सुहास सोनावणे हे या मुंबई महानगरीवर अपरंपार प्रेम करणारे गाढे अभ्यासक होते. पण त्यापलीकडे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना ही सोनावणे यांची आणखी तीन श्रद्धास्थाने होती. या श्रद्धास्थानांबद्दल थोडे जरी इकडे तिकडे झालेले त्यांना खपत नसे. पुढे आमची मैत्री घट्ट होत गेली तसे मला हे प्रकर्षाने जाणवू लागले. या तीन श्रद्धास्थानांशिवाय जुनी मुंबई हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. या विषयावर त्यांचा गाढा अभ्यास होता.
तीन श्रद्धास्थान आणि मुंबई या संदर्भात मराठी व इंग्रजीत जी पण पुस्तके प्रकाशित होत असत ती ते त्वरेने विकत घेत असत. मुंबईवरील जुन्या दुर्मिळ पुस्तकांसाठी ते मुंबईतील फोर्टपासून माटुंग्याच्या फूटपाथवरच्या पुस्तकांची दुकाने पालथी घालत असत. त्यांचा ग्रंथसंग्रह अफाट होता. आपल्याकडील पुस्तकांचा पीएचडी. करणाऱ्या विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना ते वापर करू देत असत. पुस्तकातील महत्त्वाचे फोटो व लेखांची झेरॉक्स वर्तमानपत्रांना स्वखर्चाने पुरवत असत. अरुण टिकेकर यांच्यासारखे अभ्यासकही मुंबईविषयी एखादी विशेष माहिती हवी असल्यास हक्काने सोनावणे यांना विचारत असत एवढा त्यांचा अधिकार होता.
सोनावणे मूळचे भुसावळचे! शिक्षण पूर्ण झाल्यावर महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम विभागात रुजू झाले. भुसावळ, धुळे, ठाणे अशी बदलीची ठिकाणे करत मुंबई कार्यालयामध्ये स्थिरावले. मुंबईचे त्यांचे कार्यालय मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीच्या बाजूलाच होते. आजूबाजूला जवळजवळ सर्वच इमारती हेरिटेज प्रवर्गात मोडणाऱ्या होत्या. चौकस वृत्ती, अफाट वाचन आणि लिहिण्याची आवड! सोनावणेंमध्ये मुंबईविषयी कुतूहल जागे झाले आणि वाचनाच्या जोडीला अभ्यासू वृत्ती आली. पहिला 'घारापुरी फेस्टिवल' एमटीडीसीने जेव्हा आयोजित केला होता, त्यावेळी मुंबईतील महत्त्वाच्या हेरिटेज इमारतींवर विद्युत रोषणाई केली होती. त्यावरील सोनावणेंचा लेख 'हे रूप कसे मुंबापुरीचे' 'महाराष्ट्र टाइम्स'च्या मनोरंजन पुरवणीमध्ये छापून आला होता. त्याची चर्चा सजग वाचकांमध्ये झाली. त्यातील एक वाचक होते तत्कालीन विधानसभेचे अध्यक्ष मधुकरराव चौधरी. तो लेख वाचून चौधरी यांनी सोनावणे यांना आपला स्वीय सहाय्यक म्हणून नेमले.
'किल्ला' दिवाळी अंकामध्ये मुंबईतील किल्ल्यांवर लेख लिहायाचे त्यांनी मला कबूल केले व एका सकाळी मी, ते व फोटोग्राफर असे तिघेजण सायनपासून सुरुवात करते झालो. सायनला तीन किल्ले आहेत, हे त्यांच्यामुळे मला माहीत झाले. त्यातील एकतर संपूर्ण झोपडपट्टीने वेढलेला आहे. तेथून पुढे शिवडी, माझगाव, बोरीबंदर, वरळी, माहीम व वांद्रे अशी आमची किल्ल्यांची सफर झाली. तेव्हा प्रत्येक किल्ल्यांबद्दलची उद्बोधक माहिती त्यांच्याकडून ऐकल्यावर मुंबई शहरातील फक्त इमारतीच नव्हे तर रस्ते, गावठाणे, पुतळे इत्यादी सर्व गोष्टींच्या माहितीचा खजिना त्यांच्याकडे असल्याची जाणीव झाली. 'मुंबईची आभूषणे, सभोवतालचे किल्ले' या 'किल्ला'मधील लेखाची जाणकारांनी प्रशंसा केली.
सोनावणे यांनी साप्ताहिके, पाक्षिके, मासिके व वर्तमानपत्रात मुंबईविषयी विपुल लेखन केले. पण त्यांची कात्रणे सांभाळून ठेवली नाहीत याची खंत वाटते. 'हे रूप कसे मुंबापुरीचे', 'रुडयार्ड किपलिंगचा बाप', 'राजाबाई टॉवर', 'फ्लोरा फाऊंटन शिल्पाचा प्रवास', 'नरिमन पॉइंट : भूसंपादनाचे महाकाव्य' आणि 'शासकीय वसाहत भूखंड संपादनाचे महाकाव्य' यासारखे त्यांचे लेख गाजले होते. 'मुंबई तेव्हा व आता', 'आठवणीतील मुंबई', 'कोणे एके काळी', 'रस्तानामा' या शीर्षकांची सदरे विविध वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाली आहेत. त्यांच्या लेखमालेची एका इंग्रजी सायं दैनिकाला दखल घ्यावी लागली होती, हे विशेष!
एखाद्या रस्त्यावरून जाताना पूर्वी त्या रस्त्याचे नाव कोणते होते व आता ते का बदलले याची मनोरंजक माहिती ते सहज देत असत. वर उल्लेखलेल्या 'रस्तानामा' या सदरात हे सर्व आलेले आहे. दादर पश्चिमेला बाबरेकर मार्ग येथील जी महानगर टेलिफोनची इमारत आहे तेथे पूर्वी तलाव होता हे सांगितल्यावर मी अचंबित झालो. मुंबईत अशा कितीतरी वास्तू आहेत जेथे पूर्वी दुसरे काहीतरी वेगळेच होते. त्यावरून 'पुसलेली मुंबई' किंवा 'विस्मरणातील मुंबई' या पुस्तकाची कल्पना त्यांना सुचली व ते त्यांनी लिहायला घेतले. जवळजवळ पूर्णही करत आणले होते. सोनावणेंचे मुंबईवरील एकमेव पुस्तक नोव्हेंबर २००३ साली 'कालची मुंबई' हे प्रकाशित झाले आहे. त्यामध्ये एकूण २७ लेख होते.
मुंबईचे अभ्यासक म्हणून त्यांनी जो लौकिक मिळविला होता, त्याबद्दल मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना आदरांजली वाहून महासभा स्थगित केली होती. मी गंमतीने त्यांना म्हणत असे की सात बेटांची ही मुंबई पोर्तुगीजांनी इंग्रजांना लग्नात आंदण म्हणून दिली व पाठराखीण म्हणून तुम्हाला पाठविले तर तुम्ही तिच्या प्रेमात अखंड बुडून गेलात. त्यांच्या मुंबईवरील लेखनामुळे सर्वसामान्य वाचकांचे कुतूहल जागृत होत असे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट