Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2741

शमशेर बहाद्दर... भारत!

$
0
0



जगभरातील शस्त्रांमध्ये तलवार सग‍ळ्यात जुनी. तलवारीचे अनेक प्रकार दिसतात. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे ठरले, ते त्यासाठी वापरलेले धातू. भारतीय तलवारींमध्ये वापरल्या गेलेल्या पोलादाची क्षमता आणि त्यावेळी वापरलेल्या तंत्रामुळे इंग्लड, इटलीतले संशोधक चकित झाले...


शस्त्र ही एकमेव अशी गोष्ट होती, ज्यात भूतकाळात सतत नवनवीन तंत्रज्ञान वापरलं जायचं. तलावारीचे प्रकार पाहिले की त्याची खूण पटते. तिच्या पात्याच्या, मुठीच्या आकारावरून असंख्य प्रकार अस्तित्वात आले. जगभर आढळणाऱ्या तलवारींमध्ये प्रामुख्याने इंग्लिश, युरोपीय, पर्शियन, भारतीय, जपानी हे मुख्य प्रकार तर एकूण ६५ उपप्रकार असल्याचे उल्लेख आढळतात. तलवारींना ऊर्दूत समशेर म्हटलं जातं. भारतीय तलवारीचे कर्नाटकी धोप, पट्टा, गुर्ज, मराठा, राजस्थानी, तेग, समशेर (मुघल), नायर हे मुख्य उपप्रकार आहेत. मात्र, यापैकी एका समशेरीने संशोधकाने कामाला लावलं आहे. लंडनमधील वॉलेस कलेक्शनच्या ताब्यात असलेल्या ७५ सेंटिमीटर लांबीच्या तलवारीचा अभ्यास करण्यासाठी इटली आणि ब्रिटनमधील संशोधक संयुक्तपणे कामाला लागले आहेत. याचं कारण म्हणजे या समशेरसाठी वापरलेलं पोलाद आजच्या अद्ययावत तंत्रापेक्षाही कितीतरी पुढारलेल्या तंत्रज्ञानातून तयार केल्याचे त्यांना आढळून आलं आहे.

वॉलेस संग्रहालयामध्ये असलेली ही समशेर लंडनमध्ये पोहोचली ती भारतातूनच. भारतात ती अठराव्या किंवा एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी ही तलवार बनवण्यात आली असावी. या समशेरीचं पातं तयार करण्यासाठी जे तंत्रज्ञान वापरलं आहे, त्यात फक्त एक टक्काच कार्बन आहे. नेमक्या यामुळेच संशोधकांना भारतातील धातुशास्त्रातील ज्ञान किती पुढारलेलं होतं, याचा अंदाज आला आहे. त्यामुळे, इटलीच्या फ्लॉरेन्स विद्यापीठ आणि 'इन्स्टिट्युट फॉर कॉम्प्लेक्स सिस्टम्स' यांनी संयुक्तपणे या समशेरीचा शास्त्रशुद्ध अभ्यास करायचं ठरवलं आहे. पोलाद निर्मितीमध्ये भारतीयांनी मोठी झेप घेतलेली होती, हे सिद्ध करण्यासाठी या एका समशेरीचं उदाहरण धारदार आहे! इतकं शुद्ध पोलाद भारतीय बनवू शकत असतील तर त्यांनी या पोलादाचा इतर कुठे कुठे वापर केला, याचंही कुतूहल वैज्ञानिकांना आता वाटतं आहे.

प्राचीन भारतीय धातूशास्त्र अतिशय प्रगत होते. खरंतर वक्रकार असलेली समशेर ही पर्शियाची देणगी. मात्र पात्यासाठी भारतीय पोलादाचा वापर हे त्याचं वैशिष्ट्यं होतं. तलवारीच्या पात्यासाठी वापरल्या जाणार्‍या पोलादात परदेशात सालेमन, टोलॅडो, दमास्कस हे पोलादाचे प्रकार होते. पण एकट्या भारतातील पोलादात चंद्रवट, हत्तीपगी, फार्शी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उच्चतम दर्जाच्या पोलादाचा वापर होत असे. धातूशास्त्रातील प्रगतीबरोबरच कार्बन, क्रोमियम, झिंक, निकेल, अल्युमिनीयम, तांबे, चांदी आदींच्या मिश्रणातून जो धातू तयार होत असे, त्यातून तलवारीची पाती तयार केली जात असत. आजही जगभरात दमास्कस ब्लेड हे सर्वात प्रसिद्ध आहे. दमादस्कमध्ये तलावारीची पाती बनवली जात असे. मात्र त्यासाठी लागणारे पोलाद किंवा लोखंड हे भारतीय असायचं.

समशेर प्रामुख्याने निःशस्त्रावर वार करण्यासाठी वापरली जात असे. तर त्याचं टोक हे शस्त्रधारी शत्रूला भोसकण्यासाठी उपयोगात आणत. समशेर वक्राकार असल्याने शत्रूवर अचूक मारा करणं, हे कठीण काम ठरत असे. सोळाव्या शतकापासून तिचा वापर होऊ लागला. खरं तर अशा अनेक तलावारी ठिकठिकाणच्या वस्तूसंग्रहालयाची शान बनल्या आहेत. पण वॉलेसच्या संग्रहालयातील समशेरीसाठी वापरलेलं पोलाद हे हलकं, टिकाऊ आहेच. पण बहुधा त्याचं पातं हे कोणत्याही द्रव पदार्थात न बुडवता हवेतल्या हवेत थंड केलं असावं, असं त्याच्यावर अभ्यास करत असलेल्या संशोधकांचं मत आहे. पोलाद निर्मितीचं हे तंत्रज्ञान दक्षिण भारतातलंच असून त्यानंतरच ते अन्य देशांमध्ये पोहोचलं असावं, असाही दावा या संशोधकांनी केला आहे.

प्राचीन वस्तू या दूर्मीळ आहेत, त्याहीपेक्षा आश्चर्याची गोष्ट अशी की त्या अजुनही उत्तम अवस्थेत आहेत. कारण त्यासाठी वापरलेलं तंत्रज्ञानच असं आहे की, आपण ज्याचा विचारही करू शकत नाही. त्यामुळेच त्याचा पूर्वइतिहास शोधून काढण्यासाठी त्या वस्तूच्या संशोधनावरच लक्ष देण्याची गरज या समशेरच्या संशोधनसाठी नेमलेल्या पथकाच्या प्रमुख इलिझा बारझागिल यांनी स्पष्ट केलं आहे. आता या संशोधनातून आणखी काय हाती लागणार हे येत्या काही दिवसांत समजेलच.


Viewing all articles
Browse latest Browse all 2741

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>