अरे, काय चाल्लंय हे? याला काय अर्थय का? गंडवायचं म्हंजे किती गंडवायचं? कसे मस्त प्लानब्लिन करतो आम्ही. रात्री गुलजारांची गाणी ऐकत ऐकत झोपतो. 'जाड़ों की नर्म धूप और आँगन में लेट कर... आँखों पे खींचकर तेरे आँचल के साए को...' नमनालाच जरा विषयांतर होईल, पण खोटं कशाला सांगा. फार पूर्वी, या गाण्यातला 'जाड़ो' हा शब्द जाड्या माणसांसाठी वापरला गेला असावा, अशी आमची खात्री होती. पण नंतर नंतर जशा अनेक खात्र्या मातीमोल होत गेल्या त्यातलीच ही एक खात्री. असो. तर प्लान असा की, हे गाणं ऐकत ऐकत गुडुप झोपायचं. हेच गाणं का? तर दिवसच तसे आहेत ना, थंडीचे! आता गुलजारांच्या गाण्यातलं 'आँगन बिंगन' कुठे आमच्या नशिबी. आमच्या मजल्यावरचा दाराबाहेरचा कॉरिडॉर नि फार तर खालच्या पार्किंग स्लॉटच्या बाजूचा चिंचोळा पट्टा एवढेच काय ते आमच्या नशिबात. जाऊ दे. तर हे गाणं ऐकत ऐकत झोपायचं नि सकाळी घरच्या घरी का होईना, थंडीच्या मोसमात उबदार पांघरूणात झोप व जाग यांच्या 'सी-सॉ'वर झुलत राहायचं एवढी आमची माफक इच्छा. तर तीही पू्र्ण होऊ नये याला काय म्हणावं. आता त्या गुलजारांना काय जातंय म्हणायला, 'आँखों पे खींचकर तेरे आँचल के साए को...' इथे सक्काळी सक्काळी 'साए'बिए नाही, आमच्या डोक्यावरचं पांघरूण खस्सकन ओढलं जातं. 'पाऊस पडतोय बाहेर. वर्क फ्रॉम होम आहे तर घरासाठीही थोडं काम करत जावं माणसानं. काल बाल्कनीत कपडे वाळत टाकले होते. ते कोरडे रहावेत असं वाटत असेल तर...' या 'तर'च्या पुढे काहीच नाही. कवी कसा दोन शब्दांमध्ये अर्थांची वलयं भारून टाकतो... तसंच हे. मग पांघरूण डोक्यावरून दूर नि पावलं थेट बाल्कनीत. याला काय अर्थय का? थंडीनं, पावसानं इतकं गंडवावं? छान रंगीबिरंगी स्वेटर घालून, तो मिरवत फिरायला जायची इच्छा व्हावी, तर हा पाऊस. बरं छत्री घेऊन फिरायला जायचं तर अंगात स्वेटर नि डोक्यावर छत्री अशा वेशात आपण अगदीच 'ह्यॅ' आहोत असं वाटतं. (गणितात ३९ मार्क मिळाल्याचं मॅडमनी भर वर्गात जाहीर केल्यानंतर असं 'ह्यॅ' वाटलं होतं, त्याची दुःखभरली जखम उगाच भळभळली.) थंडीतल्या पावसाचा आणखी एक त्रास म्हणजे असा पाऊस पडला, की फेसबुकावर उफाळणारा कवितांचा फेस. आता गुलजार वगैरे आवडतात हो आम्हाला. पण म्हणून यमकांत नि कमी शब्दांत लिहिणारा प्रत्येक जण कवी थोडाच असतो! 'पडला थेंब... लिही कविता...' असा प्रकल्प राबवणाऱ्या कवींबद्दल काय बोलायचं? अहो, काही कवी तर जी कविता ऑगस्टातल्या पावसात पोस्ट करतात तीच कविता जानेवारीतल्या पावसात पुन्हा पोस्ट करतात. परवाच एक कविता पाहिली. 'या अवकाळी पावसाने, तुझी याद आली...' की काय तरी. जरा शंका आल्यानं मी मागे जाऊन पाहिलं तर ऑगस्टात, 'या पावसाने तुझी याद आली...' अशी त्याच कवीची कविता दिसली. काय हे? गंडवायचं म्हंजे किती गंडवायचं. आवरा रे या पावसाला... नि या कवींना... याला काय अर्थय का?
- चकोर
---
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट