जागरुकतेचा अभाव आणि स्पष्ट लक्षणांची अनुपस्थिती यामुळे भारतीयांमध्ये थायरॉइडचे प्रमाण वाढत आहे. थायरॉइडच्या विकाराची अनेकांना जाणीवच होत नाही. कारण हा विकार प्रामुख्याने स्त्रियांनाच होतो, असा समज आहे. पण, त्याची लक्षणे संभ्रमात टाकणारी आहेत. ३० ते ४५ वयोगटातील पुरुषांना थायरॉइडचा विकार जडण्याची अधिक शक्यता मानली जाते. यामुळे भविष्यात हृदयविषयक समस्या व वंध्यत्वांची समस्याही उद्भवू शकते. त्यामुळे या विकाराची माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करू या.
थायरॉइड ही एक लहान फुलपाखराच्या आकाराची अंतःस्रावी ग्रंथी आहे. ही ग्रंथी मानेच्यामध्ये कंठाच्या खालच्या बाजूला असते. केवळ १५ ते २५ ग्रॅम वजनाच्या ही ग्रंथीमध्ये मानवी शरीराच्या संपूर्ण चयापचयाचे नियंत्रण करण्याची शक्ती असते. थायरॉइडचा विकार कोणत्याही वेळेस होऊ शकतो. कारण त्यामागे नेमके कोणते जनुकीय घटक किंवा जीवनशैलीच्या सवयी कारणीभूत असतात, हे माहीत नसल्याने त्यातील गुंतागुत वाढते.
थायरॉइड व टी हार्मोन्स
ही लहानशी ग्रंथी प्रामुख्याने आपल्या आहारातील आयोडीनचा वापर करून टी ३ (ट्रायआयोडोथायरोनाइन) व टी ४ (थायरोक्सीन) या दोन हार्मोन्सचे नियंत्रण करते. चयापचय प्रक्रियांमधील आंतरसमन्वयात संतुलन राखण्यासाठी या दोन्ही हार्मोन्सची पातळी अतिशय महत्त्वाची असते.
चाचणी कोणी करून घ्यावी?
२५ वर्षांहून अधिक वयाच्या महिला, नुकत्याच प्रसूत झालेल्या महिला, उच्च कोलेस्टेरॉल असलेल्या व्यक्ती, ज्यांचे वजन वेगाने कमी होते किंवा वाढते, ज्यांना थकवा व गळून गेल्यासारखे वाटते, मासिक पाळीच्या चक्रात अडथळा, वंध्यत्व असलेल्या व्यक्ती, या आजाराची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना थायरॉइडचा विकार होण्याची शक्यता अधिक असते.
त्यामुळे अशा व्यक्तींनी खूप सावध राहण्याची गरज आहे. वजन कमी होणे, श्वास लागणे, केस गळती चिडचिड अशी काही लक्षणे आढळल्यास वैद्यकीय सल्ला घ्या. थायरॉइड ग्रंथींमध्ये गाठी किंवा दाह आहे का हे तपासण्यासाठी चाचण्या आहेत. फ्री टी ३, फ्री टी ४, थायरोग्लोब्युलिन, अँटी थायरोग्लोब्युलिन अँटीबॉडी अशा काही वेगवेगळ्या चाचण्या आहेत. थायरॉइड गाठींचे प्रकार निश्चित करण्यासाठी एफएनएसी (फाइन नीडल अॅस्पिरेशन सायटोलॉजी) चाचणी किंवा अल्ट्रासाऊंड चाचण्यांचीही शिफारसही केली जाते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट