परवा हा असा विचार सारखा मनात घोळत होता. ते एक भाषण ऐकले आणि मनातल्या विचारांना मनातच वाचा फुटली. ती लकब, ते योग्य त्या ठिकाणी थांबण्याचे, थांबून इकडेतिकडे बघण्याचे कसब, त्यातून मिळणारी दाद, हे सारे अजूनही आमच्या चित्तात आहे. आम्ही मनातल्या मनात ते सारे त्या दिवशीपासून घोळवत आहोत. त्या वाक्प्रवाहासमोर काही बोलण्याची आमची प्राज्ञाच नव्हती. जे काही घडत गेले, ते पूर्वापार आहे. आम्ही आता हे सारे दुरुस्त करू पाहतो आहोत, हे समेचे वाक्य होते. प्रत्येक वेळी हेच वाक्य नसले, तरी अर्थाच्या दृष्टीने सम गाठली जात होती. त्या त्या गोष्टींचे दाखले देणे, आकडेवारी मांडणे आणि 'तुम्ही हे असे केले होते' असे छातीठोक सांगणे... आम्ही फक्त ऐकत राहिलो. अर्थात, ऐकण्याशिवाय हाती दुसरे काही नव्हतेही आणि बोलणे तर खुंटलेच होते.
तो शब्दांचा धबधबा, ते वाक्ताडन, ती करारी नजर... मनातल्या मनातही थरकाप उडतो आमचा. पूर्वी फारच चुका झाल्या. आज आपण जिथे कुठे आहोत, ते केवळ नशिबाने; अन्यथा आपली काही धडगत नव्हती, हे आम्ही मनोमन मान्यच करून टाकले. पूर्वीच्या चुका बाहेर पडल्या, की नक्की काय करावे, याचा आम्हाला काहीच अनुभव नसल्याने, कानी पडेल ते खालमानेने ऐकत राहणे, याखेरीज दुसरे काहीच हाती नव्हते.
बरे, या साऱ्यात आमची चूक काय होती? चहा झाल्यानंतर कप आठवणीने सिंकमध्ये ठेवला नाही एवढेच! सौं.ना तो कप संध्याकाळच्या वेळेला सोफ्याच्या खाली लवंडलेला दिसला आणि त्यांनी आमच्यावर हल्ला चढविला. लग्नापूर्वीपासून (मातु:श्रींकडून ऐकलेले) सुरुवात झाली, ती आजपर्यंत येऊन पोहोचली. तेव्हा असे केलेत, तेव्हा तसे केलेत, हे असेच करीत असता तुम्ही, तेव्हा जर असे केले असते, तर आज आपण कुठे असतो, माझे नशीब चांगले, म्हणून आजचा दिवस तरी दिसतो आहे. तुम्ही केलेल्या चुका पाहता, रसातळालाच जायचे. मुलांना शिस्त लावा, अभ्यासाला बसवा, त्यांच्या भविष्याचा विचार करा, तुम्हाला तिन्हीत्रिकाळ खायला घाला, हाती पडणाऱ्या चार दिडक्यांवर संसार ओढा...
असो, एकूण काय भोग असतात हे. ज्या ज्या कोणाला दुसऱ्याने इतिहासात केलेल्या चुका आठवतात आणि दाखल्यासह ठामपणे मांडता येतात, त्यांच्यासमोर बोलणे अवघड असते, हेच खरे.
- चकोर
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट