०००
हल्लीच्या बदलत्या काळात महिलांवरील जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. शहरी अथवा ग्रामीण भागांतील महिलांवरील जबाबदाऱ्याही वाढल्या आहेत. सध्याच्या दैनंदिन जीवनात महिलांची घर आणि ऑफीस अशा दोन्ही ठिकाणी तारेवरची कसरत सुरू असते. या दोन्ही ठिकाणच्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना त्यांच्यावर ताण येतो. त्याचा परिणाम त्यांच्या स्वास्थ्यावर होतो. अशी दुहेरी भूमिका बजावणाऱ्या महिलांपैकी सरासरी ७४ टक्के महिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास असतो. हृदयाशी संबंधित आजारासाठी हा मोठा धोका आहे. नोकरी व घरची जबाबदारी या चक्रातच त्या अडकून पडलेल्या असल्याने त्यांचे स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होते. घरच्या जबाबदाऱ्या, अयोग्य आहार व व्यायामाचा अभाव यामुळे ५४ टक्के महिलांना स्थूलतेचा त्रासात होऊ लागतो. याशिवाय वाढते कोलेस्ट्रॉल, अनुवंशिकता, बैठी जीवनशैली व व्यायामाचा अभाव या सर्व कारणांमुळे हृदयविकाराची शक्यता वाढवते.
हल्लीच्या काळात महिलांमध्ये धूम्रपानाचे प्रमाणही वाढले आहे. सुमारे तीन ते चार टक्के महिलांध्ये धूम्रपानामुळे हृदयविकाराचा त्रास आढळून येतो. सुमारे ७० टक्के महिलांमध्ये मासिक पाळी थांबल्यावर हृदयाशी संबंधित आजाराचे निदान झाल्याचेही एका पाहाणीतून समोर आले आहे. डायबेटिसही हृदयविकाराशी संबंधितच आजार आहे. त्यामुळे महिलांनी स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देण्याची अधिक गरज आहे. पुरेसा व्यायाम, योग्य आहाराबरोबर वेळोवेळी वैद्यकीय तपासण्या करण्याची गरज आहे. आपल्याकडील महिला स्वतःच्या आरोग्यापेक्षा कुटुंबाच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देतात. पण, महिलांनी स्वतःच्या प्रकृतीबाबत अधिक सजग राहाण्याची जास्त गरज आहे.
-डॉ. लेखा पाठक, हृदयविकार तज्ज्ञ
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट