. आजही ही बालवाडी मराठी व इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांतून सुरू आहे. बालवाडीत येणाऱ्या मुलांना 'पोषक आहार योजने'अंतर्गत आहार दिला जातो. त्यांची वैद्यकीय तपासणी होते व डॉ. सुजाता पाताडे त्याकामी सदैव तत्पर असतात. हे सर्व कार्य उभे करताना संस्थापक आणि विश्वस्त मंडळाने महिलांना वैचारिक खाद्य पुरविण्याच्या हेतूने नामवंत व विविध क्षेत्रांतील जाणकारांची व्याख्यानेही आयोजित केली. ही परंपराही अद्याप चालू आहे.

मंडळातर्फे कथाकथन, काव्यवाचन, पाककला, वेषभूषा, सामान्य ज्ञान इत्यादी स्पर्धा घेतल्या जातात व उत्साहात पार पडतात. आंतर मंडळ स्पर्धांमध्ये आमच्या भगिनींनी अनेक ढाली जिंकून आणल्या आहेत. सभासदांसाठी मॅमोग्राफी, डोळेतपासणी, डेंटल, बोन डेन्सिटी, डायबेटिस, थायरॉइड यांसाठी वैद्यकीय तपासणी शिबीरे आयोजित केली जातात. कौशल्यवाढीसाठी खाद्यपदार्थ, चॉकलेट्स, उदबत्ती व मेणबत्ती​ बनवणे यांचेही वर्ग घेतले जातात. या प्रशिक्षणातून कित्येक महिलांनी स्वतःचे लघुउद्योग सुरू केले आहेत व प्रपंचाला हातभार लावला आहे. मंडळातर्फे मनोरंजनासाठी तसेच शैक्षणिक सहलीही आयोजित केल्या जातात. आम्हा भगिनींनी संपूर्ण भारत पाहिला आहे. चैत्र ते फाल्गुन म​हिन्यांदरम्यान मंडळात सर्व सण साजरे केले जातात. ते साजरे करताना जातधर्म, आर्थिक स्थिती अथवा वैवाहिक दर्जा यावरून भेदभाव केला जात नाही. भगिनीभाव जपला जातो.

गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, तसेच आर्थिक हलाखी असलेल्या महिलांना आवश्यक औषधोपचार मिळावेत, यासाठी आमच्या सदस्य भगिनी नेहमी आघाडीवर असतात. परळ विभाग हा हॉस्पिटलांचा विभाग आहे. केईएम, वाडिया, टाटा, हाजी बचू अली अशी अनेक हॉस्पिटले या भागात आहेत. इंडियन कॅन्सर सोसायटी, नाना पालकर स्मृति समितीचे रुग्ण सेवा सदन यांच्याशीही मंडळाने स्वःला जोडून घेतले आहे. अलिकडेच मंडळाच्या सदस्य वसईच्या श्रद्धानंद महिलाश्रमाला भेट द्यायला गेल्या होत्या. आपल्या आप्तनातेवाईकांच्या भेटीला जाताना जशा आपण गृहोपयोगी आणि ज्याच्या त्याच्या पसंतीच्या वस्तू देतो, तशाच भेटवस्तू दिल्यावर त्यांना झालेला आनंद अवर्णनीय होता. आश्रमातील महिलांबरोबर पूर्ण एक दिवस घालवल्यानंतर आता अशा ठिकाणी सातत्याने भेटी देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

यातूनच काही नवे उपक्रम आम्ही सुरू करणार आहोत. सर्वच महिलांना हक्काचे माहेरघर असतेच, असे नाही. ते तसे असावे असे प्रत्येकीला वाटते. हे लक्षात घेऊन आम्ही कर्जत येथे लवकरच 'हक्काचे माहेर' उभे करणार आहोत. तेथे भगिनी आठवडाभर वास्तव्य करू शकतील आणि निसर्गरम्य वातावरणात रमतील. आणखीही काही उपक्रम योजित आहोत. ७५ वर्षांपूर्वी प्रतिकूल परिस्थितीत स्थापन केलेल्या या मंडळाची परंपरा आजही आम्ही जपायचा प्रयत्न करत आहोत. परस्परांची काळजी घेणारे असे हे मंडळ...

आमच्या परळ भगिनी मंडळाची तऱ्हाच न्यारी,

येथे जपतो दिल दोस्ती दुनियादारी...

असे आमचे ब्रीद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2741

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>