देशात आणि राज्यात भाजपचं राज्य आल्यावर एकूणच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्रातःस्मरणीय असलेल्या नेत्यांना-व्यक्तींना बरे दिवस येणं साहजिकच होतं. त्यानुसार आधी केवळ विरोधाला विरोध, तसं व्यक्तीला व्यक्ती या न्यायाने भाजपवाल्यांनी नेहरूंच्या विरोधात सरदार पटलेंना (वास्तवात सरदार पटेल संघाच्या विरोधातच होते) आणलं. कारण त्यांना नेहरूंना शह देण्यासाठी कुणी तरी हवंच होतं. यासोबतच संघ आणि भाजपेयींच्या कायमच टीकेचं लक्ष्य असलेल्या महात्मा गांधींना (नाइलाज म्हणून उठसूट गांधींच्या पुतळ्याच्या पाया पडावं लागत असलं तरी) शह देण्यासाठी नथुराम गोडसेचं गुणगौरवीकरण सुरू झालं आहेच, जे पूर्वीही होतं. मात्र आता नथुरामचे प्रत्यक्ष पुतळे उभारायलाही सुरुवात झाली आहे. पण हे सगळं झालं पक्षीय आणि संघटनेच्या पातळीवरचं राजकारण. मात्र आता तोच कित्ता भाजप-संघाच्या छोट्या-मोट्या पिट्ट्यांनीही गिरवायला सुरुवात केली आहे आणि त्यासाठी थेट टीव्ही मालिकेतूनच पात्रांच्या माध्यमातून चुकीचा इतिहास सांगितला जात आहे.
झी-मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या 'असे हे कन्यादान' या मालिकेत नुकताच असा प्रकार घडला. या मालिकेतील नायिकेच्या वडिलांची भूमिका करणारे अभिनेते शरद पोंक्षे हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे आहेत, ते सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यांच्या तशा असण्याला कुणाचाच विरोध असण्याचं कारणही नाही. कारण त्यांचे विचार ही त्यांची वैयक्तिक बाब आहे. पण म्हणून त्यांना ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचं विधान करण्याचा कुणीही अधिकार दिलेला नाही. सोमवार, दिनांक ९ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या या मालिकेच्या भागात, मुलगी घरी न आल्यामुळे वडील चिंताक्रांत असल्याचा प्रसंग होता. त्या प्रसंगात शरद पोंक्षे चिंतेने म्हणतात- 'सावरकरांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं देशाला. काय काय स्वप्नं बघितली होती. हे अभिप्रेत नव्हतं त्यांना की स्वातंत्र्य मिळाल्यावर ६० वर्षांनीही या देशातल्या प्रत्येक मुलीचा बाप आपल्या मुलीची जीव मुठीत धरून वाट बघेल.' स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आदर ठेवूनही या संपूर्ण संवादातील पहिलं वाक्य पूर्णपणे आक्षेपार्ह आणि अनैतिहासिक आहे, असंच म्हणावं लागेल. कारण भारताच्या स्वातंत्र्ययुद्धात अनेकांनी भाग घेतला असला आणि त्यात स्वातंत्र्यवीरांचाही सहभाग असला, तरी सावरकरांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं, हा इतिहास नाही. तसंच सावरकरांनी मुलींसाठीही काही केल्याचा इतिहास सांगत नाही. केलंच असेल, तर ते फुले-आगरकरांनी केलं. विश्राम बेडेकर लिखित 'टिळक आणि आगरकर' नाटकात एक प्रसंग आहे. आगरकरांच्या मृत्यूनंतर टिळक तिथे जातात. तेव्हा शेजारच्याच घरात एका मुलीचा जन्म होतो नि ती रडायला लागते. तेव्हा टिळक म्हणतात - 'महाराष्ट्रात यापुढे जन्माला येणाऱ्या मुलींना इतकं रडण्याचं कारण नाही. कारण इथे गोपाळराव आगरकर होऊन गेलेत.' तेव्हा मुलीच्या बापाच्या भूमिकेतील पोंक्षे यांनी उच्चारलेलं वरील वाक्य दोन्ही दृष्टीने विपर्यस्तच ठरतं. आता ते वाक्य त्यांनी स्वतःच्या पदरचं घातलं की संवादलेखकांनीच लिहिलं होतं, हे एकदा तपासून पाहायला हवं आणि त्यांना इतिहासाचे धडेही द्यायला हवेत!
- रसिक
↧
अभिनेता की नेता?
↧