मुद्दा स्वप्नांचा. कोणाच्या स्वप्नात कोण येते आणि कोणाच्या कसे कोणीच येत नाही, हा फार मोठ्या चर्चेचा विषय आहे. श्रद्धा, अंधश्रद्धा, मानसशास्त्र असे अनेक आयाम त्याला आहेत. यामध्ये, दिवसा दिसणाऱ्या स्वप्नांचा समावेश नाही. फक्त रात्रीच्या अथवा पहाटेच्या वेळी झोपेत असताना पडलेल्या स्वप्नांचाच या साऱ्यात विचार होतो.
आता कोण्या नेत्याला साक्षात श्रीकृष्णाने स्वप्नात येऊन, निवडणुकीनंतर त्यांचेच राज्य येणार असल्याचे सांगितले म्हणे. म्हणे म्हणजे, तो नेता स्वत: म्हणे. आम्ही काहीही कोणालाही म्हटलेलो नाही. आम्ही काही म्हणायला गेलो, की आमच्या गणितांच्या स्वप्नांचा विषय निघतो. पुन्हा एकदा असो. आता त्यांना स्वप्न पडले आणि त्यांना श्रीकृष्णानेच तसे सांगितले म्हटल्यावर आपण काय बोलणार? शेवटी जे मनात असते, तेच स्वप्नात दिसते. किमान आमच्या गणिताच्या स्वप्नांना हा नियम लागू होतो. मानसशास्त्रही तसेच काहीसे म्हणते. म्हणजे सुप्त मन वगैरे काही तरी शब्द असतात. आता कोणताही नेता म्हटला, की त्याच्या सुप्तच काय, जागृत मनातही सत्तेचाच विचार असणार. कोण माणूस सत्तेवर न येण्यासाठी राजकारणात येईल? हे तर वडिलांचे बोट धरून सत्तेवर आलेले... सत्तेची चव चाखलेले. मग त्यांच्या मनात पुन्हा एकदा सत्तेवर येण्याचेच विचार घोळत असणार. आम्हाला जे समजते, ते त्यांना आणि इतरांनाही समजत असणार; पण ते पडले राजकारणी. ते म्हणतात, त्याला विशेष महत्त्व असणारच.
आम्हाला ते आणि त्यांचे स्वप्न यांविषयी काहीच बोलायचे नाही. आमचा मुद्दा वेगळाच आहे. आम्ही लहानपणापासून गणितात नापास होण्याचे स्वप्न पाहत आलो आहोत. त्याविषयी कधी कोणाला काहीही वाटले नाही. आईला नाही, बायकोला नाही आणि मुलांनाही नाही. त्या विषयी कधी चर्चाही झाली नाही, बातमीची गोष्टच वेगळी. यांना एकदाच स्वप्न पडले, म्हणजे जे स्वप्न पडले ते त्यांनी सांगितले, तर लगेच बातम्या, चर्चा आणि दोन्ही बाजू घेऊन मुद्दामुद्दी... शेवटी एकच खरे, स्वप्न काय पडले, कितीदा पडले याहीपेक्षा ते कोणाला पडले, तेच आज महत्त्वाचे आहे.
- चकोर
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट