संजय डहाळे
पैसा, प्रसिद्धी, पदे यांच्यामागे न लागता एखाद्या ध्येयासाठी झपाटलेल्या नेत्यांमध्ये सुधीर जोशी यांचे कार्य मुंबईच्या इतिहासात नोंद घेण्याजोगे. स्थानिकांच्या रोजगाराच्या प्रश्नांसाठी मुंबईच्या ५० वर्षांच्या एका परिवर्तनकाळात त्यांनी नोकऱ्यांसाठी जी पाऊलवाट धरली, त्याचा कालांतराने महामार्ग बनला. त्यांनी मराठी तरुणांसाठी शासकीय, निमशासकीय, बँका, खासगी आंतरराष्ट्रीय कंपन्यात पाठपुरावा केला. प्रसंगी पत्रव्यवहार, शिष्टमंडळ आंदोलन, संप यातून भूमिपुत्रांच्या नोकऱ्यांसाठी संघर्ष केला. अर्थात या वाटचालीत त्यांच्यामागे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 'शिवसेना'रूपी जबरदस्त शक्ती आणि ताकद खंबीरपणे उभी होती.
साठच्या दशकात मुंबईत अनेक कंपन्या आल्या. त्या हातपाय पसरू लागल्या. पण साऱ्या नोकऱ्या अमराठी नोकरदारांकडे जात होत्या. मराठी माणसाकडे पद्धतशीर दुर्लक्ष होऊ लागले. पंजाब ते केरळ आणि बंगाल ते बिहार इथल्या नव्या पिढीची जणू जशी हक्काने 'आयात' सुरू केली. नेमके याच ज्वलंत विषयावर मार्मिक साप्ताहिकातून शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाला जागे केले आणि १९ जून, १९६६ या दिवशी प्रबोधनकारांच्या मार्गदर्शनासाठी शिवसेनेचा जन्म झाला. भूमिपुत्रांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देण्याची शपथ घेतली गेली. दत्ताजी साळवी, वामनराव महाडिक, प्रमोद नवलकर, मनोहर जोशी आणि सुधीर जोशी या पाच पांडवांनी पुढे हे रणशिंग फुंकले. त्यात सुभाष देसाई, अॅड. लिलाधर डाके, मधुकर सरपोतदार, दिवाकर रावते, नारायण राणे, रमेश प्रभू, रामदास कदम, गणेश नाईक, शरद आचार्य असे दिग्गज नेते जोडले गेले.
मराठी तरुणांनी इंग्रजी भाषेतून टाइपिंग शिकावे, उच्च शिक्षण घ्यावे, इंग्रजी वर्तमानपत्रातील स्थानिक नोकऱ्यांच्या जाहिराती वाचाव्यात, मुंबईतला व्यापार, उद्योग, नोकऱ्या यात मराठी तरुणांनी उमेदवार म्हणून प्रयत्न करावा, फक्त मराठी उपहारगृहातून खरेदी करावी, उडप्यांवर बंदी घालावी, सहकारी तत्त्वावर गृहनिर्माण संस्था स्थापन कराव्यात, मराठी माणसाने आपली मालमत्ता परप्रांतीयांला विकू नये अशा किमान ११ मार्गदर्शक तत्त्वांच्या मांडणीवर शिवसेनेचे एक प्रतिज्ञापत्र तयार झाले आणि त्यावेळी रुपारेल कॉलेजातून बीएससी झालेले सुशिक्षित, तरुण नेतृत्व जोशी हे भारावले गेले. शिवसेनेकडे आकृष्ट झाले. दादर म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्लाच बनला. जिथे सुधीरभाऊंचे वास्तव्य होते. दादरची शाखा क्रमांक ६१मध्ये हमखास संध्याकाळी त्यांची उठबस सुरू झाली. प्रत्येकाशी संवाद साधण्याच्या त्यांच्या कसब व कौशल्यामुळे आकर्षण वाढत होते. त्यातूनच रोजगाराच्या प्रयत्नांसाठी 'स्थानिक लोकाधिकारी समिती' उभी राहिली. त्यांच्यासोबत गजानन कीर्तिकर आले. दोन 'भाऊं'नी ही चळवळ पुढे नेली, त्यांना शेकडो कार्यकर्ते मिळाले. त्याचा थेट परिणाम म्हणजे 'शिवसेना' लढाऊ राजकीय पक्ष म्हणून मजबुतीने महाराष्ट्रभरात उभा राहिला. 'राडेबाज' म्हणून तो शिक्का काहीदा बसला होता. बेरोजगार हे 'लोकाधिकार'च्या दिशेने गर्दी करू लागले. एक सुरक्षित धीरगंभीर हक्काचे घर म्हणून ही चळवळ ठरली. त्यातून अनेक मध्यमवर्गीय कुटुंबीयांना मुंबईत घट्ट पाय रोवून उभ राहण्याचे नैतिक बळ मिळाले आणि 'शिवसेना-भाजप' सत्तेवर आल्यानंतर युती काळात तर स्वतंत्र 'रोजगार' खातेही सुरू झाले.
आज वयाची ८२ वर्षे पूर्ण करणारा हा नेता मुंबईच्या महापौरपदापासून ते महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्रिपदापर्यंत पोहोचला. मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत राहिला. आपल्या कामाचा एक स्वतंत्र ठसा त्यांनी प्रत्येक जबाबदारीत उमटविला. थेट राजकारणात असूनही त्यात 'लोकाधिकार' चळवळीमुळे आपले वेगळेपण जपले. भ्रष्टाचाराचा किंवा घोटाळ्यांचा - गैरप्रकारांचा आरोप त्यांच्यावर या काटेरी प्रवासात कधीही झाला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात त्यांनी सुशिक्षित कार्यकर्त्यांची मोठी फौजच जमा केली. जी प्रत्येक निवडणुकीत, आंदोलनात एका पायावर सज्ज राहायची. दादर येथे भोजनालय चालविणारे त्यांचे वडील गजानन जोशी. त्यांचे मामा हे शिवसेना नेते मनोहर जोशी. शिवसेना भवन, शिवतीर्थ, शिवसेना शाखा म्हणजे त्यांचे हक्काचे घरच. एक सुविद्य मुलगा प्रशांत आहे. तो राजकारणापासून तसा दूरच. पत्नी सुहासिनी तिनेही या वादळाला जपले. कुठलाही बडेजावपणा नसणारा हा 'हटके' नेता.
१९९०ची विधानसभा निवडणूक. जी शिवसेना पक्षाच्या भवितव्याची नांदी आणि परीक्षा जशी होती. शिवसेना-भाजप मतदारांसमोर सामोरे गेली. निवडणूक राज्यभरात लढवून जिंकायची यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात आली. यावेळी सुधीरभाऊंनी उभ्या केलेल्या लोकाधिकार समितीचा चांगलाच उपयोग झाला. उमेदवारांची निवड, अर्ज भरण्यापासून ते प्रसिद्धी यंत्रणा राबविण्यापर्यंतचे जे नियोजन व प्रशिक्षण झाले त्यात सुधीरभाऊ आघाडीवर होते. उभा महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला आणि शिवसेनेचे ५२ आमदार विधानसभेत पोहचले. एका सदस्यापासून ५२ सदस्यांपर्यंतच्या चमत्कारामागे शिवसेनेच्या झंझावाती जाहीरसभा तसेच लोकाधिकारची परिपूर्ण अद्ययावत यंत्रणा कारणीभूत ठरली....
'एअर इंडिया'तील भरतीसाठी झालेला पहिला प्रचंड मोर्चा...आंदोलनातून लोकाधिकारचा जन्म जरी झाला असला तरीही लोकाधिकार समिती महासंघाची अधिकृत स्थापना १३ डिसेंबर, १९७२ या दिवशी शिवसेनाप्रमुखांनी केली. सुधीरभाऊंना अध्यक्ष करण्यात आले. सर्व राष्ट्रीयीकृत बँका, हवाई कंपन्या, परदेशी बँका, विमा कंपन्या यात आज जो काही मराठी टक्का दिसतो आहे, त्यामागे लोकाधिकारचे श्रेय सर्वाधिक आहे. त्यावेळी अनेक व्यवस्थापनांनी त्याचा धसका घेतला. त्यांना दणका मिळाला. त्यामुळेच मराठी भूमिपुत्रांना सन्मानाने शिरकाव करता आला. केवळ मागण्या करून सुधीरभाऊ थांबले नाहीत, तर स्पर्धात्मक परीक्षेसाठी मार्गदर्शक अभ्यास वर्ग सुरू केले. एक पद्धतशीर रणनीतीचे तंत्रमंत्र आणि दूरदृष्टी त्याला कारणीभूत ठरली. त्यातून लोकाधिकारला एका उंचीवर त्यांनी नेले.
सुधीरभाऊंमध्ये असणाऱ्या एका भावनाप्रधान माणसाचे किस्सेही सांगितले जातात. एकदा भाषणात शिवसेनाप्रमुख म्हणाले होते की, 'प्रत्येक जण आपली पदे घेऊन चिटकून कायम बसले तर नव्यांना संधी कधी कशी मिळणार!' सुधीरभाऊंनी त्यावर आदेश समजून १९७७ साली लोकाधिकारच्या अध्यक्षपदाचा तत्काळ राजीनामा दिला. पण ते पुढे मार्गदर्शकाच्या भूमिकेत कायम उभे राहिले. अपघात आणि आजारपण यामुळे त्यांनी १९९९मध्ये सक्रीय राजकारणातून निवृत्तीही घेतली. पण त्यांच्या मुशीतून बाहेर पडलेले कार्यकर्ते हे देशाच्या कॅबिनेट मंत्रिपदापर्यंत पोहचले. आमदार, खासदार, नेतेही बनले. साऱ्यांनी लोकाधिकारचे महत्त्व, अस्तित्व सिद्ध केले.
मुंबईच्या एका सेवाभावी चळवळीतून आकाराला आलेला हा नेता. गरवारे क्लब, साने गुरुजी शाळा, दादर सार्वजनिक वाचनालय, शिवाई ट्रस्ट - यासह अनेक शैक्षणिक सामाजिक संस्थांच्या वाटचालीचा साक्षीदार आहे. शिवसेनेशी अंगीकृत अनेक समित्या, संघ, संघटना यात नेतृत्वाचे शिकवण देणारा हा नेता तब्येतीमुळे काहीसा अंधारात दुर्लक्षित जरूर आहे. पण ज्यांची आदर्श पारदर्शक कार्यपद्धती लोहचुंबकाप्रमाणे नव्या पिढीला सुरक्षित स्थळ हे आजही खुणावते आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट