प्रकाशक किंवा लेखकाकडून आलेली पुस्तके ठेवून घेणे, खपलेल्या पुस्तकांचा हिशेब करून त्यांचे पैसे चुकते करणे किंवा प्रदर्शने भरवून पुस्तकांची विक्री करणे... ग्रंथविक्रेता म्हटला की नजरेसमोर हे चित्र उभे राहते.
ग्रंथजगतात मानाचे स्थान प्राप्त झालेल्या 'आयडियल'च्या कांताशेठ यांचे व्यक्तिमत्त्व मात्र या चौकटीत बसणारे नव्हते. सतत विक्रीचा आणि नफ्याचा हिशेब मांडत न बसता ग्रंथव्यवहाराशी निगडित माणसे जोडत राहणे ही त्यांच्या उदंड यशाची गुरूकिल्ली होती. त्यासाठी त्यांनी काय काय केले? आलेला ग्राहक विन्मुख परतणार नाही याची ते सतत खबरदारी घेत राहिले; वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी त्यांनी विविध साहित्यिक उपक्रम राबवले; चोखंदळ, व्यासंगी वाचकांचा सत्कार केला! परिणामी आयडियल बुक कंपनी ही फक्त स्टेशनरी आणि पुस्तके विकणारी संस्था न राहता, साहित्यिक, लेखक, प्रकाशक, वाचक यांचा राबता असलेले ग्रंथघर म्हणून नावारूपाला आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेरूर गावी जन्मलेले नारायणराव नेरूरकर उमेदीच्या वयात तत्कालीन शिरस्त्यानुसार पोटापाण्यासाठी मुंबईत दाखल झाले. पहिलीच नोकरी पुस्तकाच्या दुकानात मिळावी, हा संकेतच म्हणायला हवा! गिरगावातील 'समर्थ बुक डेपो'मध्ये झाडलोट करण्यापासून पुस्तकांचे गठ्ठे वाहण्यापर्यंत पडेल ते काम करीत राहणे ही त्यांच्या 'करिअर'ची सुरुवात. त्याचवेळी कष्टाळू नारायणाने ग्रंथव्यवहारातील बारकावे समजून घेतले. नंतर ते टिळक यांच्या गिरगावातीलच पुस्तकांच्या दुकानात लागले आणि त्यांच्याच मदतीने त्यांनी परळमध्ये स्वत:चे पुस्तकांचे दुकान सुरू केले. यथावकाश छबिलदासच्या गल्लीत 'आयडियल बुक कंपनी' थाटली. पुढे वामन (कांताशेठ) आणि शंकर (छोटूशेठ) वडिलांच्या हाताखाली पूर्ण वेळ उमेदवारी करू लागले. मोठे गणेशशेठ आणि सदानंदशेठ या दोघांनी आपापल्या नोकऱ्या सांभाळून 'आयडियलच्या' हिशेबांची आणि व्यवस्थापनाची जबाबदारी घेतली. छोटूशेठ स्टेशनरी विभाग पाहू लागले आणि कांताशेठ पुस्तकांच्या जगात रमले. चारही बंधूंनी एकोप्याने कष्ट करून 'आयडियल'ची किर्ती चौफेर नेली! इतकी की, आधीची छबिलदास गल्ली ही ओळख मागे पडून ती 'आयडियल गल्ली' झाली! तेथील पुस्तकांची अन्य दुकाने बंद पडली; 'आयडियल' मात्र उत्कर्षाप्रत जात राहिले.
पुस्तकविक्री हा नेरूरकर बंधूंचा कुळधर्म झाला आणि ग्राहक सेवा हे ब्रीद झाले! 'आयडियल' हे कोणतेही पुस्तक मिळण्याचे हमखास ठिकाण झाले. एखादे पुस्तक आज उपलब्ध नसले, तरी एक दोन दिवसांत ते पुस्तक तिथे आपली वाट पाहत असणार याची ग्राहकाला खात्री वाटू लागली. 'तुमच्याकडे नाही, तर आम्ही कुठे जायचे?' असा रोकडा सवाल ग्राहक हक्काने करू लागले. या विश्वासामागे कांताशेठ यांची अखंड तळमळ होती. एकदा पोस्टाची तिकिटे मिळतील, या आशेने आलेल्या ग्राहकासाठी कांताशेठनी आपल्या माणसाला पोस्टात पिटाळल्याची कहाणी मी ऐकलेली आहे! हा विश्वास कुठपर्यंत पोहोचावा?
एकाला पोस्टाच्या पिनकोडचे पुस्तक हवे होते. तो जीपीओत गेला. तिथे त्याला, 'आयडियलमध्ये मिळेल!' असे सांगितले गेले. आयडियलने त्याला परत पाठवले नाही. पोस्टातून मागवून घेऊन ते त्याला दिले. पोस्टातल्या त्या कुणा अनोळखी कर्मचाऱ्याच्या विश्वासालाही कांताशेठनी तडा जाऊ दिला नाही! राखावी बहुतांची अंतरे, या वचनावर त्यांची अढळ श्रद्धा असावी! पुण्यामुंबईतील लेखक प्रकाशकांची कागदपत्रे, पुस्तके यांची देवाणघेवाण सुलभ व्हावी म्हणून आयडियलमध्ये 'भिसे पिशवी' ठेवलेली असायची. कोणी भिसे नावाचे सद्गृहस्थ ती कुरिअर सर्विस द्यायचे, म्हणून ती 'भिसे पिशवी'!
