Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2741

शंभरावर तीन...

$
0
0

बऱ्याच वेळापासून कट्ट्यावर दाखल झालेले रायबा आणि सायबा ठकसेनची वाट बघत होते. तिघांचंही नियमित भेटण्याचं हे ठिकाण. ग्रामपंचायत ते ट्रम्प-बायडन वादावरही तिथं चर्चा होई. बौद्धिक आदान-प्रदानामुळं अनेकदा उत्तररात्रीपर्यंत बैठका रंगत. टवाळखोरांचा अड्डा असंच कट्ट्याचं नामकरण झालेलं. परंतु, या पॉलिटिकल वर्कर त्रिमूर्तीला त्याची तमा नव्हती. टोळकीच त्यांच्या कामी येत असल्यानं त्यांची हजेरी ठरलेली. एकदा राजकारणात उतरलं म्हणजे सारीच तयारी ठेवावी लागते, असं त्यांचं सांगणं.

रायबा : हा माणूस किती वेळ घेणार? वहिनीनं पुन्हा झगडाबिगडा केला की काय? लई त्रास असतो राव बायकांचा. खाएँ तो भी पछताएँ, न खाएँ तो और भी! संसार आणि पॉलिटिक्समध्ये बरंच साम्य जाणवतं. काम केल्याशिवाय खायला भेटतच नाही. तिकडं बॉसची कटकट अन् इकडं यांचीऽऽऽ.…

सायबा : अगदी शंभर नंबरी बोल्लास बघ. घरोघरी मातीच्या चुली.

रायबा : आमच्याकडं तर चुलीतली लाकडं येतात अंगावर.… निखाऱ्याशी रोजच खेळ. शंभरवरून आठवलं बघ. आता पुढले काही दिवस नुसतं शंभर नाही म्हणायचं. शंभर आणि तीन म्हणायचं… बरंका!

सायबा : शंभर आणि तीन. म्हणजे १०३. ही काय भानगड?

रायबा : तुला काहीच कसं कळत नाही. आधीचं सरकार असताना, शंभर कोटींची फिगर चालली. म्हणजे तेवढ्या वसुलीचा आरोप झाला. सध्याच्या लोकांवर ५० खोक्यांचा होतोय. आता शंभरावर तीन चर्चेत आहे.

सायबा : आता हा कोणता नवा घोटाळा? पॉलिटिक्स म्हणजे आकडे अन् घोटाळ्यांपलीकडं काही नसतं, असं लोकांना वाटतंय. आकड्यांचा खेळ ठरलेला. सरकार बनविण्यासाठी आकडा, आल्यावर आकडा, प्रत्येक कामातही तेच आणि जातानाही आकडाच. शंभरावर तीनची भानगड खुलाशानं सागं जरा...

रायबा : अरे वेड्या, हा घोटाळा नाय. चर्चेतली फिगर आहे. कालच बाहेर आलेले नेताजी तेवढे दिवस जेलात राहिले. आता त्याच आकड्याएवढे लोक निवडून आणणार आहेत. म्हणून चर्चा एकशेतीनची.

सायबा : समजलं...…… मॅजिक फिगरच म्हणायची?

रायबा : तसं म्हण हवं तर... पुढले काही दिवस चर्चेत राहील हा माणूस आणि आकडाही. मांडवलीची भाषाही सुरू झालीय म्हणे.

सायबा : बाप रे! म्हणजे पुन्हा नंबर गेम. अवघड आहे राव. शहाण्याच्या मेंदूचा खुळखुळा व्हायचा. (इतक्यात ठकसेन कट्ट्यावर दाखल झाला.)

ठकसेन : चला,… चला...… चर्चेचे गुऱ्हाळ आटोपतं घ्या. सकाळी लवकर निघायचं आहे. सफरीच्या तयारीला लागा.

रायबा : कसली सफर? गुवाहटीची बॅग अजून खाली झालेली नाही. आता पुन्हा निघायचं?

ठकसेन : गप्प बसाऽऽऽ समुद्रसफरीचं बोलतोय मी. १४५ लोकांसाठी नौदलाचं जहाज बुक झालंय. विरंगुळ्यासाठी कार्यकर्त्यांनाही नेणार आहेत. आपलाही नंबर लागलाय.

सायबा : बरं आहे. पुन्हा आकडाच की! शंभरावर तीन एवढेच लोक ठरवले असते, तर मजा आली असती.

एकमेकांना टाळी देतच रायबा-सायबा कट्ट्यावरून निघाले. ठकसेनला मात्र त्यांचं संभाषण उमजेना. सागरसफर ‘फुल टू एन्जॉय’ करायची, अशी तंबी देत त्यानंही बॅग भरण्यासाठी घराची वाट धरली.

-चकोर



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2741

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>