Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 2741

‘चित्रलिपी’ : एक प्रवास

$
0
0

>> राही डहाके

वसंत आबाजी डहाके यांच्या साहित्य अकादमी विजेत्या चित्रलिपी या काव्यसंग्रहाचा इंग्रजी अनुवाद, राही डहाके यांनी 'हायरोग्लिफ्स' या नावाने केला आहे. त्याचे प्रकाशन, मंगळवार, १२ मे रोजी सायंकाळी ६.३० वा. डेव्हिड ससून लायब्ररीच्या प्रांगणात ख्यातनाम कवी रणजित होस्कोटे यांच्या हस्ते होणार आहे.

मी इंग्रजी वाङ्मय हा विषय घेऊन एम.ए., एम.फिल. केले असले तरी घरच्या वातावरणामुळे मराठी वाचनाचे बोट कधीच सु‌टले नाही. याचे श्रेय मी आईला देते. कारण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात अगदी तंतोतंत फिट्ट बसणारे मराठी साहित्य ती माझ्यासमोर ठेवत गेली. बाबांनी काही भाषांतरित हिंदी, बंगाली आणि लॅटिन अमेरिकन, जर्मन, फ्रेंच भाषेतले साहित्य, विशेषतः युरोपियन नाटकांचे ढीग समोरच्या शेल्फांवर आणून ठेवले. हे भाषांतरित साहित्य वाचायला लागल्यावर आणि पुढे आपल्याला दोन भाषा बऱ्यापैकी येतात हे लक्षात आल्यावर एके दिवशी मी माझ्या भावाची एक कविता इंग्रजीतून मराठीत आणली. तिथेच हा शांत प्रवास सुरू झाला. मोजकी आणि आवडीपुरती केलेली अनेक भाषांतरे जशी केली तशीच लुप्त झाली. जी.एं.च्या कथांचे भाषांतर करण्याची इच्छा मी कित्येक वर्षे मनात जपून ठेवली आहे. लहानपणी 'बखर बिम्मची', पुढे स्वतः वाचायला लागल्यावर 'कैरी', 'तुती', 'चैत्र' या कथा - आणि मग मराठीत खूपच काहीतरी विलक्षण वाचल्याचा अनुभव त्यांची 'प्रवासी' ही कथा वाचल्यावर आला. हीच 'प्रवासी' कथा पस्तीस किलोमीटर पायपीट करून, हिमालयाच्या अद्‍भुत वातावरणात, अरुंद वाटांवर, अथांग फुलांच्या शेतांतून, बर्फाळलेल्या झऱ्यांतून स्वतः प्रवास करीत हर की दून येथे पोचल्यावर रात्रीच्या थकलेल्या अंधारात आम्हा पंचवीस प्रवाशांना बाबांनी सांगितली.

त्यावेळी आणि त्या प्रवासात मला, माझे वडील कवी म्हणून दिसले. कदाचित आम्ही पहिल्यांदाच एवढा लांबचा प्रवास दोघांनी मिळून इतके दिवस इतर कवींबरोबर केल्यामुळे असेल. कदाचित माझे वय, आणि समज आणि मनातला प्रवास मला हे सहज समजायला मदत करणारा ठरला असेल, कदाचित हिमालयाच्या त्या भव्य, विस्तीर्ण प्रदेशात आम्ही अतिशय लहान होऊन एकमेकांकडे बघू लागलो असू - माझ्या आईच्या कविता फार लहानपणापासून तिच्याबरोबर कविसंमेलने ऐकायला गेल्यामुळे ऐकल्या होत्या, त्या अधिक जवळच्या वाटत पण मी त्या इंग्रजी भाषेत ऐकू शकत नसे. बाबांच्या कविता मात्र आपण मला अधिक जवळ वाटू लागलेल्या भाषेत आणाव्या असे पुष्कळ जुन्या काळापासून वाटत असे. पण भाषेवर पूर्ण विश्वास तेव्हाच बसला जेव्हा, मी फ्रेंच, इटालियन, मोरोक्कन, पेरुवियन, ब्राझिलियन, पोलिश, चेकोस्लोवाकियन, जपानी, ट्यूनिशियन या भाषांमध्ये बोलणाऱ्या लोकांना इंग्रजी शिकवले. त्यावेळी पुष्कळदा आपण एक 'काऊन्सेलर'- सल्लागार आहोत आणि ते विद्यार्थी नसून बोलणे आणि समजून घेणे याची नितांत आवश्यकता असणारी माणसे - 'बिइंग्ज' आहेत असा अनुभव येत असे. तेव्हा वाटले की आपल्याला जे समजते ते आपले असते, भाषा आपणच तयार करत असतो.

