'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये अलीकडेच एका नव्या पुस्तकाला स्थान मिळाले आहे. हे पुस्तक म्हणजे कवितांचा संग्रह आहे आणि त्याची लांबी आहे केवळ एक सेंटिमीटर. नेमके सांगायचे झाल्यास एक सेंमी गुणिले एक सेंमी गुणिले ४ मिलिमीटर आणि वजन आहे ३०० मिलिग्रॅम. विविध भाषांमधील या पुस्तकात चक्क ६६ कविता आहेत आणि त्याही अल्बानियन, चिनी, जर्मन, स्वाहिली किंवा व्हिएतनामी यांसारख्या भाषांमधील. कुन्नमकुलम येथे राहणारे सतर अधूर या लेखकाने 'वन' असे शीर्षक असलेल्या या पुस्तकाची निर्मिती केली असून, लिम्का वर्ल्ड रेकॉर्ड, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्वतःचे नाव कोरले आहे.
अधुर यांनी केलेला हा प्रयोग दुर्मिळ समजला जात असला, तरी कलेच्या वेगवेगळ्या प्रांतात लघुकरणाचे असे प्रयोग केले जात असतातच. म्हणजे तांदळावर मावलेली गीता असो, वा नखावर कोरलेली कलाकृती असो, लघुत्तमीकरणाचे वेड साऱ्या जगात आहे. बोन्साय हे त्याचेच रूप. बहुसंख्य ब्रिटिशांना शोभेच्या लहान लहान वस्तू जमवून घरातील टेबलावर ठेवायला आवडते. मॅन बुकर पुरस्कारासाठी १९७९मध्ये पेनेलोपे फित्झिराल्ड यांच्या 'ऑफशोअर' या केवळ १३२ पानांच्या कादंबरीचे नामांकन झाले होते. जगातील सर्वांत लहान लघुकथा केवळ सहा शब्दांची आहे. 'फॉर सेल : बेबी शूज, नेव्हर वोर्न.' ही ती कथा. ती प्रख्यात लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांनी लिहिली आहे, असे म्हणतात. तरीही अधून-मधून या लघुत्तम कथेबद्दल चर्चा होत असते. या सहा शब्दांतून लेखक काय सांगतो, याचा वेध घेतला जात असतो.
दीर्घकथा अथवा कादंबऱ्यांचे लघुकरण हा आणखी एक प्रकार आहे. भारतीय भाषांमध्ये तो फारसा रुजलेला नसला, तरी इंग्रजीमध्ये तो वाचायला मिळतो. म्हणजे शेक्सपीअरची सर्व नाटके 'अब्रिज्ड' स्वरूपात वाचायला मिळतात. अशा अनेक लोकप्रिय पुस्तकांच्या लघु स्वरूपातील आवृत्त्या काढण्यात आल्या आहेत. विशेषतः कुमारवयीन विद्यार्थ्यांसाठी अशी पुस्तके उपयुक्त ठरतात.
मात्र, केवळ साहित्याच्या क्षेत्रातच नव्हे, तर अन्य शाखांमध्येही लघुकरण आढळते. तत्त्वज्ञान, पर्यावरण आणि अर्थकारणाचा मिलाफ असलेली 'स्मॉल इज ब्युटिफुल' अशी एक संकल्पना आहे. ई. एफ. शुमाकर यांनी त्यांच्या हेच शीर्षक असलेल्या पुस्तकात ती प्रथम वापरली. हे पुस्तक राजकीय स्वरूपाचे मानले जात असले, तरी अर्थकारण हा त्याचा गाभा आहे. विसाव्या शतकात स्वस्त वस्तूंचे उत्पादन होऊ लागले. 'मास मीडिया', ' मास कल्चर' अशा नव्या संकल्पना उदयाला आल्या. त्यातून मोठ्या बाजारपेठा, मोठे नेते उदयाला आले. मोठ्या संधी आल्या. शूमाकर यांनी या बदलाला 'अतिभव्यतावाद' असे संबोधले. या परिवर्तनाने एक वेगळे जग समोर आले असले, तरी त्यात हरवले होते, ते मानवी संबंध. या युगाने निराशा, ताण, चिंता यांनाही जन्म दिला. माणसाने जणू यंत्रासारखे वागावे, अशी आज्ञा या युगाने दिली होती. या सगळ्याचा ऊहापोह करून शूमाकर यांनी 'जनकेंद्रित अर्थव्यवस्थे'चा पुरस्कार केला. नातेसंबंध, कलात्मकता आणि पर्यावरण केंद्रस्थानी ठेवून उत्पादन हेच 'स्मॉल इज ब्युटिफुल'चे मॉडेल. शहराची लोकसंख्या किती असावी, अशा मुद्द्यांची चर्चाही त्यांनी केली आहे. नंतरच्या काळातही ही संकल्पना निमित्ताने चर्चिली गेली! भव्यतेचे जसे आकर्षण असते, तसेच लघुत्तमाचेही, हेच खरे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट