जुने ते सोने असे म्हटले जाते. मात्र, त्याचवेळी 'जुने जाऊ द्या मरणा लागुनी' अशा ओळीही केशवसुतांनी लिहून ठेवल्या आहेत. लेखनाचीच गोष्ट घ्यायची तर पूर्वी मराठी मोडी लिपीत लिहिली जात असे. ती पद्धत कालांतराने बंद झाली. आता आपण साध्या देवनागरी लिपीत लिहितो. हाच प्रकार इंग्रजीतील कर्सिव्ह लिखाणाबाबत घडला आहे.
लांबच लांब पल्लेदार, गोलाई असलेले हे लेखन. जुन्या काळातील इंग्रजी लेखन दाखवण्यासाठी कर्सिव्ह टायपातील या लेखनाचा आधार घेतला जातो. आता मात्र हे कर्सिव्ह लिखाण इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. फिनलंडने नुकतेच शालेय अभ्यासक्रमातून कर्सिव्ह लिखाण हद्दपार करून त्या ऐवजी की बोर्ड टायपिंग शिकविण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षापासून म्हणजे २०१६पासून हा बदल अंमलात येणार आहे. कर्सिव्ह लिखाणाची परंपरा अनेक वर्षांपासून आहे. अचानक त्यात बदल केल्याने वाद होणे स्वाभाविकच आहे, परंतु हा बदल कालसुसंगत असल्याचे फिनिश शिक्षण मंडळाने म्हटले आहे.
पूर्वी जेव्हा लेखनासाठी प्रामुख्याने फाउंटन पेन आणि शाई वापरले जात, त्यावेळी कर्सिव्ह लेखन संयुक्तिक होते. आता मात्र, सगळीकडे टायपिंगसाठी की बोर्डचा वापर केला जातो. अशा वेळी कर्सिव्ह लिखाणाचा आग्रह धरण्यात काय हशील, असे फिनिश शिक्षण मंडळाचे म्हणणे आहे. शिक्षणतज्ज्ञांचा त्याला पाठिंबा आहे. ऑस्ट्रेलियातही कर्सिव्ह लिखाण रद्द करण्याची मागणी जोर धरत आहे.
या कर्सिव्हची कूळकथाही मोठी रंजक आहे. इंग्रजीत कर्सिव्ह लेखनाची पद्धत अरबीवरून आली आहे. अरबीत अक्षरे एकाला एक जोडून लिहिण्याची पद्धत आहे. ती लकब लॅटिन लिपीने आत्मसात केली. त्यानंतर इंग्रजी लेखनातही ती रूढ झाली. मध्ययुगीन लॅटिनमध्ये कर्सिव्हस असा शब्द आहे. त्याचा अर्थ धावती असा आहे. त्यावरून इटालियन भाषेत अठराव्या शतकात कर्सिव्हो हा शब्द आला आणि त्याचे इंग्रजीत कर्सिव्ह झाले. म्हणजेच सामान्य लोकांसाठी रनिंग लिपी.
ब्रिटनमध्ये सोळाव्या शतकात नॉर्मन वंशाची राजवट सुरू झाल्यानंतर कर्सिव्ह लेखनाला प्रारंभ झाला. कार्यालयीन आणि वैयक्तिक पत्रव्यवहारासाठी ही लिपी वापरली जात असे. ब्रिटनमध्ये सतराव्या शतकात एडवर्ड कॉकर याने ही लिपी लोकप्रिय केली. त्यानंतर ब्रिटिश वसाहतींमध्येही तिचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा थॉमस जेफरसनने याच लिपीत लिहिला होता.
ब्रिटन आणि अमेरिकेत या लिपीचा वापर सर्वाधिक होत असे. दिसायला सुंदर असल्यामुळे या लिपीला 'स्मार्ट हँड रायटिंग' असेही म्हटले जायचे. पोस्ट यंत्रणेच्या सुरुवातीच्या काळात पत्ते कर्सिव्ह लिपीतच लिहिण्याची पद्धत होती. १९३० मध्ये पॉल स्टँडर्ड याने कर्सिव्ह लेखन इटालिक शैलीत लिहिण्याचा आग्रह धरला. त्यासाठी त्याने प्रदीर्घ काळ मोहीम राबवली. अखेर १९६० नंतर कर्सिव्ह लेखन इटालिक शैलीत (तिरप्या आकारात) लिहिण्याची प्रथा सुरू झाली.
अर्थात, हा झाला इतिहास आता असे प्रामुख्याने अमेरिकेत झालेल्या पाहण्यांमध्ये असे दिसून आले की शालेय मुलांना ही लिपी नीट लिहिता येत नाही. त्याचे कारण शिक्षकांना या लिपीचे औपचारिक शिक्षण मिळालेले नाही. त्यामुळे अमेरिकेत ४३ राज्यांनी कर्सिव्ह लेखनपद्धतीला डच्चू दिला आहे. तेथे आता हे लेखन ऐच्छिक करण्यात आले आहे. फिनलंडनेही त्याच पावलावर पाऊल ठेवले आहे. भारतातही या लिपीचा आग्रह आता फारसा धरला जात नाही.
लेखनासाठी प्रामुख्याने की बोर्डचा वापर केला जात असला तरीही हस्तलेखनच नामशेष व्हावे, असे मात्र होता कामा नये, असे जाणकारांचे मत आहे. हाताने लिहिण्याचे अनेक फायदे आहेत. हाताने लिहिल्यामुळे संवेदना मेंदूपर्यंत पोहोचून त्यातील काही भागांना उद्दिपित करतात. नवी चिन्हे आणि भाषा शिकण्यास मदत होते. लिहिल्याने स्मरणशक्तीही वाढते. लिपीत किंवा लेखनपद्धतीत बदल जरूर व्हावेत; पण लेखन मात्र कायम राहावे.
लांबच लांब पल्लेदार, गोलाई असलेले लेखन अलीकडे फारसे वापरात नाही. जुन्या काळातील इंग्रजी लेखन दाखवण्यासाठी कर्सिव्ह टायपातील या लेखनाचा आधार घेतला जातो. आता मात्र हे कर्सिव्ह लिखाण इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. लिपीत किंवा लेखनपद्धतीत बदल जरूर व्हावेत; पण लेखन मात्र कायम राहावे.