अचानक बाबांची कविता मला अधिक समजली, अधिक जवळची वाटली आणि ती मराठीपलीकडे नेऊन इतरांना द्यावी असे वाटले. हळूहळू मी एक एक कविता भाषांतरित करीत गेले. भाषांतराची कितीही शिबिरे करा, सेमिनारमध्ये भाग घ्या, कथा, कविता, नाटक, मनोगते, वृत्तपत्रातले लेख यांची भाषांतरे करा - प्रत्येक वेळी प्रत्येक साहित्यकृती ही स्वतःचे व्यक्तिमत्त्व घेऊन येते. त्यात इंग्रजी आणि मराठी या दोन संपूर्णतः दूर असलेल्या भाषा तर भाषांतरासाठी अधिकच कठीण. पण भाषांतर करीत असतानाचा जो विलक्षण अनुभव असतो तो नुसते लेखन किंवा नुसते वाचन यातून येत नाही. आपण स्वतः कविता लिहीत असूनही, स्वतःचीच कविता भाषांतरित करताना एक नवीन कविता तयार झाल्याचा मला स्वतःला अनुभव आला आहे. लेखकाच्या कृतीचे भाषांतर करताना वाचन आणि आकलन होऊन स्वतःच्या शब्दांत, अनुभवात, जाणिवेत आपण स्वतः ते पुन्हा लिहीत असतो हे जेव्हा समजले तेव्हा एकीकडे दैवी शक्ती आपल्या हातात आली असे वाटले आणि दुसरीकडे आपले भाषांतर नेहमीच अपुरे राहील, लेखकाला जे म्हणायचे आहे ते त्यात कधीच येऊ शकणार नाही अशी हताश करणारी जाणीव होत राहिली.

बाबांच्या कविता भाषांतरित करताना मात्र तटस्थतेचा अनुभव येऊ शकला नाही. अनेकदा मराठीची हाडे मोडून इंग्रजीत अर्थ सापडेल या रीतीने ओळी रचाव्या लागल्या. काही वेळा मराठमोळे इंग्रजी हे 'चित्रलिपी' पुस्तक दूर ठेवून दोनेक महिन्यांनी नुसते इंग्रजीत वाचून पाहिल्यावर बदलू शकले. खुद्द कवीलाच अर्थ विचारण्याची सोय मला होती, त्यामुळे उत्साह वाटला पण कवीची नेहमीची पद्धत, 'हो हो, चालेल, हरकत नाही,' अशी. तेव्हा आईशी केलेली चर्चा उपयोगी ठरली. हे भाषांतर मी हळूहळू, शांतपणे करीत गेले पण स्वतःच्या वडिलांच्या अनुभवांचे, विचारांचे, थकव्याचे, एकाकीपणाचे, प्रश्नांचे, समजावणीचे, शांतपणाचे भाषांतर करताना खूप वेगवेगळ्या भावनांचा अनुभव मी घेत गेले.

जे मी भाषांतरित केले आहे ते माझे आहे, जे कवीने लिहिले आहे ते कवीचे आहे, जे वाचक वाचणार आहेत, ते वाचकाचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 2741

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>