पोलिसांच्या आरोग्याची स्थिती काय आहे?
पोलिसांवर शारीरिक आणि मानसिक ताण खूप आहे. त्यांच्या जेवणाच्या वेळाही अनियमित आहेत. मध्यंतरी झालेल्या एका पाहाणीत ९० टक्के पोलिसांचे वजन प्रमाणापेक्षा अधिक होते. त्यातच त्यांना सिगारेट व तंबाखूचे व्यसन असते. उच्च रक्तदाब व डायबेटिस झाला, तर त्यांच्याकडे उपचारासाठी पुरेसे पैसेही नसतात. त्यामुळे ते जिवावर बेतेपर्यंत वैद्यकीय तपासणी करत नाहीत. पोलिसांच्या नियुक्त्या करताना त्यांची वैद्यकीय तपासणी होते. पण प्रत्येक पोलिसाचे वय ३५पेक्षा अधिक झाल्यावर त्यांची वैद्यकीय तपासणी झाली पाहिजे. त्यांना मोफत औषधे मिळाली पाहिजेत. कारण औषधे खूप महाग असल्याने कमी पगारातून ती विकत घेणे कठीण होते.
पोलिस व त्यांच्या कुटुंबियांना मोफत वैद्यकीय उपचारांची सुविधा उपलब्ध आहे ना?
पोलिसांना मोफत वैद्यकीय उपचारांची सुविधा फक्त कागदावरच आहे. त्यात 'जर' आणि 'तर'च्या खूप अटी आहेत. अलिकडेच एका पोलिसाच्या आईला जे.जे. हॉस्पिटलमध्ये माझ्याकडे उपचारांसाठी आणले होते. अॅन्जिओग्राफी झाल्यानंतर तिची अॅन्जिओप्लास्टी करण्याचे ठरले. यासाठी अगोदर स्वतःच्या खिशातून पैसै भरावे लागतील असे या पोलिसाला सांगण्यात आले. त्यानंतर त्याचे पैसे त्याला परत मिळतील असे सांगितले. पण बॉम्बे हॉस्पिटलमध्ये अॅन्जिओग्राफी झाली तर त्याचे पैसे थेट वीमा कंपनी देईल. पोलिसांसाठीच्या वीमा संरक्षणातून हे पैसे दिले जातील, असे सांगण्यात आले. त्यामुळे या पेशंटला जे. जे.मधून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. म्हणजे सरकारने सरकारी हॉस्पिटलना वगळून खासगी हॉस्पिटलना मान्यता दिली आहे.
पोलिसांसाठीच्या वीमा कवचाचा फायदा होत नाही का?
पोलिसांना वीमा सुविधा दिली आहे. पण वर्षातून एकदाच त्यांना फायदा घेता येतो. म्हणजे एकदा अॅन्जिओप्लास्टी झाली तर पुन्हा करता येत नाही. सर्वप्रथम वैद्यकीय बिलांची प्रतिपूर्ती (रिएंबर्समेंट) करण्याची पद्धत बंद होणे गरजेचे आहे. आयपीएस अधिकारी त्यांच्या खिशातून पैसे खर्च करून मग सरकारकडून त्याची प्रतिपूर्ती करू शकतात. पण कॉन्स्टेबलकडे स्वतःच्या खिशातून पैसे कसे खर्च करणार? त्यासाठी पोलिसांना औषधे मोफत मिळाली पाहिजेत. कारण पैसे खर्च करून त्याची प्रतिपूर्ती करण्याच्या पद्धतीत खूप भ्रष्टाचार होतो.
पोलिसांनी कोणती काळजी घ्यावी?
वजन वाढवू नका. तंबाखूसेवन नको. कारण पोलिस खात्यात १० पैकी पाचजण तंबाखूचे सेवन करतात. मद्यपानापासून लांब राहा . जेवण वेळेवर घ्या. आरोग्यदायी आहार घ्या. घरून चपाती-भाजी घेऊन बाहेर पडले तर सर्वात उत्तम. उच्च रक्तदाब किंवा डायबेटिस असल्यास योग्य उपचार करा. नियमित तपासणी करा. वेळेवर औषधे घ्या. आजार बरा झाल्यावर योग्य काळजी घ्या. पोलिसांना घरच्या जेवणासाठी सरकारने मुंबईतल्या डबेवाल्यांच्या सेवेचा फायदा करून घ्यावा. पोलिस रात्री उशिरा घरी पोहोचतात. सकाळी ड्युटीवर लवकर जावे लागते. त्यामुळे घर व पोलिस स्टेशनजवळ असले तर पोलिसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी त्यांना सुटी मिळणेही गरजेचे आहे.
(राजेश चुरी)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट