बजेट सुरू होते. अगदी तुमच्या-आमच्यात खरे सांगायचे, तर तिथे ते काय सांगतात आणि नंतर त्याचे विश्लेषण करणारे काय बोलतात, हे आजपावेतो आम्हाला समजलेले नाही. यंदाही आम्हाला काहीही समजले नाही. 'रुपया कसा आला आणि कसा गेला' याचे छान चित्रबित्र काढून येईल वर्तमानपत्रांत. त्यातूनही आम्हाला फारसा काही बोध होत नाही. आमच्या दृष्टीने इन्कम टॅक्सची स्लॅब हा जागतिक महत्त्वाचा प्रश्न होता. इतर विविध महत्त्वाच्या प्रश्नांप्रमाणे यालाही बगल दिल्याने, पुढे आमचा सगळा रसच निघून गेला. आम्हाला आमच्या खिशात आलेला रुपया किती मार्गांनी कसा बाहेर पडतो, हे अद्याप समजलेले नाही, मग देशाचे समजणे दूरच राहिले. आमच्याकडे रुपया महिन्याच्या एक तारखेला येतो. तेथून तो थेट अर्धांगाच्या खात्यात जातो आणि आम्ही 'मिनिमम बॅलन्स' या तत्त्वाला घट्ट धरून राहतो. तेथून तो कसा कुठे जातो, ऐनवेळच्या खर्चाला कसा बाहेर येतो, आजारपणे-लग्नकार्य-मोठी खरेदी-मुलांच्या फिया हे सारे खर्च बिनबोभाट कसे उरकतात, याचाही आम्हाला अद्याप शोध लागलेला नाही. आपले कायमच तुटीचे असलेले उत्पन्न, सौ. कसे सांभाळतात, हाही बहुतेक समस्तांना पडलेला प्रश्न आहे.
आज मुले मात्र फार रस घेऊन टीव्ही पाहत होती. डिजिटल की क्रिप्टो असे काय म्हणतात, त्या करन्सीवर ३० टक्के कर लागणार आहे, त्यातून पुढे काय होईल, असे काही तरी न समजणाऱ्या भाषेत बोलत होती. 'म्हणजे आपण ऑनलाइन बँकिंग करतो, त्यावरही कर लावणार की काय आता,' असा प्रश्न आम्ही केला आणि मुले आमच्याकडे न पाहता अचानक बाहेर निघून गेली. आपले काही चुकले काय, या बुचकळ्यात आम्ही पडलेले असताना, सौं.नी चहाचा कप समोर ठेवला आणि 'नका काळजी करू, आपल्याकडे आहेत पैसे,' असा आम्हाला दिलासा दिला. आपल्याला कणखर गृहमंत्री आणि अर्थमंत्री लाभलेले आहेत, या समाधानात आम्ही चहाचा भुरका मारला आणि चॅनेल बदलला...
- चकोर
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट