आजचा 'आयटी'युक्त तरुण परदेशात जाण्याचे किंवा देशात राहिलाच तर बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करण्याचे स्वप्न बाळगतो. पण वेगळी वाट निवडणारा नागपूरचा अभजिित विनोद गान गावागावात जलशुद्धीकरणाच्या प्रकल्पांत गुंतला आहे...
एमबीएच्या निकालाच्या दिवशीच अभिजित विनोद गान या नागपूरच्या युवकाला नामांकित कंपनीचे 'ऑफर लेटर' आले. रुजू होण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी होता. हे दोन महिने त्याने वडिलांच्या व्यवसायाला देण्याचे ठरविले. त्याचे वडील विनोद गान यांचा कारखान्यांसाठी लागणारे रसायन तयार करण्याचा व्यवसाय होता. त्याने या कारखान्यांसाठी लागणारे पाणी शुद्ध करण्याचे रसायन तयार केले. याच कालावधीत; २००९ मध्ये तो महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संपर्कात आला आणि त्याच्या ध्येयाला 'पाणीदार' वळण मिळाले. 'कम्प्युटर सायन्स' केलेल्या अभिजितने पाणी शुद्ध करण्याचे मॉडेल विकसित केले. 'शुद्ध पाणी' हा प्रत्येकाचा हक्क हे ध्येय बाळगणाऱ्या नागपूरच्या अभिजित गान या युवा 'आंत्रप्रेन्युअर'चे आज देशातील विविध राज्यांमध्ये शुद्ध पाण्याचा पुरवठा करणारे शेकडो 'कम्युनिटी वॉटर सेंटर्स' कार्यरत आहेत. विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात पहिले 'वॉटर एटीएम' लावण्याचा मानही त्याचाच! अभिजीतचे बारावीपर्यंतचे शिक्षण नागपुरात झाले. दहावीत तो गुणवत्ता यादीत होता. सन २०००मध्ये बारावीत राज्यात तिसरा येण्याचा मान त्याने पटकावला. या प्रतिभेच्या बळावर त्याला बिट्स पिलानीमध्ये इंजिनीअरिंगसाठी सहज प्रवेश मिळाला. त्यावेळी आयटी क्षेत्रात बूम असल्याने अभिजितने 'कम्प्युटर सायन्स' ही शाखा निवडली. शिक्षणाचा भाग म्हणून त्याने बेंगळुरूच्या सॉफ्टवेअर कंपनीत सहा महिने काम केले. नोकरीत मन रमत नव्हतेच. २००६मध्ये त्याने एमबीए पूर्ण केले. नोकरीवर रुजू होण्यापूर्वीच्या ते दोन महिने तो घरच्या कारखान्यात रमला. येत्या काळात पाणी हीच गरज राहणार असल्याचे एव्हाना त्याने ओळखले होते. याच 'पाण्या'च्या संपर्कात राहण्याचे आणि याच क्षेत्रात संशोधन करण्याचा अभिजितने निर्णय घेतला. दोन वर्षे पाणी शुद्धीकरणावर संशोधन केले. या काळात; २००९ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संबंध आला आणि नागपूरपासून शंभर किलोमीटर अंतरावरील डोंगरगाव आयुष्याला विधायक वळण देणारे ठरले. या गावाला अशुद्ध पाण्याचा पुरवठा होऊ लागला. त्यामागचे कारण शोधण्याची जबाबदारी अभिजितने स्वीकारली. तेथील शाळेत गेला असता ७० टक्के विद्यार्थ्यांना दातांचा सोरायसिस असल्याचे धक्कादायक वास्तव दिसले. याच अशुद्ध पाण्यामुळे गावातील ३५ वर्षांची व्यक्ती ५० वर्षांहून मोठी वाटत होती. अनेक महिला-पुरुषांचे हात-पाय वाकडे होते. असे का, याचा शोध घेतला असता 'फ्लोराइड'सह अन्य रसायनांमुळे पाणी दूषित असल्याचे आढळले. हा दोष नष्ट करण्यासाठी अभिजितने अभ्यास सुरू केला. या अभ्यास-संशोधनातून 'इलेक्ट्रॉलिटी फ्लोराइड रिमूव्हल प्लॅन' हे शुद्ध पाणी देणारे यंत्र तयार केले. ते गावातील पाणवठ्यावर लावले. हा प्रयोग यशस्वी झाला. डोंगरगावच्या अनुभवाने अभिजितच्या स्वप्नांना बळ मिळाले. हे काम पुढे नेण्यासाठी त्याने 'राइट वॉटर सोल्युशन्स' ही कंपनी स्थापन केली. सामाजिक दृष्टिकोनातून शुद्ध पाणी हा उद्देश ठेवत वाटचाल सुरू केली. डोंगरगावातील यशस्वी प्रयोगानंतर अन्य गावांत दूषित पाण्यावर उपाय शोधण्यासाठी सरकारी यंत्रणेने अभिजितचे मॉडेल स्वीकारले. महाराष्ट्रातील विविध गावांमध्ये अभिजितने विकसित केलेले 'कम्युनिटी वॉटर सेंटर्स' बसविले. आज महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशातील दोनशेहून अधिक गावांत त्याचे मॉडेल कार्यरत आहे. पाण्याच्या अशुद्धतेचे कारण शोधायचे, त्यानुसार पाणवठ्यावरच शुद्ध पाण्याचे यंत्र बसवायचे आणि शुद्ध पाण्याची निर्मिती करायची असे हे मॉडेल मागील सहा वर्षांत गावागावांत उभे झाले. शाळेतून पिण्याच्या अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्याने विद्यार्थ्यांना नाना आजार होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही शुद्ध पाणी मिळावे यासाठी 'राइट वॉटर'ने पुढाकार घेतला. आज ग्रामीण भागातील ५०० शाळांमधील ५० हजारहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थ्यांना आज या संकल्पनेच्या माध्यमातून शुद्ध पाणी पुरविले जात आहे. राजस्थान, बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालने अभिजितचे मॉडेल स्वीकारले असून या राज्यांतील सुमारे पाचशे गावांत 'कम्युनिटी वॉटर सेंटर्स' उभे करण्याची योजना आखली जात आहे.'कम्प्युटर सायन्स'चा पदवीधर असलेल्या 'आंत्रप्रिन्यूअर' अभिजितचे क्षेत्र बदलले असले तरी त्याने या ज्ञानाचा उपयोग जलशुद्धीकरण मोहिमेसाठीच केला. त्याच्या संकल्पनेतून बुलडाणा जिल्ह्यातील कलमखेड या गावात देशातील पहिले 'वॉटर एटीएम' सुरू करण्यात आले. यासाठी गावातील प्रत्येक घराला एका रेडिओ फ्रिक्वेन्सी असलेले कार्ड देण्यात आले. हे कार्ड संबंधित कुटुंबाने रिचार्ज करायचे. त्यानंतर २० लिटर पाण्याचा कॅन अवघ्या २ ते ५ रुपयांत दिला जातो. एरवी बाजारात या कॅनची किंमत ८० ते ९० रुपये असते. त्यात शुद्ध पाण्यासाठी यंत्र उभारणीचा खर्च, आरएफ आयडी कार्डचा खर्च असे सर्व असताना कमीत कमी किमतीत गावकऱ्यांना चांगले व शुद्ध पाणी मिळत आहे. यातही २० लिटर पाण्याच्या बदल्यात त्यांच्याकडून वसूल होणारे पैसे हे ग्रामपंचायतीच्या खात्यात पाणीकर म्हणून जमा होतात. वेगळा कर गावकऱ्यांना भरायची गरज नाही.'वडिलांना लहानपणापासून व्यवसाय उभा करण्यासाठी झटताना पाहिले. वडिलांनी हिमतीने उभा केलेला व्यवसाय तसाच राहू नये. त्यात आपलेही योगदान असावे, असे सतत वाटत होते. यामुळेच नोकरी करण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी आलो. पण डोंगरगावला भेट दिली आणि नेमके आयुष्यात काय करायचे आहे, हे उमगले. या सर्व प्रवासात वडिलांचे मार्गदर्शन, त्यांचा मौलिक पाठिंबा आणि प्रोत्साहन खूप महत्त्वाचे आहेत', असे तो आवर्जून सांगतो. दहाहून अधिक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी अभिजितच्या या कार्याची दखल घेतली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट