डॅन सालाडिनो हे पत्रकार आणि बीबीसीवर खाद्यपदार्थांचे कार्यक्रम प्रसारित करणारे सादरकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. ‘इटिंग टू एक्सटिंक्शन : द वर्ल्ड्स रेअरेस्ट फूड्स अँड व्हाय वुई नीड टू सेव्ह देम’ हे त्यांचे पुस्तक दुर्मिळ होत चाललेले अन्नपदार्थ आणि ते वाचवण्याची आवश्यकता याचे महत्त्व सांगतात. जग जवळ येताना खाद्यपद्धतीत, खाद्यसंस्कृतीत एकसारखेपणा, समानता येत चालली आहे. त्यातले वैविध्य आणि प्रादेशिक ओळख लोप पावत आहे. आपल्याला वाटते की, पूर्वीच्या पिढ्यांपेक्षा आपल्या खाण्यात वैविध्य आले आहे. अमेरिकेसारखे बर्गर, इटलीसारखा पास्ता आणि अॅव्होकाडोसारखी फळे आता भारतात खाता येतात. पण हे वैविध्य जगभर एकाच ‘साच्यातले’ असल्याचे दिसते. आता बऱ्याचशा देशांमध्ये तोच कोका कोला, तोच पिझ्झा हटचा पिझ्झा मिळतो.
खाद्यपदार्थांमधले वैविध्य संपले म्हणजे काय? तर मनुष्यप्राण्याच्या आहारात पूर्वी सहा हजार वेगवेगळ्या वनस्पतींचा समावेश होता. आता माणसाच्या आहारातले निम्मे उष्मांक (कॅलरीज) हे गहू, तांदूळ आणि मका यातून येतात. त्यात बटाटा, साखर (ऊस आणि बीट), तेल यांचा समावेश केल्यास माणसाचे ७५ टक्के उष्मांक अशा मोजक्या वनस्पतींपासून येतात. पूर्वी माणूस जिथे राहायचा तिथले हवामान, माती, पाणी, भौगोलिक परिस्थितीनुसार बदलणारी पिके, फळे, भाज्या आणि प्राणी त्याच्या आहारात असत. पण हरितक्रांतीनंतर जग आमूलाग्र बदलले. जगातली बहुतेक बियाणी ही फक्त चार कंपन्यांच्या ताब्यात आहेत. जगभर दुधाचे चीज तयार करायला जे जीवाणू वापरतात त्यातले निम्मे फक्त एका कंपनीचे आहेत. पूर्वी प्रत्येक ठिकाणी चीज तयार करताना तिथले स्थानिक जीवाणू वापरले जात. जगात केळ्याच्या दीड हजार जाती होत्या. आता यातल्या बऱ्याच नामशेष झाल्या आहेत. तरीही जगात पिकवली आणि विकली जाणारी निम्मी केळी ही कॅव्हेंडिश या एकाच जातीची असतात. जगातल्या दूधधंद्यात बहुतांश गायी होलस्टाइन या एकाच जातीच्या आहेत. असा साचेबद्ध आणि एकसुरीपणा मनुष्याच्या आहारात पूर्वी कधीच नव्हता. सन १९५० मध्ये डेन्मार्कमध्ये अडीच हजार वर्षांपूर्वीच्या मनुष्याचा मृतदेह बर्फाखाली चांगल्या अवस्थेत मिळाला. तेव्हा त्याच्या पोटातल्या खिरीमध्ये चाळीस वेगवेगळ्या झाडांच्या बिया होत्या!
जंगलातल्या रानभाज्या, फळे, कंदमुळे यात कितीतरी जास्त वैविध्य आणि पोषणमूल्य होते. आता पृथ्वीवरची एक तृतीयांश जमीन लागवडीखाली आहे. त्यातली २५ टक्के पिकांसाठी आणि ७५ टक्के गुरांना चराईसाठी वापरली जाते. दिवसागणिक लागवडीची जमीन जंगलांना गिळंकृत करते आहे आणि एकाच जातीची पिके आणि एकाच जातीचे प्राणी वाढवते आहे. यातून जमिनीचा दर्जा खालावतो आहे, प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या जाती नामशेष होत आहेत. पोषणमूल्य आणि आहाराचा दर्जा खालावतो आहे आणि कितीतरी वनस्पतींची माहिती, खाद्यपदार्थ, पाककृती आणि वेगवेगळ्या चवी लयाला जात आहेत. वैविध्य घालवून एकाच जातीची पिके घेतल्यामुळे संकटकाळ महाकठीण होणार आहे. सगळ्यात जास्त वापरली जाणारी जात एखाद्या नव्या रोगासमोर किंवा तापमान बदलामुळे तग धरू शकली नाही तर अन्नधान्याचा भीषण प्रश्न कसा उभा राहू शकतो, ते सालाडिनो स्पष्ट करतात.
प्रश्नांची ओळख करून दिल्यानंतर पुस्तकातल्या प्रकरणांमध्ये जगातल्या वेगवेगळ्या भागातले दुर्मिळ होत चाललेले अन्न, त्याचा इतिहास आणि त्याचे जतन करण्यासाठी होणारे प्रयत्न, धडपडणारे लोक याविषयी सालाडिनो माहिती देतात. टांझानियाच्या जंगलातले मध, ऑस्ट्रेलियाच्या मूळ रहिवाशांचे मुख्य अन्न असलेले मरनॉन्ग नावाचे कंद आणि इथिओपियातून जगभर पोहोचलेली कॉफीची जंगली झाडे याची माहिती ते देतात. मेघालयातली ‘मेमांग नारंग’ नावाची संत्र्यासारखी फळं, तिथली जैवविविधता आणि तिथून जगभर पसरताना ‘नारंग’ शब्दात बदल होत होत तयार झालेला ‘ऑरेंज’ हा शब्द अशी नवीन माहिती मिळते.
सगळ्या गोष्टी सोप्या आणि एकसारख्या करण्याच्या अट्टहासामुळे पर्यावरण, शेती, खाद्यसंस्कृती, आहार, आरोग्य यावर कसा परिणाम होतो आणि त्या एकमेकांशी कशा निगडीत आहेत, ते पुस्तकात सोप्या भाषेत सांगितले आहे. ते करताना जगातल्या वेगवेगळ्या संस्कृतीतल्या दुर्मिळ पदार्थांची सफरही घडवली आहे. माणसाने पुन्हा फळे-कंदमुळे खाऊन राहावे, असे नाही, पण त्या पद्धतीतून जे शिकता आले ते जपणे, जैववैविध्य टिकवणे, विविध पदार्थ जतन करणे आणि खाणे एवढे आपण नक्कीच करू शकतो.
‘इटिंग टू एक्सटिंक्शन : द वर्ल्ड्स रेअरेस्ट फूड्स अँड व्हाय वुई नीड टू सेव्ह देम’
लेखक : डॅन सालाडिनो
प्रकाशक : विंटेज डिजिटल
पाने : ४५०
किंमत : १४७५ रू. किंडल : ३५४ रू.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट