पुण्यात लक्ष्मी रोडवर रविवारी 'वॉकिंग प्लाझा' नामक उपक्रम पार पडला. आनंद वाटला. त्यानिमित्ताने का होईना; पण रविवारी आपण लक्ष्मी रस्त्यावरून धड चालू शकतो, असा किंचितसा आत्मविश्वास आम्हास प्राप्त झाला. (एरवी हा आनंद फक्त गणपती विसर्जनाच्या दिवशी...) त्यामुळं दुसऱ्या दिवशीही आम्ही हाच प्रयोग करू गेलो असता, खऱ्याखुऱ्या लक्ष्मी रोडचे प्रत्यंतर आम्हाला आले. रणांगणात मधोमध सापडलेल्या आणि ढाल-तलवार गमावलेल्या योद्ध्याला काय वाटत असेल, हे तेव्हा आम्हाला कळलं. तसंही त्या परिसरात खरेदीला जाणं, म्हणजे युद्धभूमीवर निघाल्यासारखीच तयारी करून निघावं लागतं. त्यातही तुमच्यासोबत वामांग असेल आणि तिनं तुळशीबाग या अलौकिक ठिकाणास भेट देण्याची इच्छा प्रदर्शित केली, तर तुम्ही तो एक दिवस आपल्या आयुष्यात उगवलाच नाही, असं खुशाल समजू शकता. मराठी भाषा किती उत्क्रांत झालीय, याचे अक्षरश: पदोपदी दाखले इथं मिळतात. कुठल्याही कारणानं आपल्या अंगी माज, मस्ती, गर्व, आत्मगौरव, अवास्तव स्वाभिमान, घराण्याचा अभिमान, आत्मस्तुती आदी गोष्टींचा संसर्ग झाला असेल, तर तो अवघ्या एका मिनिटात नष्ट करण्याची अद्भुत क्षमता या साधारण दीड ते दोन चौरस किलोमीटरच्या भूमीत आहे. इतर अनेक महान पाट्यांसारखी 'येथे मस्ती उतरवून मिळेल,' ही अदृश्य पाटी बहुतांश दुकानांवर आणि अनेकदा दुकानदारांच्या चेहऱ्यावरही लिहिलेली असते. युद्धभूमीवर निघालेल्या योद्ध्यासारखे तुम्ही इथं येता आणि गाडी पार्क करणं या पहिल्याच प्रश्नाला दांडी उडते. लक्ष्मी रोडवर जिथं खरेदी करायची आहे, त्या दुकानाच्या समोरच मी गाडी पार्क करीन, अशी प्रतिज्ञा केलीत, तर बहुधा पुढल्या जन्मातच तुमची खरेदी पूर्ण होईल, याविषयी निश्चिंत असावे. खरेदी करायची फारच हौस असेल, तर किमान दोन किलोमीटर अंतरावर गाडी लावूनच, पायपीट करीत लक्ष्मीचरणी लीन व्हावे लागते. त्यातून तुम्ही चारचाकी वगैरे आणणार असाल, तर नदीकाठच जवळ करावा लागतो. (जगात कुठेही नसेल अशी नदीपात्रात पार्किंगची सोय आमच्या शहरात उपलब्ध आहे.) एकूण इथं कुणी वाहनं आणूच नयेत आणि शक्यतो चालत सर्वत्र फिरावं, असा केवळ तुमच्या आरोग्याचा विचार करणारं वातावरण इथं असतं. पार्किंगचं ठिकाण ते खरेदीचं इष्ट दुकान यादरम्यान अनेकांचा रोजच 'वॉकिंग प्लाझा' होत असतो. त्यात लक्ष्मी रोडला आलं, की तुळशीबाग आणि मंडई जोडीनं येते. त्यातही तुळशीबागेचा रणसंग्राम जिंकण्यासाठी स्त्री-जन्मालाच यावं लागेल. इथं पुरुषजन्मानं कायमचे हात टेकले आहेत. इथल्या मंदिरात गेली कैक वर्षं शांतचित्तानं आपल्या पत्नीसोबत उभ्या असलेल्या श्रीरामाचा आदर्श घेऊन, आपल्या पत्नीशेजारी तिची खरेदी होईपर्यंत शांतपणे उभं राहण्याची 'मर्यादा पुरुषोत्तम' परीक्षेची प्राथमिक कसोटी पार केलीत, तर तुम्ही इथं येण्यास पात्र ठरलात असं समजून चाला. बाकी 'वॉकिंग प्लाझा' वगैरे उपक्रमामुळं अनेक लोक बराच काळ उगाचच दुकानांसमोर उभे राहतात, अशी दुकानदारांची तक्रार लवकरच येईल आणि 'वॉकिंग प्लाझा'ऐवजी 'रनिंग प्लाझा' सुरू करावा लागेल, याबद्दल आमच्या मनात अजिबात शंका नाही.
- चकोर
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट