Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2741

निर्सगमैत्रीचा मंत्र

$
0
0

निखिल कुलकर्णी

धर्म म्हणजे काय? निसर्ग म्हणजे काय? धर्माचा निसर्गाशी काय संबंध आहे? या प्रश्नांची धर्मातीत उत्तरे मिळवण्यासाठी ‘सॅक्रेड नेचर’ हे करेन आर्मस्ट्राँग यांचे पुस्तक वाचायलाच हवे. ‘पवित्र’, ‘पौराणिक कथा’, ‘लोगोस’, ‘अहिंसा’, कृतज्ञता यासारख्या संकल्पना सोप्या शब्दांत लेखिकेने मांडलेल्या आहेत. तरी मला त्यातला काइनेसिस (Kinesis) या विषयावरील अध्याय कळसाध्याय वाटतो. यामध्ये निसर्गाशी एकरूप होण्याचा मंत्र प्रभावीपणे दिला आहे.

स्वत:चा अहं संपूर्णपणे नाहीसा करण्याच्या प्रक्रियेला ग्रीक शास्त्रात काइनेसिस म्हणतात. येशू शेवटच्या प्रवासाला निघाला तेव्हा त्याच्या मनामध्ये नेमके काय विचार होते? सेंट पॉल म्हणतात की, त्याला शिक्षेचा अभिमान नव्हता. खंत नव्हती. चिंता नव्हती. ज्यांच्यामुळे शिक्षा झाली, त्यांच्याबद्दल आकसही नव्हता. त्याला त्याचा अहम् मुक्त करायचा होता. लेखिकेच्या मते हे पुरुषसूक्तामध्ये सांगितलेल्या पुरुषाच्या आहुतीसारखे आहे. त्याच्या मनात कसलीही चिंता, खंत, राग नाही. तो त्याच्या अहंपासून पूर्ण मुक्त झालेला आहे. या काइनोसिससाठी तुमच्याकडे नुसती श्रद्धा असून कामाचे नाही. तर तितकंच उदात्त प्रेमही असायला हवे आणि हे प्रेमच अहंची संपूर्ण आहुती देऊ शकेल.

लेखिकेचा सर्व धर्मांचा अभ्यास आहे. ती एका धर्माची बाजू घेऊन लिहित नाही. वेगवेगळ्या धर्मांमधून, त्यातल्या रीतिरिवाजातून निसर्गाची कशी करुणा भाकलेली आहे, याचे यथार्थ चित्रण पुस्तकात आहे. भगवान महावीरांपासून गौतम बुद्ध, वेद, पुरुषसूक्त, चायनीज डाऊ, येशू, मोहम्मद ते इस्रायली देव ‘यावे’पर्यंत सर्व धर्मांचा निसर्गाबद्दलचा दृष्टिकोन यात आहे.

इतके सारे धर्म, त्यांची शिकवणही निसर्गाला पूरक आहे. या धर्मांचा मानवी मनावर पगडाही आहे. तरी माणसाच्या हातून निसर्गाची इतकी विटंबना का होते? आज माणूस निसर्गापासून इतका दूर का गेला? याचा शोध लेखिकेने आस्थेने घेतला आहे. हे सांगताना त्या एक दाखला देतात, पूर्वी इजिप्तमध्ये अशी मान्यता होती की रोज आकाशातून नवा सूर्य जन्माला येतो. तो दिवसभर पृथ्वीवरून प्रवास करतो आणि संध्याकाळी अंधाराच्या गर्तेमध्ये मृत्यू पावतो. त्या काळात सूर्याकडे लक्ष देण्यासाठी पुजाऱ्यांची नेमणूक केलेली असे. ते दिवसभर सूर्याकडे पहात असत. सूर्य उगवल्यानंतर अत्यंत कौतुकाने ते आभाळातल्या देवतेला धन्यवाद देत. सूर्याचे कौतुक करत आणि संध्याकाळ झाली की कातर होऊन देवतेला परत सूर्य जन्माला घालण्याची विनंती करत. सूर्याचा मृत्यूनंतरचा प्रवास सुखकर होवो म्हणून ते त्या देवतेला स्तोत्रे म्हणून विनंती करत. हे अनंत चतुर्दशीला ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ म्हणत डोळे पुसणाऱ्या लहान मुलांइतकेच निष्पाप आहे. पण सूर्य स्थिर असून पृथ्वी त्या भोवती फिरते आहे, याचा साक्षात्कार झाला, तेव्हापासून आपण आभाळातल्या देवतेचे आभार मानायचे बंद केले. त्याचबरोबर सृष्टी निर्माण करणाऱ्या सूर्याकडेही पहायचे बंद केले. वास्तविक, तेव्हाचा आणि आजचा सूर्य यात काहीही फरक नाही. तो तेव्हाही पृथेचा पुष्णि होता आणि आजही तोच तिचा पालनकर्ता आहे. आपण मात्र निसर्गाशी कृतघ्न होत गेलो. विज्ञानाने अनेक गुपिते उलगडली. पण म्हणून आपण निसर्गाशी असलेली कृतज्ञतेची नाळ तोडून टाकू शकतो का? हा लेखिकेला पडलेला प्रश्न आहे. आणि अशा कृतघ्नतेचे गंभीर परिणाम आ वासून उभे आहेत.

पृथ्वीचे तापमान वाढत आहे. ध्रुवांवरचे बर्फ, जंगले नष्ट होत आहेत. नद्या समुद्रात पोहोचण्याआधीच लुप्त होत आहेत. कित्येक प्राणिमात्र, जीवजंतू कायमचे नाहीसे होत आहेत. हे असेच चालू राहिले तर एके दिवशी निसर्गचक्र खंडित होईल. मग माणसाचे अस्तित्वच धोक्यात येईल. आज गरज आहे धर्मामध्ये सांगितलेली निसर्गाबद्दलची कृतज्ञता आठवण्याची. पृथ्वीवर राहणारे सर्व प्राणिमात्र सुखी असतील, तरच मी सुखी होणार आहे हा विचार वृद्धिंगत करण्याची. पृथ्वीवरचा सगळ्यात प्रगल्भ जीव म्हणून माणसाची मोठी जबाबदारी आहे. मोठे कर्तव्य पार पाडायचे आहे. याची जाणीव माणसाला ज्या दिवशी होईल त्यादिवशी खऱ्या अर्थाने भूता परस्परे जडो मैत्र जिवांचे.. ही वैश्विक प्रार्थना सिद्धीला जाईल, असे लेखिकाला वाटते. ते पुस्तकातून समजत जाते

सेक्रेड नेचर

लेखिका : करेन आर्मस्ट्रॉँग

प्रकाशन : द बॉडली हेड लंडन/ पेंग्विन रँडम हाऊस यूके

पाने : २३९, किंमत : ६९९ रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2741

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>