१९८३मध्ये आयडियलच्या मागील बाजूस कांताशेठनी ललित पुस्तकांसाठी 'त्रिवेणी' सुरू केले. हे नाव सुचवले कविवर्य शंकर वैद्य यांनी! स्टेशनरी, क्रमिक पुस्तके आणि ललित वाङ्मय ही त्रिवेणी! वास्तविक हा काळ ललित साहित्यासाठी फार बहारीचा होता, असे म्हणता येणार नाही. तथापि या दरम्यान मुंबईतील एका महत्त्वाच्या बदलाचा 'त्रिवेणी'ला कळत न कळत लाभ झाला. या आधी गिरगाव हे ग्रंथविक्रीचे प्रमुख केंद्र होते. पण ऐंशीच्या दशकात गिरगावातील मराठी माणूस गिरगावातून हलला तो थेट उपनगरात पोचला. त्याच्यासाठी दादर हे एकूणच खरेदीचे मध्यवर्ती ठिकाण झाले. त्रिवेणीच्या अंगणात दिवाळी अंकांची तसेच अधूनमधून पुस्तकांची प्रदर्शने भरवली जाऊ लागली. लेखक, प्रकाशक, चोखंदळ वाचक, चित्रकार यांना परस्परांच्या भेटीसाठी हक्काचा 'पार' मिळाला. व. पु., रवींद्र पिंगेंसारखे साहित्यिक काही कामासाठी वा ऋजु स्वभावाच्या कांताशेठ यांच्या लोभापोटी सायंकाळच्या वेळी त्रिवेणीत पायधूळ झाडू लागले. त्यांच्याशी, तसेच जयंतराव साळगावकर, दाजी पणशीकर, पुण्याचे मेहता, यांच्याशी कांताशेठ यांचा खास दोस्ताना! या आणि अशा अनेक स्नेह्यांच्या भेटीतून नवनवीन उपक्रमांना चालना मिळत राहिली.
साहित्य क्षेत्रातील लक्ष्यवेधी घटनांच्या निमित्ताने संबंधित व्यक्तींशी गप्पांचा कार्यक्रम ठेवता येईल, या एका लेखकाच्या कल्पनेतून 'आयडियल स्तंभलेखक मंच' आकाराला आला. स्थळ: छबिलदास. वेळ: महिन्यातील एक शुक्रवार सायंकाळ. 'अंतर्नाद'ला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भानू काळे यांची, स्तंभलेखनातील विक्रमी खेळीबद्दल 'भटक्या' प्रमोद नवलकर यांची, तसेच नरेंद्र जाधव (मी आन् माझा बाप), डॉ. किशोर काळे (कोल्ह्याट्याचं पोर), अशा अनेकांच्या मुलाखती झाल्या. डॉ. य. दि. फडके यांच्या विद्वत्तापूर्ण भाषणाचा लाभदेखील मंचला झाला! नारायण सुर्वे संमेलनाध्यक्ष झाल्यावर त्यांचा शिवाजी मंदिरमध्ये सत्कार करण्यात आला! अर्थात आयोजनाची सगळी धावपळ कांताशेठ यांची! कार्यक्रमाला लेखक, प्रकाशक, पत्रकार, संपादनाशी संबंधितांची आणि महत्त्वाचं म्हणजे वाचकांची हजेरी असायची. इथे अनेकांच्या परस्परांशी ओळखी झाल्या; कायमचा स्नेह जुळला.
साहित्य व्यवहारात वाचक केंद्रस्थानी असतो, याचे भान ठेवून आयडियलच्या हिरक महोत्सवानिमित्त कांताशेठनी 'वाचक गौरव योजना' सुरू केली. सुवर्णमुद्रा तसेच रजतमुद्रा देऊन पुरस्कारविजेत्या वाचकांना सन्मानित केले. त्यातील दोन मनोगते अशी: मला फक्त पुस्तकाचे व्यसन आहे. ते हातात नसेल, तर मी कमालीचा अस्वस्थ होतो! दुसरा शेतकरी होता आणि दुपारच्या वेळी त्याची बायको भाकरीबरोबर शेतावर त्याच्यासाठी पुस्तक घेऊन जात होती! वाचन संस्कृतीला उभारी देणारा हा उपक्रम फक्त तीन वर्षे चालला. पु.लं.च्या निधनानंतर आयडियलने 'पुलंनी मला काय दिलं?' ही निबंध स्पर्धा आयोजित केली. अपेक्षेनुसार तिलाही उदंड प्रतिसाद लाभला. कमिशन, पैशाची आवक यातच गुंतून न पडता कांताशेठ वाचन संस्कृतीचा ध्यास घेऊन काम करीत राहिले. समाधानाची बाब ही की योग्य ठिकाणी त्यांच्या कार्याची नोंद घेतली गेली. 'ऑल इंडिया पब्लिशर्स असोसिएशन' या संस्थेतर्फे 'उत्कृष्ट ग्रंथविक्रेता' म्हणून कांताशेठना गौरविण्यात आले. तसेच मुंबईतील अ. भा. मराठी साहित्य संमेलनात त्यांचा सत्कार करण्यात आला. श्रमांचे, कल्पकतेचे चीज झाले. पण याच अविश्रांत श्रमांचा त्यांच्या तब्येतीवर परिणाम होऊन २०१२ साली काहीसे अकालीच, हे श्रम कायमचे निवाले! त्यांच्या पश्चात बंधू सदानंदशेठ आणि चिरंजीव मंदार आयडियलची धुरा पूर्ण क्षमतेने सांभाळत आहेत. तरीदेखील...तरीदेखील आयडियलमध्ये पाऊल ठेवल्यावर सदासस्मित मुद्रेच्या कांताशेठ यांची तेथील अनुपस्थिती जाणवत राहतेच! ....इतक्या वर्षांनंतरदेखील!
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट