भाषा म्हणजे काय? इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांनी केलेली व्याख्या : 'भाषा म्हणजे विचारविकार प्रदर्शनाची साधने.' या भाषेचा हस्तकौशल्याशी कसा संबंध आहे, शब्द कसे निर्माण झाले, क्रिओल नावाची मिश्र भाषा कशी जन्मली याबद्दलची माहिती गोष्टींतून, उदाहरणांतून देत डॉ. जोशी वाचनाच्या भानगडीपाशी येतात. माणसं का वाचतात? डॉ. जोशी म्हणतात, 'माझ्या डोक्यात विचारांची ठिणगी पेटवण्यासाठी दुसऱ्या सूक्ष्म स्वयंभू विचारी मनाशी संपर्क साधावा लागतो, हे साधण्यासाठी पुस्तकवाचन हा माझ्याकरिता सोपा मार्ग आहे.' आपलया अनुभवांचा घेर वाढवण्यासाठी माणसं वाचतात. त्याच्या अनुभवाचं आकाश साहित्यवाचनाने भरीव होत असतं. याला मेंदूविज्ञानात काय आधार आहे, हे डॉ. जोशी सांगतात.
ग्रंथालयं म्हणजे काय असतात? डॉ. जोशींचा मित्र एशियाटिकच्या ग्रंथालयाचं वर्णन करताना म्हणतो, 'हे ग्रंथ म्हणजे भूगर्भातील भूस्तर आहेत. भूमीत खाली खोलवर खणत गेलं म्हणजे खडकांचे स्तर लागतात, हजारो लाखो वर्षांपूर्वीचे. तसेच ग्रंथालयातली पुस्तकं म्हणजे माणसानं निर्मिलेल्या ज्ञानाचे स्तर आहेत.' या लिखित शब्दांतलं संगीत कसं जाणायचं, ध्वनिमाधुर्य कसं चाखायचं या विषयी सांगताना त्यांनी जॉर्ज स्टेनर या लेखकानं जेम्स जॉइसची कथा मित्रांना कशी उलगडून दाखवली, याची एक सुरम्य कथा डॉ. जोशींनी सांगितली आहे.
अशा अनेक कथा आणि साहित्यातल्या दादा लोकांचे दाखले देत ललित आणि वैचारिक वाचन म्हणजे काय, त्यांचं महत्त्व काय आणि दोहोंतला फरक काय हे विशद करत डॉ. जोशी 'डिजिटल वाचना'च्या युगात आपल्याला घेऊन येतात. मेंदूच्या उत्क्रांतीत झालेले वाचनप्रक्रियेतले टप्पे सांगत अंतिमतः माणसं वाचायला शिकणे, हेच वाचनाचं अंतिम ध्येय कसं आहे, इथवर आपल्याला घेऊन येतात. एका निष्णात धन्वंतरीने आपल्या अफाट वाचनाचे दाखले देत आणि त्याविषयी पराकोटीची ऋजुता दाखवत घडवलेला हा सगळा प्रवास अत्यंत सुबोध, सोपा आणि आल्हादक आहे. या लेखाच्या प्रती काढून शासनाने मोफत वाटल्या असत्या तरी भाषा संवर्धनाचा पंधरवडा सार्थकी लागला असता.
- रसिक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट