उन्हात खेळणाऱ्यांना स्नायूंचा अतिवापर झाल्याने किंवा दुखापतीमुळे पेटके येण्याचा त्रास वारंवार उद्भवतो. शरीरातील द्रवाचे प्रमाण कमी असताना किंवा पोटॅशियम, कॅल्शियमचे प्रमाण कमी झालेले असताना खेळल्यास अथवा शारिरीक कष्ट केल्यास स्नायूंमध्ये पेटके येण्याची शक्यता कित्येक पटीने वाढते. टेनिस किंवा गोल्फ खेळताना, पोहताना किंवा कोणत्याही प्रकारचा व्यायाम करताना स्नायूंमध्ये पेटके येऊ शकतात.
फक्त खेळाडूंनाच नव्हे, तर गर्भवती, माता, वयोवृद्धांनाही हा त्रास होतो. उन्हाळ्यात हा त्रास कित्येक पटीने वाढतो. आकडेवारीनुसार पन्नाशी ओलांडलेल्या तीनपैकी एकास दिवसातून किमान एकदा आणि रात्रीच्या वेळी बरेचदा पायांमध्ये पेटके येण्याचा त्रास होतो.
कारणे..
उन्हाळ्यात हवा उष्ण असल्याने घाम येतो आणि आपल्या शरीरातील द्रवाचे प्रमाण झपाट्याने कमी होत जाते. शरीरातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम इलेक्ट्रोलाईट्सच्या स्वरूपात घामावाटे शरीरातून बाहेर जातात. त्यामुळे या घटकांची शरीरात कमतरता निर्माण होऊन स्नायूंमध्ये पेटके येण्याचे प्रमाण वाढते. शरीरातील द्रवाचा ऱ्हास झाल्याने डीहायड्रेशनची शक्यताही वाढलेली असते.स्नायूंमध्ये गोळे येणे किंवा स्नायूंना हिसके बसणे यालाही स्नायूंमध्ये पेटके येणे असे म्हणतात. या पेटक्यांची तीव्रता जास्त असेल तर वेदनेही तीव्रताही अधिक असते. आराम करत असताना आणि व्यायाम करत असतानाही पायांमध्ये पेटके येउ शकतात. व्यायामाच्या वेळी स्नायूंमध्ये पेटके आल्यास स्नायू ओढले गेल्याची भावना होऊन वेदना होतात.उष्णतेमुळे होणाऱ्या दुखापतींविषयी डॉक्टर मंडळी लोकांना वारंवार सावधान करत असतात. उष्णतेमुळे होणाऱ्या दुखापतींचे मूळ समजावून घेतले तर त्याचा प्रतिबंध करता येतो. त्यामुळे हे त्रास कमी होउ शकतात. कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम युक्त आहार आणि भरपूर पाणी पिणे याद्वारे त्यावर नियंत्रण आणता येते.
उपचार
स्नायूंमध्ये पेटके आल्यास तुम्ही करत असलेले काम त्वरीत थांबवा आणि पेटके आलेला भाग ताणण्याचा प्रयत्न करा व त्या भागाला मालिश करा.
उष्णतेमुळे स्नायूला आराम मिळत असला तरी, वेदना वाढल्यास त्या भागावर बर्फ लावणे हितावह ठरते.
स्नायूमध्ये सूज असल्यास वेदनेपासून आराम देणारी स्टिरॉईड-मुक्त, जळजळ न करणारी औषधे वापरा.
खेळताना पुरेशा प्रमाणात द्रव पदार्थांचे सेवन करा.
बहुतेक वेळा पाणी प्यायल्याने पेटक्यांना आराम पडतो. पण कधीकधी फक्त पाणी पिणे पुरेसे ठरत नाही. अशा वेळी, शरीरातील खनिजांची हानी भरुन काढणाऱ्या सॉल्ट टॅब्लेट्स किंवा स्पोर्ट्स ड्रिंक्स घेणे उपयुक्त ठरते.
सूचना - तुमच्या क्षमतेनुसार व्यायाम करा आणि त्यादृष्टीने व्यायामात बदल करत राहा.व्यायाम करताना भरपूर प्रमाणात द्रव पदार्थांचे सेवन करा आणि पोटॅशियमचे सेवन वाढवा. संत्र्याचा रस आणि केळी हा पोटॅशियमचा सर्वात मोठा स्त्रोत आहे.
लवचिकता वाढवण्याकरिता स्ट्रेचिंगचे व्यायाम करत राहा.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट