डायबेटिस झाल्यानंतर घेतला जाणारा कडू रस, स्वीटनर तसेच ग्लोकोमीटर यांची माहिती आपण मागील लेखात घेतली. पण, डायबेटिसमध्ये अनेकजण प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात. या दुर्लक्ष करण्यामुळे डोळ्यांवर प्रतिकूल परिणाम होतो. डायबेटिसमुळे जडणारे डोळ्यांचे विकार सुरुवातीला लक्षातच येत नाहीत. जेव्हा लक्षात येतात तेव्हा उशीर झालेला असतो. या विलंबामुळे त्यांची गुंतागुंत वाढत जाते. त्यामुळे डायबेटिस झालेल्या व्यक्तींना डोळ्यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. ही काळजी कशी घ्यायची याची माहिती आपण पुढील काही लेखांमधून घेऊ या...
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपले शरीर अनेक रोगांना बळी पडू शकते. जीवनशैलीतील दोषांमुळे डोळ्यांचेही विकार जडण्याची शक्यता असते. दोषपूर्ण जीवनशैली व डोळ्यांचे विकार डायबेटिस झालेल्या व्यक्तींना पटकन होतात. बराच काळ डायबेटिसने ग्रस्त असलेल्या पेशंटांना डायबेटिक रेटिनोपॅथी होण्याची शक्यता असते. अनेकदा अगदी २० वर्षापासून ते ७४ वयापर्यंत अंधत्वाला कारणीभूत ठरण्यासाठी डायबेटिक रेटिनोपॅथी हे नवे कारण ठरते. दी इंटरनॅशलन डायबेटिक फेडरेशनने जाहीर केल्याप्रमाणे भारतात डायबेटिसचे ४ कोटी ९ लाख पेशंट आहेत. २०२५पर्यंत त्यांची संख्या वाढून ६ कोटी ९९ लाख इतकी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. डायबेटिस झालेल्या पेशटांपैकी ३४. ६ टक्के लोकांमध्ये डायबेटिक रेटिनोपॅथी असल्याचे मानले जाते. सध्याच्या जीवनशैलीत अनुवंशिकता, दीर्घ व तणावपूर्ण काम, धुम्रपान, मद्यपान, बैठे काम, खाण्याच्या चुकीच्या सवयी, चरबी व अतिशर्करायुक्त पदार्थांचे सेवन, व्यायामाचा अभाव या मुख्य कारणांमुळे डायबेटिस होण्याची शक्यता बळावते. अनेकदा डायबेटिक रेटिनोपॅथी झाला तरी दीर्घकाळापर्यंत त्याची काहीही लक्षणे दिसून येत नाही. डोळ्यांची पुरेशी हानी व गुंतागुत उद्भवल्याशिवाय या आजाराचे अस्तत्त्वि जाणवत नाही.
लक्षणे
अंधुक दिसणे, एकच वस्तू दोन दिसणे किंवा वाचताना अडचण येणे, डोळ्यांसमोर ठिपके दिसणे, अंशत: किंवा पूर्ण दृष्टी जाणे किंवा डोळ्यापुढे पडदा येणे, डोळ्यात वेदना, दाब वाढल्यासारखे वाटणे किंवा डोळे सतत लालसर असणे.
- डॉ. हिमांशू मेहता, नेत्ररोग तज्ज्ञ
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट