Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2741

चार फुल, एक हाफ!

$
0
0

गणाजीची स्वारी भलतीच खुशीत होती. काय करू अन् काय नको, असं झालेलं. 'चार फूल, एक हाफ...,' 'चार फूल, एक हाफ,' एवढंच बडबडताना आनंदाच्या भरात उड्या मारायचा तो बाकी होता. यांना आणखी एक सुट्टी मिळालेली दिसते. आता कुठंतरी बाहेरगावी जाण्याचा बेत आखला जात असावा, म्हणूनच ते एसटी तिकिटाच्या भाषेत बोलत असावेत, असं अर्धांगाला वाटलं. थोडा विचार केल्यावर 'चार फुल' बरोबर आहे. परंतु, 'एक हाफ'ची काय भानगड आहे, असं म्हणत त्यांनी डोळे वटारले. तसा गणाजी सावध झाला. 'भानगड बिनगड काय नाय. दुबईत कर्मचाऱ्यांना कामाचा नवा फॉर्म्युला लागू झालाय. तो आपल्याकडंही येईल', असा खुलासा त्यानं केला. 'म्हंजे', अर्धांग उत्तरलं. 'यापुढं दुबईत कामगारांना आठवड्यातले साडेचार दिवसच काम करावं लागणार आहे. बाकी अडीच दिवस मज्जाच मज्जा,' गणाजीनं उकल केली. 'अस्स होय. मग तिकडंच जावा नोकरीला. तुम्हाला इथंही कुठं काय काम असतं?' असं सुनावत अर्धांग स्वयंपाकघरात रवाना झालं.

परदेशात काहीतरी ठरतंय अन् ते काही दिवसांनी इकडंही लागू होतंय, हे गणाजीनं अनुभवलं होतं. 'फाइव्ह डेज वीक' सुद्धा तिकडूनच आला, असं तो प्रत्येकाला सांगायचा. त्यामुळंच दुबईतल्या नव्या स्ट्रक्चरचा तिथल्या कर्मचाऱ्यांएवढाच किंबहुना कांकणभर अधिकच आनंद त्याला झालेला. तसं सुट्टी घेणे वा दांड्या मारणे हा त्याचा जिव्हाळ्याचा विषय. परवाच त्यानं 'इयर एन्ड'ला सुट्टी पाहिजे म्हणून सायेबाला डोकं लावलं. ना-ना बहाणे केले. 'अनेक जण रजेवर असल्यानं तुला देता येणार नाही आणि गेल्याच महिन्यातच तू सुट्टी घेतली होती', हे सप्रमाण दाखवून दिल्यानंतरही तो माघार घेईना. सुट्टीबाबत आपल्यावर अन्याय होतोय, हेही त्यानं सांगून पाहिलं. शेवटी सायबानं आवाज वाढवल्यावर मागे हटला. किमान 'वर्क फ्रॉम होम' तरी द्या, अशी विनवणी केली. परंतु, उपयोग झाला नाही. खरंतर करोना काळात 'वर्क्र फ्रॉम होम'चाही सर्वाधिक लाभार्थी तोच होता. खुर्चीत बसल्याबसल्या कुटुंबकबिल्यासोबत गरमागरम चहा अन् जेवणाचा स्वाद घेताना 'याचसाठी केला होता अट्टहास' अस तो मनोमन म्हणायचा. कचेरीत आल्यावर 'टू पंच, वन लंच' एवढंच कर्तव्य चोख बजावायचा. सातवा आयोग आल्यानंतरही पाश्चात्य देशांच्या तुलनेत पगार तोकडाच असल्याचं तो ठासून सांगायचा. कामाच्या मुद्द्यावर मात्र मौन. केवळ कर्मचाऱ्यांचं कौटुंबिक स्वास्थ्य जपण्यासाठी दुबईत झालेल्या निर्णयाचं त्याला अप्रूप वाटलं. लोकशाहीपेक्षा राजेशाही बरी, असा तर्क मांडून दुबईत नोकरी करून दिनारमध्ये वेतन घेण्याचा विचारही डोकावला. परंतु, 'कर्तबगारी' लक्षात घेत त्यानं स्वत:ला सावरलं. तिकडं जाण्यापेक्षा इकडेच नवा फॉर्म्युला लागू झाल्यास दर पंधरवाड्याला दांडी मारून किमान दहा सुट्या मिळतील, हे गणितही त्यानं मांडलं. साडेचार दिवसांच्या कार्यबाहुल्यामुळे कामगारांची कार्यकुशलता वाढत असल्याचं टिपण त्यानं तयार केलं. कामगार आयुक्त, मंत्र्यांना निवेदन देण्याचंही ठरवलं. शुभकार्याला उशीर नको म्हणत 'चार फूल, एक हाफ' डोक्यात ठेवूनच संघटनेच्या कार्यालयाच्या दिशेनं तो रवाना झाला.

- चकोर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2741

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>