केवळ संवाद साधता येणं, हेच कधीच कुठल्याही भाषेचं एकमेव उपयोजन नसतं. भाषा संवादाच्याही पलीकडे खूप काही असते. किंबहुना वर्षानुवर्षांच्या परिशीलनातून-परिवर्तनातून घडलेली-सजलेली भाषा एकप्रकारे त्या-त्या भाषिक समुहांच्या सांस्कृतिक संचिताचे वहन करत असते. त्यामुळेच जेव्हा एखादी भाषा मरण पावते, तेव्हा एकअर्थाने एखादी संस्कृतीच मरण पावत असते. मराठी भाषेच्या जगण्या-मरण्याविषयी सध्या जे बोललं जातं, त्यामागेही हाच परिप्रेक्ष्य आहे. त्यातूनच मराठी भाषा वाचवण्यासाठी, जगवण्यासाठी किंवा तिला सावरण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. आपल्या चाळिशीचं निमित्त साधून ग्रंथालीने अलीकडेच आपल्या रुची मासिकाचा जो 'भाषा आणि साहित्य' विशेषांक प्रकाशित केला आहे, तोही असाच प्रकार आहे.
पंजाबमधील घुमानला होत असलेल्या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर या विशेषांकाचं महत्त्व विशेष आहे. कारण या विशेषकांत अतिथी संपादक डॉ. वीणा सानेकर यांनी मराठी भाषेच्या विविध पैलूंचा सखोल वेध घेणारे विविध लेख त्या-त्या विषयातील जाणकारांकडून लिहून घेतले आहेत. महत्त्वाचं म्हणजे भाषेच्या निव्वळ प्रेमात पडून तिचे आंधळेपणाने गोडवे गाणारे हे लेख नाहीत, तर बदलत्या सामाजिक-सांस्कृतिक-आार्थिक परिस्थितीचं भान ठेवून या विशेषांकात, मराठी भाषेचं मूल्यमापन करण्यात आलं आहे. त्यासाठी विशेषांकाचे जाणीवपूर्वक 'जागतिकीकरण आणि सर्जनशील लेखक', 'भाषाभान आणि मराठी' आणि 'कलामाध्यमे आणि मराठी' असे तीन विभाग करण्यात आले आहेत. पैकी पहिल्या भागात जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषा, मराठी समाज, इथलं जात वास्तव, बोलीभाषा अशा विविध प्रश्नांसह वसंत आबाजी डहाके, मिलिंद बोकील, मनस्विनी लता रवींद्र, संजय पवार, ऐश्वर्य पाटेकर, अशोक कौतिक कोळी ही लेखक-कवीमंडळी लिहिती झाली आहेत.
'भाषाभान आणि मराठी' या विभागात मराठी भाषेसमोरील आव्हानांचा आणि तिच्या अस्तित्वाचा वेध तुषार पवार, शांताराम दातार, अरुण जाखडे, वंदना भागवत, डॉ. प्रकाश परब यांसारख्या अभ्यासकांनी घेतला आहे. यातला 'लोकभाषा आणि लोकशाही' हा दिवंगत विचारवंत भा. ल. भोळे यांचा लेख विशेष उल्लेखनीय आहे. लोकभाषेतून व्यवहार झाल्याशिवाय देशात लोकशाही निर्माण होऊच शकत नाही, हे त्यांच्या लेखाचं मूळ सूत्र आहे. तर 'कलामाध्यमे आणि मराठी' या विभागात राजू तुलालवार, कौशल इनामदार आणि संतोष पाठारे यांनी अनुक्रमे बालनाट्य, संगीत आणि सिनेमाच्या संदर्भात मराठी भाषेचा विचार केला आहे. याशिवाय प्रभाकर वाईरकर, प्रशांत कुलकर्णी, प्रदीप म्हापसेकर, प्रभाकर भाटलेकर, महेंद्र भावसार यांसारख्या व्यंगचित्रकारांनी आपल्या व्यंगचित्रांतून मराठीच्या सद्यस्थितीवर भाष्य केलं आहे. घुमानच्या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांची मराठी भाषेच्या सद्यस्थितीवरची मुलाखत, हीदेखील या विशेषांकाचं खास आकर्षण आहे.
मराठीविषयी आस्था असणाऱ्या प्रत्येकाने वाचावा, असा हा विशेषांक आहे. मुख्य म्हणजे मराठीचं रडगाणं गाण्याऐवजी प्रत्येकाने मराठीसाठी काही तरी करण्याची ही वेळ आहे. ते काय करायला हवं, याचं भान हा विशेषांक नक्की देतो.
-रसिक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट