Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2741

सासू बोले, सुने लागे!

$
0
0

बाप रे, भारीच चिडल्या होत्या त्या. म्हणजे काय! आगबबुलाच झाल्या होत्या सासूबाई. इंग्रजीतून बोलत होत्या. हिंदीतून बोलत होत्या. इतक्या रागात, इतक्या रागात, की 'व्हॉट इज गोइंग ऑन' म्हणे. 'आप बिन किसके आगे बजा रहे है?' असं आणि 'गलाही घोट दिजीए हम लोगों का...' असंही म्हणे. हे म्हणे... ते म्हणे इथपर्यंत ठीक होतं. विरोधकांनी तसा आक्षेप घेण्याचं कारण नव्हतं; पण नंतर जे म्हणाल्या, त्यानं हलकल्लोळ नुसता.

सासूबाईंचा स्वभाव तसाही रागीट आहे म्हणे. लवकर पारा चढतो म्हणे. त्यांना शांत करणं भल्याभल्यांच्या बसचं नाही, असंही म्हणे! आपण ऐकलं आहे बुवा. प्रत्यक्ष अनुभव काही आला नाही. त्यांनी काही चहाला बोलावलं नाही आणि आमच्याकडून त्यांच्याकडे वाटीभर साखरेसाठी कुणी गेलं नाही. अंतर लांब आहे. जाणं होत नाही आणि तसंही आपण दुसऱ्यांच्या गोष्टीत लक्ष देत नाही. आपण भलं आणि आपलं काम भलं. घरचं झालं थोडं नि व्याह्यानं धाडलं घोडं असं काही झालं, तर घोड्याचं करणार कोण?

पण, तरीही सांगतो, चहूबाजूकडं लक्ष ठेवलं पाहिजे. आपल्याला सारं काही माहीत असलं पाहिजे. यासाठी वाचत राहतो असं अधूनमधून. वाचल्यानं माणसाचं ज्ञान वाढतं. ज्ञान वाढलं, की नानाविध विषयांवर बोलता येतं. बोलता आलं, की भाषण देता येतं. भाषण देता आलं, की नेता होता येतं. नेता होता आलं की... जय हो!

तर, बातमी सांगत होती, सूनबाई आणि सासूबाईचं अधूनमधून पटत नाही. कडाक्याचं भांडणबिंडण झालं म्हणे. 'कॅपिटल बी'देखील दबकून असतात म्हणतात बुवा. 'कौन बनेगा'मध्ये मागं नाही का नात आली होती, तेव्हा 'आता माझी घरी गेल्यावर खैर नाही' म्हणे ते. आरारा... दरारा! विषय सार्वजनिक होऊ नये, म्हणून मग त्यांनी हसण्यावरी नेलं खरं; पण इस हसी के पिछे क्या वेदना नजरेतून सुटल्या नाहीत काही आमच्या. अशा गोष्टी नजरेतून सुटूच देत मुळी. भलेही नंतर अळीमिळी गुपचिळी!

तर, सांगतो काय परवाही सासूबाई जाहीर संतापल्या. पार राग राग. 'आप के बुरे दिन बहोत जल्दी आने वाले है!' म्हणे. असा शापच देते, असंही म्हणे. दुसऱ्याच क्षणात त्यांच्या रागाचं व्यवच्छेदक लक्षण शोधण्याचं कार्य सुरू झालं. ट्विटर म्हणू नका, कू म्हणू नका, की का-कू म्हणू नका! इत्थंभूत विवेचन. मुख्य निष्कर्ष असा, की सूनबाईंचं 'पेपर'मध्ये आलेलं नाव. सासूबाईंचा संताप म्हणजे, सासू बोले, सुने लागे! म्हणे, इकडे सूनबाईला पनाम्याच्या पेपरच्या चौकशीसाठी बोलावणं धाडलं, म्हणून तिकडं सासूबाई उद्विग्न. योगायोगही असावा! कुणास ठाऊक! योगायोगाचा परमोच्च मनमोहन देसाईंच्या सिनेमांतच असतो असं कुठं आहे!

पण यामुळे सासू नि सून एकाच दिवशी चर्चेत. सासूंतही चर्चेत आणि सुनांतही चर्चेत. पार दिल्ली ते मुंबई चर्चा. एक गट सूनबाईंचा नि एक गट सासूबाईंचा. एक गट तटस्थ राहतो म्हणे; पण तटस्थ राहण्याची आजकाल मुभा नसल्यानं ते 'धर्म'संकटात पडलेत म्हणे. काय म्हणे नि काय नाही म्हणे! एक मात्र खरं, काही नाती ना, खूप नाजूक असतात. सासू-सुनेचंही नातंही असंच अगदी नाजूक; साजूक तुपाची शप्पथ!

- चकोर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2741

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>