कोणे एके काळी मी ठाण्यातल्या पोळी भाजी केंद्रांना कणिक सप्लाय करायचा व्यवसाय करायचो. सॅम्पल देण्यासाठी किती तरी पोळी भाजी केंद्रांवर गेलोय. असाच एकदा पाचपाखाडीतल्या ऋतू फूड्स या पोळीभाजी केंद्रावर गेलो. माझ्याविषयी, कामाविषयी तिथल्या माणसाला सांगितलं (त्यांचे नाव अशोक- मस्त माणूस). 'आत्ता शेठ नाहीयेत दुकानात. थोड्या वेळाने येतील. सॅम्पल देतो मी शेठजवळ. नाहीतर तुम्ही थांबा १५ मिनिटं.'- इति अशोक. गडबड नव्हती, त्यामुळे मी पण थांबूया म्हटलं.
'पाणी देऊ का शेठ?'- अशोक. हो म्हणालो. खरं तर पाणी नको होतं, पण कधी कधी आपण 'हो' म्हणतो आणि पितोही. तसंच मीही केलं. त्यातून अशोक मला शेठ म्हणाला होता. त्यामुळे मी जरा हवेत होतो. पाणी पिता पिता सहज लक्ष गेलं काऊंटरवर असलेल्या 'डोंगरयात्रा' पुस्तकाकडे. अशोक म्हणाला, 'शेठचं आहे पुस्तक.' माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून तोच म्हणाला, 'शेठ जातात ट्रेकिंग की काही करायला..' पुस्तक चाळत बसलो होतो इतक्यात एक स्कूटर आली. निळी हाफ पॅण्ट, ग्रीनिश टी- शर्ट, कमरेला पाऊच आणि एक भलीमोठी कापडी पिशवी हातात असलेला मुलगा उतरला आणि 'अशोक या ३०० पोळ्या ठेव रे' असं म्हणाला.
शेठ तुम्हाला भेटायला विघ्नेश जोशी आलेत. ते टीव्हीत काम करतात ते. ५ मिनिटांच्या औपचारिकतेनंतर आम्ही 'अरे तुरे' वर आलो, त्याला कारण सुमंतचा साधेपणा. 'दादा तू घरी येथील का संध्याकाळी? म्हणजे घरच्यांशी पण बोलणं होईल,' तो म्हणाला.
संध्याकाळी मी, कल्याणी, यश आणि समस्त परचुरे कुटुंबीय त्यांचीच अप्रतीम गुळपोळी खात गप्पांचा फड रंगवून बसलो होतो. सुमंतचे वडील- जयंत परचुरे गेली ३५ वर्षे हा व्यवसाय करताय. ठाण्यातील एकमेव मोबाइल कॅण्टीन चालवणारे हेच ते जयंत परचुरे. पण काही नतद्रष्ट माणसांमुळे त्यांना ते बंद करावं लागलं. सुमंतची आई शिवसमर्थ विद्यालयात शिक्षिका आहे. संध्याकाळी पोळ्या किंवा लाडू पॅकिंग करण्याचं काम करते. सुमंतच्या बहिणी तेजश्री आणि शिवाली याही जबाबदारीची कामं अगदी सहज करतात. पुरणपोळी, गुळपोळी, भाकरी... सर्व मशीनवर होतं. बेसन लाडू, पौष्टिक लाडूदेखील मशीनवरच केले जातात. लाडवाचं वजन सारखंच. फरक असायचाच तर २- ४ ग्रॅमचा. नौपाड्यात विष्णूनगरात त्यांचं हे विश्व आहे. आमच्या गप्पा रंगल्या होत्या. तेवढ्यात परचुरे बाबा म्हणाले, 'विघ्नेश, एक प्रयोग करुन बघितलाय. टेस्ट करणार?' मला उगीचच मी उंदीर असल्यासारखं वाटलं. वेगवेगळ्या औषधांचे प्रयोग उंदरावरच किंवा तत्सम प्राण्यांवरच केले जातात ना. नको, नाही, नंतर असं काही म्हणण्याची संधीच मला मिळाली नाही. त्यांनी बाजूच्या प्लेटमध्ये ठेवलेली स्ट्रॉबेरी डीलाइट मला खायला दिली. अर्थात हे नाव त्यांनी मला नंतर सांगितलं. गुळपोळी सारखा दिसतोय हा पदार्थ. पण गुळपोळी नाहीये हे कळत होतं. त्यामुळे घाबरत घाबरतच तुकडा मोडला होता मी. चवीसाठी म्हणून तुकडा तोंडात घातला आणि दोन- पाच सेकंदांत 'वा.. मस्त' माझ्या तोंडून निघालं आणि त्यांनी बाजूला ठेवलेली प्लेट मी माझ्या हातात घेतली. खरं तर कल्याणीने डोळे जरा मोठे केले होते. पण मी कानाडोळा केला. 'हा पदार्थ तुपाबरोबर मस्त लागेल ना,' माझ्या या वाक्यात दडलेला अर्थ त्यांनी बरोबर ओळखला. आणि पुढच्या मिनिटाला मी तुपाबरोबर माझ्या भाषेत स्ट्रॉबेरी पोळी संपवली होती.
माझं काम संपलं होतं आणि कल्याणी, सुमंत, शिवाली आणि परचुरे बाबांचं सुरू झालं होतं. ग्रॅम, पॅकिंग, किती दिवस टिकेल? एका दिवसात किती होऊ शकतात, क्रेडीट पीरियड किती ठेवायचा? इत्यादी माझ्या आकलनापलिकडच्या विषयावर चर्चा सुरू झाली. त्याचवेळी मी आणि यशने काढता पाय घेतला आणि सुमंतच्या आईबरोबर स्वयंपाक घरात जाऊन अशाच प्रकारच्या पायनॅपल, ऑरेंज डीलाइटची प्लेट हाती घेतली. पण अजूनही तुकडा मोडला नव्हता मी. यशच्या ही गोष्ट लक्षात आली. तो एवढंच म्हणाला 'बाबा, पोळी नुसती पण छान लागतेय रे...' सुमंतची आई मिष्कीलपणे हसत हसत उठली आणि म्हणाली, 'आलेच. तुपाचं भांडं हॉलमध्येच राहिलंय...'
प्रतिबिंब
विघ्नेशचा लेख वाचला. त्याचे यापूर्वीचे लेखही वाचले. खूप छान होते. गेल्या वेळचा लेख आवडला, त्याहून अधिक पटला म्हणायला हरकत नाही. त्याने म्हटल्याप्रमाणे नवीन वर्ष म्हटलं की आपण ३१ डिसेंबरचा विचार करतो. थोडक्यात आपण आपली संस्कृती विसरून अन्य देशांतील संस्कृती मानायला लागलो आहोत. विघ्नेशने उल्लेख केलेल्या कार्यक्रमाला जाण्याची संधी योगायोगाने मला मिळाली. मराठी माणूस असल्याचा अभिमान वाटावा असा सुंदर कार्यक्रम आयोजित केला होता. असे कार्यक्रम वेळोवेळी ठेवले तर आपल्या संस्कृतीची जाणीव राहील.- स्मृती देव
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट