भारतातल्या नेत्यांना नट्यांच्या गालांविषयी विशेष प्रेम आहे, हे एव्हाना सर्वश्रुत आहे. लालूप्रसाद ते गुलाबराव पाटील अशी ही मोठी रेंज आहे. आपल्या भागातील रस्ते हेमामालिनी यांच्या गालासारखे असावेत, ही या नेत्यांची सर्वोच्च फँटसी आहे. हे दोन्ही नेते मोकळेढाकळे असल्यामुळं त्यांनी आपल्या मतदारांसमोर तसं स्पष्ट बोलून दाखवलंही. हेमामालिनी काय किंवा कुणी अन्य नटी काय, तिच्या गालांविषयी असं बोलू नये, हे सुज्ञ नेत्यांना, सामान्य जनतेला कळतं. मात्र, गुलाबराव हे नावाप्रमाणंच रसिक व्यक्तिमत्त्व असल्यामुळं, त्यांना गुळगुळीत रस्त्यांच्या जागी हेमामालिनीचे गाल दिसत असतील, तर त्यांनी तरी काय करावं बरं! लालूप्रसाद यांना नव्वदच्या दशकात बिहारच्या रस्त्यांबाबत वक्तव्य करताना हेमामालिनींचे गाल आठवले होते आणि आता इतक्या वर्षांनंतर गुलाबरावांनाही हेमामालिनीच आठवत असतील, तर यात हेमामालिनी यांचं कौतुकच आहे. त्यांनी स्वत:ला फिट राखत वयावर मात केली आहे. इतक्या वर्षांत गुलाबरावांना आलिया, कतरिना किंवा तापसी वगैरे सोडाच; पण श्रीदेवी, माधुरी, जूही, काजोल, विद्या याही आठवत नसतील, तर हेमामालिनी यांचं 'ड्रीमगर्ल' स्थान इतक्या वर्षांनंतरही अढळ आहे, असंच म्हणावं लागेल. आता एकदा नट-नट्यांची उपमाच द्यायची, तर गुलाबरावांनी आणखी काही उदाहरणांसाठी काही विशिष्ट नटांचं उदाहरण द्यायला काय हरकत आहे? कुणी आक्रस्ताळा विरोधी नेता असेल, तर हे लोक त्याला 'मोगॅम्बो' अमरीश पुरी का म्हणत नाहीत? किंवा कुणी फारच विनोदी बोलत असेल, तर त्याला 'दादा कोंडके' म्हणून का पाहत नाहीत? कुणी उगाच खोटी आश्वासनं देत असेल, तर त्याला 'काय बच्चन देतो रे?' असं म्हणून बघावं ना! आणि समजा, उलट झालं आणि नट-नट्यांनी त्यांच्या बोलण्यात राजकारणी लोकांची उदाहरणं द्यायची ठरविली तर? अवघड होईल! एखाद्या नटीनं दुसऱ्या एखाद्या आक्रस्ताळ्या कजाग नटीला 'ती बॉलिवूडची मोमोतादीदी आहे,' असं म्हटलं तर? किंवा सतत नट्यांच्या घोळक्यात असलेल्या एखाद्या नटाला 'दिल का थरूर' म्हटलं तर? आणि नट-नट्यांपैकी कुणी सतत 'फेकत' असलेल्या कुणा नटाला समजा, चुकून कुणी - जाऊ द्या - तोबा तोबा! काही न बोललेलं बरं! केवळ कल्पना करूनही परिणामांचा धोका जाणवतो. तेव्हा आपण काय बोलतो, कुठं बोलतो, कुणासमोर बोलतो याचं भान सगळ्यांनीच, विशेषत: नेत्यांनी थोडं बाळगायला काय हरकत आहे! आपलं विधान कुणासाठी तरी अपमानास्पद असू शकतं, हे या मंडळींच्या आधी कसं लक्षात येत नाही? विनोदनिर्मिती किंवा विनोदी बोलणं ही पूर्ण वेगळी गोष्ट आहे. कुणालाही न दुखावता किंवा कुणाचा, विशेषत: स्त्रियांचा अनादर न करता सार्वजनिक व्यासपीठावरून बोलता यायला हवं. नाही तर सतत दिलगिरी, माफीनामे, क्षमायाचना यातच एखाद्याचं राजकीय करिअर संपून जायचं... विनोद ही आयुष्यातली महत्त्वाची गोष्ट आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी हीच दुधारी तलवार ठरते. समोरच्यावर अपमानास्पद व कथित 'इनोद' करायला गेलात, तर आपलंच शेपूट तुटून हाती येऊ शकतं, हे सर्व गुलाबरावांनी, कमळकाकूंनी, पंजेताईंनी आणि घड्याळदादांनी लक्षात ठेवलेलं बरं!
- चकोर
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट