३६ वर्षे आर्थिक निर्बंधांखाली, विविध राजकीय धार्मिक बंधनाखाली असलेल्या इराणमधून जागतिक पातळीवर प्रभाव पाडणाऱ्या चित्रपट कलाकृती कशा निर्माण झाल्या असतील? इतक्या कलाकृती फक्त इराणमध्ये निर्माण होण्याचे कारण काय?
इराण आणि अमेरिकेसह सहा बड्या देशांत अण्वस्त्रनिर्मितीवरून सुरू असलेला वाद अखेर संपला आहे. इराणवरील आर्थिक निर्बंध निघून तो अन्य देशांप्रमाणे सर्व आघाड्यांवर प्रगती करण्यास सज्ज होत आहे. इराण इतकी वर्षे जगापासून तुटलेला असला तरी सर्वांच्या स्मृतींत तो सतत ताजा असण्याचे कारण सातत्याने अवघ्या जगाला चकित करणारे त्याचे चित्रपट होय. म्हणूनच, अण्वस्त्र चर्चेतल्या विजयापेक्षाही त्यांनी जगभरातील लोकांना आपल्या चित्रपटांतून जिंकल्याची बाब अधिक मोठी आहे.
घाट, निवेदनाच्या प्रयोग आणि पारंपरिक शैलीला पूर्णपणे फाटा देऊन शब्दांच्याही कह्यात न येणाऱ्या आशयाचा अनुभव प्रेक्षकांना देण्याची किमया त्यांना जमली कशी, यावर चर्चा सुरू आहेत. आज इराणचे अध्यक्ष हसन रूहानी आणि परराष्ट्रमंत्री मोहम्मद जवाद जरीफ यांचे स्वागत रॉकस्टारसारखे करण्यात आले. ते राष्ट्राचे हिरो बनले. पण त्याआधी सोप्या निवेदनातून आणि साध्या मूल्यांच्या आशयाभोवती रचलेल्या आपल्या असामान्य चित्रपटातून नवी चित्रभाषा साकारणारे अमीर नादेरी आणि अलीकडे माजिद मजिदी हिरो होते. सामान्य माणसांतील आत्मदोष, प्रेम, आकांक्षा या सामान्य भावनांतून आणि शोषण, गरिबी, संघर्ष या नित्याच्या समस्यांतून नवे विश्व साकारणारे मखमलबफ, रकशन बानी इतेमाद, जफर पनाही हे देशाचे आणि जगाचेही लाडके होते आणि आहेत.
ते ऐंशींचे दशक होते, जेव्हा पहिल्यांदा इराणी चित्रपटांनी जगभरातील, विशेषतः भारतातील महाविद्यालयीन माहोलमध्ये आपली जादू आणली. मग ते नवीन फिल्म सोसायटीच्या स्थापनेच्या निमित्ताने असेल किंवा सांस्कृतिक बंडखोरीतून असेल, पण इराणी चित्रपट बघितले जाऊ लागले आणि त्यांच्या विषयीच्या चर्चेत भाग न घेणारे बावळट ठरू लागले.
अमीर नादेरींचा 'द रनर' हा त्यापैकी पहिला चित्रपट. त्याने नवे वास्तववादी जग खुले केले आणि लहान मुलाच्या दृष्टिकोनातून गरिबी, ऐश्वर्य आणि भेदाभेद अनुभवायला लावले. त्यानंतर आला, अब्बास कियारोस्तानी यांचा 'व्हेअर इज द फ्रेंड्स होम.' यात एका मुलाची केवळ त्याच्या वर्गमित्राची वही परत करण्याबद्दलची कथा आहे. त्यातील अतिसोपेपणातून मानवी संस्कृतीची वैश्विक झलक होती. त्यानंतर मखमलबफ यांच्या 'द सायक्लिस्ट'ने रडवले आणि इराण हा देश आणि त्याचे चित्रपट कायम काळजावर कोरले गेले. या काळात इराण-इराक युद्ध घडले, तेथे राजकीय बदल झाले. त्यानंतर अमेरिकेने घातलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे गेल्या पस्तीस वर्षांत त्याचे कंबरडे मोडले. पण त्याच्या चित्रपटांचा प्रभाव काही ओसरला नाही. आजही जगभर त्याच्या चित्रपटांचा पाठपुरावा विविध महोत्सवांतून सुरूच असतो.
यामागे त्याच्या कलेचा अडीच हजार वर्षांचा इतिहास आहे. सपाट पृष्ठभाग कोरून त्यातून चित्रमय दृश्य निर्माण करण्याची ही दृश्यकला आजही जिवंत आहे. त्याचप्रमाणे, लुमिए बंधूंनी चित्रपट निर्मितितंत्र निर्माण केल्यानंतर अवघ्या पाच वर्षांत ते इराणमध्ये आले.
गेल्या सुमारे पन्नास वर्षांतील आखातातील विविध उदाहरणांवरून पाश्चात्य जगालाही आता, इराण हा एक स्थिर, पुढारलेला, प्रतिभावान आणि मोकळा देश असल्याचे लक्षात आले आहे. युरोपच्या तुलनेत सर्वाधिक महिला दिग्दर्शक इराणमध्ये आहेत. कारण तेथील समाज हा मूलतत्त्ववादी नाही. साडेतीन दशकांच्या एकांतातील त्याच्या रूपेरी नभात जगभर चमकणारे तारे दिसले. म्हणूनच एकविसाव्या शतकाचा त्याचा सुटलेला सहभाग भरून काढत इराण पुढे जाईल, तेव्हा त्याचे आकाश अधिक विस्तारलेले आणि त्यातील रंग अधिक गहिरे असतील.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट