Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2741

चंदनाचे हात

$
0
0

>> प्रा. डॉ. यशवंत पाटणे

स्वामी विवेकानंदांनी 'रामकृष्ण मिशन' मधून कोणत्या धारणेचे संन्याशी निर्माण व्हावेत, याचे एक चित्र शतकापूर्वी रेखाटले होते. आपल्या संन्याशाने ध्यानात राहावे, शास्त्रांची गहन चर्चा करावी, पण त्याच वेळी मठाची जमीन नांगरताना त्याला अडचण व बाजारात धान्य विकताना संकोच वाटू नये. शुद्र गोष्टीवर बुद्धी खर्च न करता, त्याने प्राचीन उपनिषदे, रामायण, महाभारतातील श्रेष्ठ आदर्शांचे अनुकरण करावे. आत्मज्ञानी व्हावे. आत्मा हा मूलतः ज्ञानस्वरूपी आहे. काही कारणाने त्यावर मायेचे आवरण येते. आध्यात्मिक विचारांनी ते दूर करता येते. मग चिन्मय ब्रह्माची अनुभूती येते. तोच अद्वैताचा साक्षात्कार. त्याला पायाभूत असणारे तत्त्वज्ञान म्हणजे अद्वैत वेदातांचा विचार होय. हा विचार केंद्रस्थानी ठेवून, विवेकानंदांच्या अमृतवाणीला मूर्तस्वरूप देण्याचा ध्यास एका देवमाणसाने घेतला, त्याचे नाव शुकदास महाराज.

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील 'विवेकानंद नगर' आणि तेथील 'विवेकानंद आश्रम' ही त्यांची किमया. कुमार वयातच त्यांनी हिवरे बुद्रुक गावात 'अद्वैत वेदान्त अभ्यास मंडळाची' स्थापना करून लोकांना स्वच्छतेचे, आरोग्याचे, परमार्थाचे धडे दिले. विवेकनंदाचा कर्मयोग वाचून घर सोडले. नागपूरचे रामकृष्ण मिशन गाठले. दीक्षा मागितली. झाडलोट सेवेची तयारी दाखविली. पण वयाचे कारण पुढे करून दीक्षा नाकारली गेली. पुन्हा गावात येऊन अंधश्रद्धा व रोगराई निर्मूलनाचा चंग बांधला. आजूबाजूच्या शहरी वस्तीतल्या डॉक्टर्संना विनंती करून तपासणीचे वार ठरविले. काही महिने हा उपक्रम चालला. मग ह्या तरूणाने निर्धार केला. स्वतःच औषधशास्त्राचा अभ्यास सुरू केला. वैद्यकीय ग्रंथातील इंग्रजी भाषा अवगत करण्यासाठी गावातील शेळकेगुरूजींची मदत घेतली. भौरद, सस्ती (वाडेगाव) येथे ग्रामस्थांना वैद्यकीय ज्ञानाचा लाभ दिला. पण लोकांचा माणसांपेक्षा देवावर विश्वास. यासाठी मल्लिकेश्वर, महादेवाची मंदिरे उभारून, देवाचा प्रसाद करून औषधे दिली. कोट्यवधी रूग्णांच्या सेवेचे पुण्य जोडले. सवंगडी जमवले. लोकवर्गणीतून हिरा येथे थोडी जमीन घेतली. 'विवेकानंद आश्रमा'ची पायाभरणी केली.

आध्यात्मातील निष्क्रियता दूर करून, धर्माला लोकसेवेची जोड देणाऱ्या या आश्रमाने सुवर्णमहोत्सव साजरा केला. आज आश्रमाच्या दोनशे एकराच्या परिसरात शेती आहे. शेकडो गाईगुरांनी सुज्ज अशी गोशाळा आहे. कृषी, व्यवसाय, विज्ञान महाविद्यालये, अपंग, कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी विद्यालये डौलाने उभी आहेत. शुकदास महाराज म्हणतात, वेगाने वाढणारी झाडे वादळात टिकत नाहीत. त्यासाठी वटवृक्षाचे व्रत घ्यावे लागते. मुळे जसजशी खोल जातात, तसतशी विचारांची उंची वाढते.' स्वतःची ओळख करून देताना ते म्हणतात, 'गरीब, अनाथ, अपंग दलित। तोचि हा पतित, झाला अज्ञ। शुकदास म्हणे, हेचि माझे देव।' आश्रमाच्या परिसरात पंचधातूची श्रीकृष्ण मूर्ती, शिव, बालाजीची मंदिरे आहेत. तेथे कर्मकांड नाही. पुजारी आदिवासी समाजातील आहेत. विवेकानंद जयंती उत्सवाला लाखो श्रोते भजन, कीर्तन, व्याख्याने, प्रवचने, सुगमगायन आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमात रंगून जातात. सारे कसे सुरात. महाराजांच्या मते, सूर म्हणजे देव. जे सुरात नाही ते आसूर. आसुराला आश्रमात थारा नाही. 'जे एंगेज, तेज यंग एज' हा त्यांचाच विचार.

आश्रमाच्या भव्य प्रवेशद्वारातून आत गेल्यास, एकाच चबुतऱ्यावर विवेकानंद, महावीर, बुद्ध, ज्ञानेश्वरांचे पुतळे दिसतात. ज्ञान, भक्ती श्रम, सत्य अहिंसा अशी मूल्ये इथे सगुण रूपात गुण्यागोविंदाने नांदतात. त्याचेच हे प्रतीक. 'शांतीसाठी क्रांती करावया आलो' असे म्हणत, स्वतः शुकदास महाराज निसर्गातल्या झाडाझुडपात, अपंगांच्या सेवेत, कृषिज्ञान निर्मितीच्या परंपरेत परमेश्वर पाहतात. अनुभूती, बोधवचने हे त्यांचे ग्रंथ सुविचारांचे अमृतकुंभ आहेत. त्यांचे हात आध्यात्माशी, आरोग्याशी, मातीशी व संस्कृतीशी जोडले आहेत. त्या हातांना सेवेचा सुगंध असल्याने ते 'चंदनाचे हात' झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2741

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>