'गणपती दूध पितो' ही बातमी वाऱ्यासारखी सर्व देशभर पसरली आणि जो तो गणपतीला दूध पाजायला निघाला. त्या दिवशी हजारो लिटर दूध नुसते वाहून गेले आणि अखेर हुशार चर्मकार कारागिराने केशाकर्षणाचे रहस्य या चमत्कारामागे असल्याचे दाखवले. या लाजिरवाण्या दिवसाची आठव रहावा म्हणून 'अंधश्रद्धा निर्मूलन समिती' हा दिवस 'अंधश्रद्धा निर्मूलन दिन' म्हणून साजरा करते.
या घटनेची आठवण येण्याचे कारण, मिच अलबॉम यांचे हे पुस्तक. मृत नातेवाईकांचे फोन स्वर्गातून जिवंत व्यक्तीला येतात, या घटनेभोवती हे पुस्तक गुंफले आहे. या कल्पित घटनेच्या निमित्ताने श्र्रद्धाळू, अंधश्रद्धाळू व अश्रद्ध अशा तीनही गटांबद्दल लेखकाने भरपूर व सखोल ऊहापोह केला आहे. समाजात असे तीनही प्रकारचे लोक असतात. त्यांचा तथाकथित चमत्काराकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा विभिन्न असतो, प्रत्येकाची प्रतिक्रिया कशी वेगवेगळी येते, हे लेखकाने दाखवून दिले आहे.
स्वतः लेखक श्रद्धाळू या वर्गातला असावा. कारण मनोगतामध्ये लेखक पुस्तक पूर्ण होण्याचे सर्व श्रेय देवाला देऊन मोकळा झाला आहे. कादंबरीतील सर्व घटना मिशिगन राज्यातील कोल्ड वॉटर शहरात घडतात. वास्तवात असे शहर मिशिगन स्टेटमध्ये आहे, पण हे ते शहर नव्हे असे लेखकाने स्पष्ट म्हटले आहे. मनोगतात लेखकाने आपल्या पत्नीबद्दल जे म्हटले आहे, ते लेखकाच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकते. लेखक म्हणतो 'या कादंबरीची नायिका (Gisele) किंवा अली, मार्गारेट अशा माझ्या सर्व नायिका म्हणजे माझी पत्नी जिजी हिची विविध रूपे आहेत, अन्यथा अंतःकरणापासून केलेले प्रेम मी नुसत्या कल्पनेच्या बळावर रंगवू कसा शकणार होतो?' पत्नीला दिलेली इतकी सुंदर प्रेमादराची पावती यापूर्वी कधीच वाचनात आली नव्हती.
टेलिफोन हे येथे मुख्य पात्र. लेखकाने कादंबरीतील प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगांनंतर टेलिफोनचा जनक ग्रॅहम बेल याच्या जीवनातील समांतर प्रसंग रंगवला आहे. गंमत म्हणजे, वाचताना मध्येच येणारे हे टिपण खटकत नाही. आपण दोन प्रसंगांतील साम्यस्थळे शोधू लागतो. बेलची, त्याच्या संशोधनाची, त्याच्या निर्मितीची माहिती या निमित्ताने मिळते.
एका महिलेला स्वर्गवासी बहिणीचा फोन येतो, नंतर आणखी सहाजणांना त्यांच्या मृत नातेवाईकांचे फोन येऊ लागतात. ग्रामसभेमध्ये ही मंडळी जाहीर करतात आणि एकच धमाल उडते. अमुक गावात असे फोन येत आहेत, असे पत्र एका टीव्ही चॅनलला येते, म्हणून त्या चॅनेलची वार्ताहर मुलगी कोल्ड वॉटरला येते. तिच्या प्रक्षेपणामुळे ही घटना जगजाहीर होते. मग त्याच्या खरे-खोटेपणाविषयी तर्क-वितर्क सुरू होतात. पण चमत्कारावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या जास्त असते. अर्थात, या चमत्कारास विरोध करणारा एक मोठ्ठा गटदेखील येथे आहे. मग दोन्ही बाजूंकडून येणारे मुद्दे त्यातून निर्माण झालेले गुद्दे आणि मोर्चे याचा गदारोळ उठतो. गावाचे रंगरूप बदलते. गर्दी, ट्रॅफिक जॅम, पोलिसांवर कामाचा भार अशा समस्या निर्माण होतात. या प्रसिद्धीचा फायदा उठवणारे असंख्य गाववाले आहेत. यात चर्चही मागे नाही. पूर्वी चर्चमध्ये लोकांना बोलावून आणावे लागायचे, पण आता गर्दीने चर्च भरू लागले. स्वर्गवासी नातेवाईकांचे फोन ज्यांना येतात, त्यांच्या घरासमोर बसून हे लोक भजन, प्रार्थना करतात. त्यांच्यासारखे टेलिफोन घेण्यासाठी दुकानात गर्दी उसळते. हॉटेलवाल्यांची चैन आहे. गाड्या उभ्या करण्याचे भाडे घेतले जाते, तरीही पार्किंगला जागा उरलेली नाही.
या गदारोळात एक गोष्ट जाणवत राहते व ती म्हणजे या मंडळींपैकी कोणीही देवाधर्माचा, स्वर्गाचा, चमत्काराचा विचार करत नसून फक्त आर्थिक फायदा बघत आहेत. सर्व गोष्टींना येणारे बाजारी स्वरूप या कथानकाद्वारे लेखक एका तरल पातळीवर शब्दबद्ध करतो व हेच या पुस्तकाचे यश आहे.
द फर्स्ट फोन कॉल फ्रॉम हेवन, लेखकः मिच अलबॉम, प्रकाशकः हार्पर अँड कॉलिन्स, पानेः ३२३ (पेपरबॅक)
किंमतः १०.०६ डॉलर
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट