मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
गेल्या शुक्रवारी, म्हणजे ३१ तारखेला मनाशी अनेक संकल्प केले. नव्या वर्षाच्या अगदी पहिल्या दिवसापासून, रोज सकाळी सहा वाजता उठायचं म्हणजे उठायचंच. चालायला जायचं म्हणजे जायचंच. नंतर आवरून नऊ वाजता अल्पोपाहारात मोड आलेले कडधान्ये, एक फळ, ज्वारीची एक भाकरी व भाजी, दुपारच्या ऑफिसच्या डब्यात तीन पोळ्या व सोबत भाजी, संध्याकाळी ऑफिसला कँटीनला जायचं नाही; घरूनच धिरडी वा घावन वा सूप असं काही न्यायचं व तेच खायचं. संध्याकाळी उशिरा ऑफिसातून घरी आल्यावर अर्धा कप चहा. राजगिऱ्याचा एक किंवा दोन लाडू. मग अगदी माफक जेवण. आणि रात्री अकरा वाजता झोपायचं म्हणजे झोपायचंच. आता झालं काय, की ३१ला रात्री झोपायला जरा उशीर झाला. काय झालं की, सगळे मित्र मित्र खूप दिवसांनी हॉटेलात एकत्र भेटलो होतो. गप्पा मारता मारता काही जण एकदम भावूक झाले. डोळ्यांत पाणी दाटून आलं त्यांच्या. आता असतात काही काही जण हळवे. त्यांच्या डोळ्यांत पाणी दाटलं तर मग सगळ्यांच्याच डोळ्यांत पाणी दाटलं. सगळेच हळवे झाले. त्यात झालं असं की जेवणाची ऑर्डर द्यायला अंमळ उशीर झाला. त्यामुळे मग जेवणं संपायलाही उशीर. म्हणून मग झोपायला अडीच वाजले. म्हणून मग सकाळी उठायला उशीर. म्हणून मग शनिवारी, म्हणजे एक तारखेला संकल्पांचे पालन करता आलं नाही. रविवारी खरं तर संकल्पानुसार सगळं करण्यास सुरुवात करणार होतो. पण शनिवारीही झोपायला जरा उशीर झाला, नि रविवारी उठायला नऊ वाजले. अंघोळीच्या आधी जरा पाय मोकळे करून येऊ म्हणून बाहेर पडलो तर नाक्यावरच्या हॉटेलात बसलेल्या मित्राने नेमकी हाक मारली. त्याच्याशी गप्पा मारायला बसलो तर नेहमीच्या वेटरनं न मागताच मिसळ आणून पुढ्यात ठेवली. मी खरं म्हणजे नको नको म्हणत होतो, पण मित्रानं खूपच आग्रह केला म्हणून मिसळ नि सोबत पाच पाव खाल्ले. मिसळ जरा तिखट होती. त्यावर उतारा म्हणून इडली चटणी खाल्ली. नंतर चहाही झाला. दुपारी खरं तर कमी जेवणार होतो, पण घरच्यांनी खूपच आग्रह केला. 'खा हो... नॉनव्हेज आवडतं म्हणून केलं,' असं त्यांचं म्हणणं पडलं. त्यांचा हिरमोड नको म्हणून जेवलो भरपूर. दुपारी वामकुक्षी करून संध्याकाळी फिरायला गेलो तेव्हा एक वडापाव नि एक पाणीपुरी असं खाणं झाल्यानं रात्री लंघन करावं असा विचार होता. पण घरच्यांच्या आग्रहामुळे जेवावं लागलं. असो. आज नव्या वर्षातला पहिला सोमवार आहे. आजपासून सगळं शिस्तीत सुरू करायचं होतं. पण आज सहा वाजता नाही उठता आलं. साडेआठ वाजले उठायला, त्यामुळे फिरायला नाही जाता आलं. मोड आलेले कडधान्य द्या, असे घरच्यांना सांगितलं, तेव्हा कडधान्याला मोड अचानक येत नाहीत, असं मला सांगण्यात आलं. ठीक आहे. आता जाताना आजच्या दिवस मिसळ खाऊन जावं. पण फक्त आजच्याच दिवस! उद्यापासून शिस्त म्हणजे शिस्त. ते कडधान्यांचं तेवढं आधी सांगून ठेवतो...