तर चष्मा सावरीत हसत म्हणाले खुदकन, 'म्हण वाट्टेल ते. आहेच सवय मला. बंदुकीची गोळी झेलली, तिथे कसलं अरे तुरे नि कसलं अहो जाहो...' म्हणताना हात नेला पोटापाशी. वाटलं दाखवतायत की काय गोळीची जखम, तर बघितले घड्याळ चाचपून नि म्हणाले, 'हा हा म्हणता झाली की ७४ वर्षे.' म्हटलं, 'दिसताय जरा दमलेले... जरा शिणलेले.' 'हो ना...' म्हणत बसले खाली पाय मुडपून. 'होताच कालचा दिवस दगदगीचा. पेपरांतील आठ कॉलमांतील शब्दांतून वाट काढता काढता, चालता चालता जरा दमलो. वाटलं कुणी मलाच माझ्यावर लिहायला सांगतंय की काय! टीव्हीवरच्या बातम्या ऐकून ऐकून थकलो. वाटलं कुणी अचानक माझ्यापुढेच धरतंय की काय माइकचं बोंडुक नि विचारतंय... ७४ वर्षांनंतर आज तुम्हाला कसं वाटतंय! जाहिरातींमध्ये स्थिर उभा राहून जरा कंटाळलो. वाटलं कुणी मलाच करायला लावतंय की काय, एखाद्या गोल फ्रेमच्या चष्म्याची किंवा चरख्याची वगैरे जाहिरात. राजघाटावर मानवंदना घेता घेता कंटाळलो. वाटलं कुणी विचारतंय की काय, पाठ आहे का तुम्हाला 'अबाइड विथ मी'. आणखीही फिरलो काल कुठे कुठे. माणसं दिसत नव्हती खरं नीट नि समोरचंही. त्या बलुचिस्तानातल्या वादळानं आणलेल्या वाळूमुळे असेल हो कदाचित. चष्म्यावरही माझ्या साचली होती जरा धूळ. ती केली साफ. तरीही दिसेना नीट. म्हटलं, वाळू बसली खाली की दिसेल स्वच्छ सगळं. कधी कधी अवधी द्यावा लागतो सारं काही निवळायला. फिरता फिरता थबकलो एका मंडपापाशी. मंडपातील दोन मिनिटांच्या मौनापाशी. मौनात गेलेला नि एक डोळा अर्धवट उघडा असलेला मंचावरचा एक चेहरा ओळखीचा वाटला जरा. नि आठवला चार वर्षांमागचा पेपरांतील पहिल्या पानावरचा एक फोटो नि त्याखालची कलमांची जंत्री. रघुपती राघव राजाराम म्हणत सरकलो पुढे. खिडकी दिसली एक खुली नि आत कुणाच्यातरी पुतळ्यापुढे जमलेले लोक. एक म्हणाला... XXX ला मारून झाली इतकी वर्षं, तरी आहेच XXX अजून बोकांडीला बसलेला... ऐकलं नि हसत हसत झालो पुढे...'
काय काय सांगत राहिले आणि मिश्कील डोळ्यांनिशी...
'थकला असाल तर करा जरा आराम...' म्हटलं तर हसले पहाटेसारखे. म्हणाले, 'थांबून नाही चालायचं... चालत राहायलाच हवं.' मुडपलेले पाय सरळ करून उठले चटकन नि घेतली काठी हातात. चाचपडलं घड्याळ पुन्हा एकदा. फक्त ७४ झाली... अजून खूप बाकी आहेत...' म्हणाले नि गेले तुरुतुरु निघून, पहाटेच्या उगवतीच्या दिशेने...
वसंत दत्तात्रेय गुर्जरांना भेटलेले गांधी काल पुन्हा एकदा असे भेटले...
- चकोर
---
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट